३ हजार २३७ लाभार्थ्यांचे धान्य बंद
‘त्या’ लाभार्थ्यांचे धान्य बंद
केवायसी अपूर्ण ; सहा महिने धान्य न घेणाऱ्यांसाठी निर्णय
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २३ : केवायसी न केलेल्या व सलग सहा महिने धान्याची उचल न करणाऱ्या चिपळूण तालुक्यातील ३ हजार २३७ रेशनकार्डधारकांचे धान्य वितरण बंद करण्यात आले आहे.
सरकारने राष्ट्रीय अन्नसुरक्षा विभागांतर्गत रेशनकार्ड ई-केवायसीबाबत नवीन आदेश जाहीर केला आहे. त्यानुसार कार्डधारकाने ई-केवायसी केली नाही आणि अधिकाऱ्यांना तपासणीत काही त्रुटी आढळल्या तर त्याचे नाव रेशनकार्डांतून हटवले जाईल, असा इशारा देण्यात आला होता. बनावट धान्यवाटपास आळा बसावा यासाठी हे पाऊल सरकारकडून उचलण्यात आले होते. यापूर्वी बनावट लाभार्थी हटवण्यासाठी बायोमेट्रिक ओळख आणि आधारलिंकचे काम हाती घेण्यात आले. रेशन दुकानात जाऊन लाभार्थींनी केवळ बायोमॅट्रिक ओळख पटवून दिली. यातून जे लाभार्थी हयात नाहीत अशा व्यक्तींची नावे रेशनकार्डवरून कमी झाली. त्यानंतर रेशनकार्डवर नावे असलेल्या सर्व सदस्यांची ई-केवायसी करण्यात आली. चिपळूण तालुक्यात प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थी एकूण ४१ हजार २८८ शिधापत्रिकाधारक आहेत. यातील प्रधान्याची ६२३६ शिधापत्रिकाधारक आहेत. ज्या लाभार्थ्यांनी सलग सहा महिने धान्याची उचल केली नाही तसेच ई-केवायसी केली नाही अशा ३ हजार २३७ रेशन कार्डधारकांचा धान्यपुरवठा शासनाने बंद केला आहे.
----------
कोट
जे रेशनकार्डधारक ई-केवायसी करणार नाही त्यांना धान्य वितरित केले जाणार नाही. प्रत्येक रेशनकार्डधारकाला ई-केवायसी अपडेट करणे बंधनकारक आहे. लवकरात लवकर केवायसी भरली नाही तर धान्य मिळण्यात अडचणी येऊ शकतात. यातून बनावट शिधापत्रिकाधारक शोधण्यात येत आहेत. बरेच ग्राहक चुकीच्या पद्धतीने रेशन घेतात, त्यांनाही आळा बसेल.
- राजदन सोनवणे, पुरवठा विभाग, चिपळूण
----------
कोट
शासनाने मोफत धान्य देताना अनेक नियम कडक केले आहेत. त्याचे आम्ही स्वागत करतो; मात्र अनेक रेशनकार्डधारकांना त्यांच्या हक्काचे रेशन मिळत नाही म्हणून ते तहसील कार्यालयात अर्ज करत आहेत. एका रेशनकार्डवर पाच लोकांचे नाव असेल तर तीन लोकांचे धान्य मिळते. उर्वरित दोन लोकांनी तहसील कार्यालयात चौकशी केल्यानंतर आता कोटा संपला आहे. नवीन कोट्यात तुम्हाला धान्य देऊ. आता अर्ज करून ठेवा. सर्व कुटुंबातील सदस्यांचे आधारकार्ड अर्जाला जोडा, असे सांगितले जात आहे.
- लियाकत शहा, तालुकाध्यक्ष, काँग्रेस