टीईटी निकालप्रश्नी पाच रिट
टीईटी निकालप्रश्नी पाच रिट
म. ल. देसाई ः माजी ऍटर्नी जनरल, तज्ज्ञ वकीलांची नियुक्ती
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २३ः अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ व ज्युनिअर शिक्षक संघ यांनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या टीईटी निकालाच्या संदर्भात संयुक्त रणनीती आखली आहे. या संदर्भात पाच रिट दाखल केल्या जाणार आहेत. यासाठी भारताचे माजी ऍटर्नी जनरल, माजी सॉलिसिटर जनरल यांची नियुक्ती केली आहे, अशी माहिती संघटनेचे राज्य उपाध्यक्ष म. ल. देसाई यांनी दिली.
अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाबरोबर ज्युनियर शिक्षक संघाने लढाईचे धोरण ठरवले आहे. दिल्ली येथे भारत सरकारकडे सर्व राज्य संघ जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन देवून हस्तक्षेप करण्याची विनंती करत आहेत. तसेच लोकप्रतिनिधी यांना या प्रश्नांची दाहकता कळावी यासाठी भेटी घेवून निवेदन दिले जाणार असल्याचे श्री. देसाई यांनी सांगितले. याबाबतची शिक्षकांची लढाई न्यायालयातही लढली जाणार आहे. यासाठी पाच रिट दाखल केल्या जाणार आहेत. यातील पहिली रिट ३ ऑगस्ट २०१७ च्या कायदेशीर दुरुस्तीला आव्हान देण्यासाठी दाखल होईल. दुसरी रिट शिक्षणाचा अधिकार अधिनियम २०११ लागू होण्यापूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना सूट देण्याबाबत असेल. तिसरी रिट २०११ नंतर नियुक्त पण टीईटी नसलेल्या शिक्षकांबाबत असेल. हा मुद्दा इतर राज्यांशी संबंधित आहे. चौथी रिट या प्रकरणावरील स्थगिती आदेशासाठी असेल. यासाठी भारताचे माजी ऍटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांच्याकडून युक्तीवाद केला जाईल. पाचवी रिट उत्तर प्रदेश सरकारकडून दाखल झालेल्या पुनर्विचार याचिकेबाबत असेल. यासाठी वरिष्ठ वकिलांकडून सहयोग केला जाईल, असे श्री. देसाई यांनी सांगितले.
उर्वरित सर्व रिटसाठी भारताचे माजी सॉलिसिटर जनरल संतोष हेगडे यांना नियुक्त केले गेले आहे. वेळोवेळी होणाऱ्या सुनावण्यांमध्ये इतर वरिष्ठ वकिलांचाही सहयोग घेतला जाणार असल्याचेही श्री. देसाई यांनी स्पष्ट केले.