घुमडे वस्तवाडीत रविवारी भजन सेवा
घुमडे वस्तवाडीत
रविवारी भजन सेवा
मालवणः घुमडे वस्तवाडी येथील श्री देवी भवानी मंदिरात नवरात्री उत्सवानिमित्त रविवारी (ता. २८) सायंकाळी ५ वाजता विठ्ठल रखुमाई महिला वारकरी भजन मंडळ खैदा (बुवा गोपाळ पाटकर) यांचे भजन, ७.३० वाजता श्री भवानी देवी प्रासादिक भजन मंडळ, वस्तवाडी घुमडे (चंद्रशेखर वस्त) यांचे भजन, रात्री ९ वाजता श्री ब्राह्मण देव भजन मंडळ कांदळगाव कातवड (मंगेश नलावडे) यांचे भजन होणार आहे.
......................
वेंगुर्लेत शिवसेनेतर्फे
आज नवरात्रोत्सव
वेंगुर्लेः वेंगुर्ले तालुका शिंदे शिवसेनेतर्फे उद्या (ता. २५) नवरात्रोत्सव कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यानिमित्त सत्यनारायण महापूजा व तालुक्यातील निमंत्रित भजन मंडळांची भजने होणार आहेत. सकाळी ९ वाजता सत्यनारायण महापूजा, दुपारी १२ वाजता महाआरती व तीर्थप्रसाद, सायंकाळी ४ वाजता केरवाडा-शिरोडा येथील चौगुलेश्वर मंडळाचे भजन, ५ वाजता परुळे आगारवाडी येथील ओम साई मंडळाचे भजन, मायने कोचरा येथील वेतोबा मंडळाचे भजन, रात्री ९ वाजता जेसोली येथील गावडेश्वर भजन मंडळाचे भजन होणार आहे. शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सचिन वालावलकर, नितीन मांजेरकर, उमेश येरम यांनी केले आहे.
......................
राष्ट्रीय प्रशिक्षणासाठी
संदीप बोडवेंची निवड
मालवणः तालुक्यातील वायरी-भूतनाथ येथील संदीप बोडवे यांची सेंट्रल अकादमी फॉर स्टेट फॉरेस्ट सर्व्हिस, डेहराडून -उत्तराखंड येथे होणार्या राष्ट्रीय स्तरावरील तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिरासाठी निवड झाली आहे. २४ ते २६ सप्टेंबर या कालावधीत आयोजित या प्रशिक्षण शिबिराचा मुख्य विषय ''वन आणि वन्यजीव संवर्धनात नागरिक व विज्ञानाची भूमिका'' हा आहे. या प्रशिक्षणासाठी संपूर्ण भारतातून ३० निवडक प्रतिनिधींची निवड करण्यात आली असून, बोडवे यांची निवड झाली आहे. शिबिरादरम्यान वनसंवर्धन, जैवविविधतेचे संरक्षण, नागरिकांचा सहभाग तसेच विज्ञान व तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षण यावर चर्चा व प्रशिक्षण दिले जाणार आहे.
...................
सिंधुदुर्ग महाविद्यालयामध्ये
३ ऑक्टोरला वेशभूषा स्पर्धा
मालवणः येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग कला व वाणिज्य आणि देशभक्त शंकरराव गवाणकर महाविद्यालयातर्फे पर्यटन सप्ताह २०२५-२६ निमित्ताने मालवण महिला विकास कक्ष व सांस्कृतिक विभाग तसेच स्वराज्य संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने ३ ऑक्टोबरला सकाळी १० वाजता महाविद्यालयातील (कै.) नरहरी प्रभूझांट्ये सभागृहात ''वीरांगना-भारतातील शूर स्त्री योद्धा'' वेशभूषा स्पर्धा विद्यार्थिनी व महिलांसाठी आयोजित करण्यात आली आहे. भारतीय इतिहासातील किल्ल्यांशी निगडित अनेक शूर स्त्रियांनी आपल्या शौर्य, त्याग आणि पराक्रमामुळे ठसा उमटविला आहे. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी ही स्पर्धा आहे. स्पर्धेत १५ वर्षांवरील विद्यार्थिनी, महिला सहभागी होऊ शकतात. प्रथम तीन तसेच उत्तेजनार्थ तीन पारितोषिके देण्यात येतील. स्पर्धकांनी निवडलेल्या वीरांगनेची वेशभूषा सादर करून संबंधित एखादा संवाद किंवा माहिती सादर करायची आहे.प्रत्येक स्पर्धकाला एक मिनिटाचा वेळ दिला जाणार आहे. सहभागासाठी डॉ. उज्वला सामंत यांच्याकडे नाव नोंदणी करावी, असे आवाहन समन्वयक डॉ. उज्वला सामंत, आयक्यूएसीप्रमुख डॉ. सुमेधा नाईक, प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर यांनी केले आहे.
.......................
‘शिवप्रतिष्ठान’तर्फे
वेंगुर्लेत दौड स्पर्धा
वेंगुर्लेः येथील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान व हिंदुधर्माभिमानी मंडळीतर्फे श्री दुर्गामाता दौडचे आयोजन करण्यात आले आहे. वेंगुर्लेत पहिल्यांदाच आयोजित केलेल्या दौडीचे मार्गक्रमण रामेश्वर मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक-माणिक चौक, शिरोडा नाका, शिवदुर्गा मित्रमंडळ दुर्गामाता (सुंदरभाटले), मातोश्री कला-क्रीडा मंडळ दुर्गामाता, बाजारपेठ-गाडी अड्डा मित्रमंडळ दुर्गामाता, मारुती स्टॉप ते पुन्हा रामेश्वर मंदिर असे होणार आहे. दौडीची सांगता झाल्यानंतर शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे जिल्हाध्यक्ष मंगेश पाटील संबोधित करणार आहेत. नियोजनासाठी येथील विठ्ठल मंदिरात आयोजित बैठकीत आयोजकांनी दौडीमागची संकल्पना स्पष्ट केली. शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्या धारकरींनी गावोगावी हिंदूंना संघटित करून स्त्रीशक्तीचा सन्मान, जागर करण्यासाठी दुर्गामाता दौडचे आयोजन केले आहे. जिल्ह्यातील सर्व नवरात्री मंडळांनी आपापल्या गावात दुर्गामाता दौड़ काढावी. दौडच्या नियोजनासाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्या धारकऱ्यांशी संपर्क साधावा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.