-१० हजार २२१ कार्डधारकांचे धान्य वितरण थांबवले
सणासुदीत रेशनकार्डधारकांना धक्का
पुरवठा विभागाची कारवाई ; १० हजार २२१ जणांना दणका
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २४ : सणासुदीच्या तोंडावर जिल्हा पुरवठा विभागाने रेशनकार्डधारकांस धक्का दिला आहे. रेशनकार्डधारकांनी जर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नसेल किंवा सलग सहा महिने रास्त धान्य दुकानावरून धान्य उचलले नसेल तर त्यांचे धान्य वितरण थांबवण्यात आले आहे. जिल्ह्यातील सुमारे १० हजार २२१ रेशनकार्डधारकांना याचा फटका बसला आहे. त्यांना अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबातून वगळून अन्यत्र वर्ग केले आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा धान्य मिळण्यासाठी उत्पनाच्या दाखल्यासह सर्व प्रक्रिया करावी लागणार आहे.
धान्य वितरण थांबवण्याची ही कारवाई जिल्हा पुरवठा विभागाकडून पहिल्यांदाच करण्यात आली आहे. जिल्ह्यातील एकूण शिधापत्रिकांची संख्या २ लाख ८२ हजार २७३ असून, त्यावर ११ लाख ३१ हजार २५६ नोंदणीकृत लाभार्थी आहेत.
ई-केवायसीचा प्रश्नदेखील गंभीर आहे. जिल्हा पुरवठा विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, अजून २ लाख ८२ हजार कार्डधारकांची ई-केवायसी अपूर्ण आहे. अॅपद्वारे ती पूर्ण करण्याची प्रक्रिया सुरू असली तरी कार्डधारकांनी लवकरात लवकर ती पूर्ण करून सणासुदीला मिळणाऱ्या योजनेचा फायदा करून घ्यावा, असे आवाहन पुरवठा विभागाने केले आहे.
चौकट...
तालुकानिहाय वितरण थांबवलेले कार्डधारक
मंडणगड* ९६
दापोली* ११६
खेड* ८३८
गुहागर* २२३
चिपळूण* २ हजार ७६९
संगमेश्वर* १ हजार ४६०
रत्नागिरी* २ हजार ७३४
लांजा* ४३२
राजापूर* ७५३
----