''शक्तिपीठ''ने बाधित वनौषधींचे पाच पटीने संवर्धन
swt2410.jpg
93953
मोपाः येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर बोलताना केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव. सोबत डॉ. सुजाता कदम व पी. के. प्रजापती. (छायाचित्र-नीलेश मोरजकर)
शक्तिपीठ’महामार्गामुळे बाधित
वनौषधींचे पाच पटीने संवर्धन
केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधवः आडाळी वनसंशोधन केंद्राला लवकरच चालना
नीलेश मोरजकरः सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २४ः आयुर्वेद संस्थानच्या माध्यमातून केवळ मानवाचे आरोग्यच नव्हे तर पृथ्वीचे आरोग्यही जपले जाणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक दुर्मिळ वनौषधींचा खजाना आहे. या वनौषधींचे ठिकाण व त्यांचे जंगलातील अस्तित्व यांची सविस्तर नोंदणी आयुष मंत्रालयाकडे आहे. शक्तिपीठ महामार्गामुळे काही वनस्पती नष्ट होण्याची शक्यता असली तरी त्याच्या पाच पटीने अधिक लागवड सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये सुरक्षित नैसर्गिक अधिवासात केली जाणार आहे. त्यामुळे विकासाला आणि पर्यायाने शक्तिपीठ महामार्गाला विनाकारण होणारा विरोध हा टाळावा, असे आवाहन केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले.
आंतरराष्ट्रीय आयुर्वेद दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी गोव्यात आलेल्या मंत्री जाधव यांच्याशी मोपा विमानतळावर संवाद साधण्यात आला. यावेळी त्यांच्यासोबत धारगळ येथील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या अधिष्ठाता डॉ. सुजाता कदम, संस्थानाचे संचालक पी. के. प्रजापती आदी उपस्थित होते.
मंत्री जाधव म्हणाले, ‘‘आयुर्वेद हा जगभरातील वैद्यकशास्त्राचा महत्त्वाचा वारसा आहे. आधुनिकतेसोबतच निसर्गाशी समरस होऊन जगण्याचा संदेश आयुर्वेद देतो. त्यामुळे दुर्मिळ औषधींचे जतन, संवर्धन आणि योग्य वापर हा आमचा प्राधान्यक्रम असेल. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आडाळी (ता. दोडामार्ग) येथे प्रस्तावित असलेल्या वनसंशोधन केंद्राला लवकरच चालना देण्यात येणार आहे. शक्तिपीठ महामार्गाच्या कामामुळे पर्यावरणावर होणाऱ्या परिणामाची जाणीव आयुष मंत्रालयालाही आहे. मात्र, या परिणामांना तोंड देण्यासाठी पर्यायी व्यवस्था राबवून जैवविविधतेचे रक्षण केले जाणार आहे. हा प्रकल्प राज्य शासनाचा आहे.’’
ते पुढे म्हणाले, ‘‘ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुर्मिळ जैवविविधतेने नटलेल्या ग्रीन कॉरिडॉरमधून हा शक्तिपीठ महामार्ग प्रस्तावित आहे. या ठिकाणच्या जंगलात असलेल्या अनेक दुर्मिळ वनस्पतींच्या नोंदी या आयुष मंत्रालयाकडे आहेत. त्यामुळे या वनस्पतींचे संवर्धन करण्यासाठी आयुष मंत्रालय विशेष कार्यक्रम राबविणार आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात वनौषधी आहेत. त्याचे जतन होण्यासाठी आयुष मंत्रालय आणि वन विभागाची मदत घेऊन प्रयत्न केले जाणार आहेत. या दुर्मिळ वनस्पती टिकल्या जाव्यात यासाठी शेतकऱ्यांच्या मदतीने त्या वनस्पतींची लागवड करण्यावर भर देण्यात येणार आहे.’’
मंत्री जाधव पुढे म्हणाले, ‘‘आयुर्वेदाचा प्रचार करताना दुर्मिळ औषधी वनस्पती ज्या विविध कारणास्तव नष्ट होत आलेल्या आहेत त्यांचे पुनरुज्जीवन करून किंवा दुर्मिळ अशा वनस्पती व झाडांची पुन्हा लागवड करून त्याचे संवर्धन करण्यासाठी आयुर्वेद संस्थान कटिबद्ध असून आयुष मंत्रालयाशी संलग्न विविध संस्था त्यासाठी कार्यरत राहणार आहेत. विकास हा काळाची गरज आहे पण त्यासाठी अशी दुर्मिळ वनसंपदा जपण्याची आवश्यकता आहे व त्या दृष्टीने आमचे प्रयत्न राहणार आहेत.’’
‘लोकांसाठी आयुर्वेद, पृथ्वीसाठी आयुर्वेद’ ही थीम घेऊन यावर्षी देशभरात विविध आयुर्वेद उपक्रम राबविण्यात येणार आहेत. आयुष मंत्रालयाच्या वतीने देशातील प्रत्येक नागरिकांपर्यंत आयुर्वेदाचे महत्त्व पोहोचवण्यात येणार आहे. आपल्या आयुष्यात रानभाज्यांना प्रचंड महत्त्व असून देशाच्या विविध भागात काळानुसार उपलब्ध असलेल्या रानभाज्यांचे महत्व लोकांना समजण्यासाठी आयुर्वेद संस्थानच्या माध्यमातून रानभाजी महोत्सवांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
चौकट
शेतकऱ्यांच्या सहकार्यातून पुर्नलागवड
कोणताही विकासाचा मार्ग निवडल्यानंतर त्या ठिकाणी निसर्गाचा ऱ्हास हा होणारच आहे. मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गाला देखील मोठा विरोध झाला होता. मात्र, माझ्या मतदारसंघातील शेतकऱ्यांनी स्वतः पुढाकार घेऊन आपल्या जमिनी या महामार्गासाठी दिल्या. त्यामुळे विरोध करून काहीही साध्य होणार नाही. दुर्मिळ वनस्पतींची माहिती ही स्थानिक शेतकऱ्यांना असल्याने त्यांच्या मदतीने या वनस्पतींची पूर्नलागवड करण्यात येणार आहे, असे मंत्री जाधव म्हणाले.
चौकट
१५० हून अधिक देशांत आयुर्वेद दिन
आयुर्वेद संस्थान यापूर्वी धनत्रयोदशी दिवशी आयुर्वेदिक दिन साजरा करत असे. पण, हा दिवस भारत सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून जागतिक स्तरावर पोहोचवल्यानंतर अन्य देशातही एकाच दिवशी साजरा केला जावा या उद्देशाने एक दिवस निश्चित करण्यात आला. आयुर्वेदचा प्रचार आणि प्रसार हा जगभरात मोठ्या प्रमाणात होत असून जगातील १५० हून अधिक देश आयुर्वेद दिन साजरा करतात. त्यामुळे विदेशी लोकांनाही भारतीय संस्कृतीचे मूळ असलेल्या आयुर्वेदाचे महत्त्व पटले आहे. आयुर्वेदिक महाविद्यालयांच्या माध्यमातून शिक्षण घेतलेले डॉक्टर हे ग्रामीण भागात पाठवून लोकांना चांगली सेवा देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचे श्री. जाधव यांनी सांगितले.
---------------