निधी संकलन करून बडदवाडीत पाणी योजना
उन्हाळ्यातही बडदवाडीत पाणीपुरवठा
शेखर निकम ः निधसंकलनातून राबवली योजना
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. २५ ः धामणी बडदवाडीतील ग्रामस्थांनी पाणी योजना निधी जमा करून राबवली. उन्हाळ्यातही प्रत्येकाच्या घरी पाणीपुरवठा सुरळीत आहे. अशी एकीने वागणारी बडदवाडी आहे, असे गौरवोद्गार आमदार शेखर निकम यांनी काढले.
धामणी येथील सभागृहाच्या भूमीपूजनप्रसंगी ते बोलत होते. या कुणबी सभागृहासाठी आमदार फंडातून व कोयना भूकंप योजनेतून निधी मंजूर झाला आहे. आमदार निकम म्हणाले, हे सभागृह पूर्ण तालुक्यात एक वेगळ्या चांगल्या दर्जाचे व स्वरूपाचे तयार होईल आणि या वाडीतील महिला, शिकणारी मुले, सार्वजनिक विकास व हिताच्या कार्यक्रमासाठी उपयोगी पडेल. शासनाच्या अनेक योजना येत असतात, त्यामधून कामे मंजूर होतात; परंतु मूळ उद्देश ठेवून कोणत्याही योजनेच्या मंजूर निधीचा उपयोग कसा करायचा, त्यात स्थानिक ग्रामस्थांचे योगदान कसे असते यावर ती योजना यशस्वी होणे अवलंबून असते. त्या दृष्टीने मेहनत घेऊन बडदवाडीतील ग्रामस्थांनी पाणीयोजना यशस्वीपणे राबवली.
या प्रसंगी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संतोष थेराडे, संचालक राजेंद्र सुर्वे, हॉटेल मालक प्रभाकर घाणेकर, सरपंच संतोष काणेकर, उपसरपंच संगम पवार, गावकर चंद्रकांत बांबाडे, श्रीनिवास पेंडसे, संतोष पडवळकर, अनंत उजगावकर, दत्ता लाखण, दत्ता ओकटे, अरविंद जाधव, हरिश्चंद्र गुरव, सुरेश साळवी, ग्रामसेवक शेखर जाधव, संजय कदम, राजेंद्र कदम ग्रामस्थ उपस्थित होते.