खरीप विम्याखाली केवळ ३ टक्केच क्षेत्र
खरीप विम्याखाली केवळ ३ टक्केच क्षेत्र
सिंधुदुर्गातील स्थितीः एक रुपयांत विमा योजना गुंडाळल्याचा परिणाम
एकनाथ पवारः सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. २५ः कृषी विभागाने आटोकाट प्रयत्न केल्यानंतर देखील खरीप पिक विमा योजनेखाली जिल्ह्यातील केवळ तीन टक्के पिक क्षेत्र विमा संरक्षित झाले आहे. ५४ हजार हेक्टर पिकांपैकी १ हजार ६९८ इतके क्षेत्र संरक्षित केले आहे. एक रूपयांत विमा योजना गुंडाळल्याचा हा परिणाम मानला जात आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात खरीप हंगामात सर्वाधिक क्षेत्रावर भातपिक लागवड केली जाते. जिल्ह्यातील भातपिक लागवडीखालील क्षेत्र यावर्षी ६ ते ८ हजार हेक्टरने घटले आहे. कृषी विभागाच्या अंदाजानुसार यावर्षी ५४ हजार हेक्टरवर भातपिक लागवड झाली आहे. याशिवाय ३ हजार हेक्टरवर नाचणी लागवड झाली आहे. खरीप हंगाम पिक विमा योजनेत भात आणि नाचणी या दोन्ही पिकांचा समावेश आहे. अतिवृष्टी, पुर, वादळीवारे यासह विविध नैसर्गिक आपत्तीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून शासनाने खरीप हंगामातील पिकांसाठी पिक विमा योजना राबविण्याचा निर्णय घेतला.
गेल्या वर्षीची १ रूपयांतील पिक विमा योजना गुंडाळून यावर्षी नव्या निकषात योजना आणली. सुधारीत पिक विमा योजनेत भातपिकाकरीता हेक्टरी ४५७.५ रूपये तर नाचणी पिकाकरीता हेक्टरी १०० रूपये भरून विमा क्षेत्र संरक्षित करावे लागत आहे. त्याचा मोठा विपरित परिणाम या योजनेवर झाला आहे. गेल्या वर्षी १ रूपयांत पिक विमा असल्याने जिल्ह्यातील २४ हजार २७२ भात आणि नाचणी उत्पादक शेतकऱ्यांनी ५ हजार २१८ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित केले होते. परंतु, यावर्षी सुरूवातीपासून या योजनेला थंड प्रतिसाद शेतकऱ्यांमधून मिळाला. १४ सप्टेंबरला या योजनेची मुदत संपली आहे. जिल्ह्यातील भात आणि नाचणी अशा केवळ ८ हजार ९८० शेतकऱ्यांनी १ हजार ६९८ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित केले आहे. यामध्ये बिगर कर्जदार ७९१५ आणि कर्जदार १०४३ शेतकऱ्यांचा समावेश आहे. एकूण भात पिक लागवडीखालील क्षेत्राचा विचार करता केवळ ३ टक्के भातपिक क्षेत्र खरीप विमा योजनेखाली संरक्षित करण्यात आले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ३२ टक्के विमा क्षेत्र सरंक्षित करण्यात आले आहे. शेतकरी संख्येत देखील १५ हजार २९२ शेतकऱ्यांची घट झाली आहे. एक रूपयांत विमा योजना गुंडाळल्याचा हा परिणाम मानला जात आहे.
कोट
कृषी विभागाचे सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी खरीप विमा योजनेत अधिकाधिक भात, नाचणी उत्पादक शेतकरी सहभागी व्हावे याकरीता प्रयत्न केले. परंतु, तरीदेखील अपेक्षित यश आलेले नाही.
- निरंजन देशमुख, कृषी अधिकारी, वैभववाडी
कोष्टक
वर्ष*शेतकरी संख्या*क्षेत्र (हेक्टरमध्ये)*विमा रक्कम (रुपयांमध्ये)
२०२४*२४८७२*५२१८*१
२०२५*८९५८*१६९८*४५७
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.