माजी विद्यार्थ्यांच्या योगदानाने शाळा पुन्हा उजळणार

माजी विद्यार्थ्यांच्या योगदानाने शाळा पुन्हा उजळणार

Published on

swt2516.jpg
N94209
आंबडोसः व्हाळवाडी जिल्हा परिषद शाळेतील माजी विद्यार्थी मेळाव्यातील एक क्षण.

माजी विद्यार्थ्यांच्या योगदानाने शाळा पुन्हा उजळणार
मेळाव्यांमधून लाखोंची मदतः मुख्य कार्यकारी अधिकारांच्या आवाहनाला प्रतिसाद
विनोद दळवी ः सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २५ ः मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियान अंतर्गत जिल्हा परिषद शाळांमध्ये शैक्षणिक उठाव होवून त्या शाळांना भौगोलिक आणि शैक्षणिक सुविधा उपलब्ध करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी प्रत्येक शाळेत माजी विद्यार्थी मेळावे घेवून आवाहन करण्याचे आदेश दिले होते. याला जिल्ह्यातून भरभरून प्रतिसाद लाभत आहे. आतापर्यंत शेकडोंच्या संख्येने शाळांचे माजी विद्यार्थी मेळावे झाले असून लाखोंनी रुपयांची आर्थिक मदत शाळांना प्राप्त झाली आहे. थकलेल्या पायांपासून उमेदितील पाऊले त्या ज्ञान मंदिराकडे वळू लागली आहेत.
गेल्या काही वर्षांत माजी विद्यार्थी मेळावे मोठ्या प्रमाणात होत आहेत. मात्र, हे मेळावे माध्यमिक शाळा किंवा कॉलेज विद्यार्थ्यांचे होतात. परंतु, जिल्ह्यात सध्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांतील माजी विद्यार्थ्यांचे मेळावे मोठ्या प्रमाणात होत आहेत. ज्या शाळेत उज्वल भविष्य घडविण्यासाठी आवश्यक असलेल्या शिक्षणाचा श्रीगणेशा केला, त्याच ज्ञान मंदिराकडे माजी विद्यार्थी म्हणून अनेकांचे पाय पुन्हा वळू लागले आहेत. यात थकलेल्या पायांपासून उमेद असलेल्या पायांचा समावेश आहे. जिल्ह्यात याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यात १३३५ जिल्हा परिषद शाळा असून त्यातील शेकडोंच्या संख्येने शाळांतील माजी विद्यार्थी मेळावे झाले आहेत.
राज्याने १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियान सुरू केले आहे. हे अभियान ग्रामीण भागातील सर्वांगीण विकासाला प्राधान्य देण्याच्या उद्देशाने राबविले जात आहे. शासनाच्या सर्व योजनांची सांगड घालून त्या जनतेपर्यंत पोहचविल्या जाणार आहेत. त्याच बरोबर शासनाने यात ग्रामीण भागातील प्रत्येक घटकाचा समावेश अपेक्षित धरला आहे. श्रमदान, आर्थिक मदत घेवून हे अभियान राबविण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने या अभियानात जिल्हा परिषद शाळांच्या इमारतीच्या भौतिक सुविधा, तसेच शैक्षणिक साहित्य उपलब्ध करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी प्रत्येक शाळेने माजी विद्यार्थी मेळावा घ्यावा, असे आदेश काढले आहेत. या आदेशाला जिल्ह्यातील माजी विद्यार्थ्यांनी मोठा प्रतिसाद देण्यास सुरुवात केली आहे. प्रत्येक शाळांच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून हे माजी विद्यार्थी मेळावे आयोजित करण्यात येत आहेत. या मेळाव्यात शाळेला संरक्षण भिंत, शाळेची रंगरंगोटी, शाळेच्या भिंती बोलक्या करण्यासाठी चित्रे काढणे, डिजिटलसाठी प्रोजेक्टर, फ्लेक्स, संगणक आदी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी येणारा खर्च माजी विद्यार्थ्यांनी संकलित करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्याला माजी विद्यार्थी आपली शाळा म्हणून उत्तम प्रतिसाद देत आहेत. हा प्रतिसाद पाहता अनेक वर्षे शासनाच्या निधीच्या प्रतीक्षेत असलेल्या शाळांना मोठा दिलासा मिळत असल्याचे बोलले जात आहे.

चौकट
शाळांच्या गरजा समोर
जिल्ह्यातील शाळांचे आतापर्यंत झालेले माजी विद्यार्थी मेळावे हे जास्तीतजास्त माजी विद्यार्थ्यांच्या पुढाकारातून झाले आहेत. हे विद्यार्थी स्वतःच पुढाकार घेत वर्ग मित्र मैत्रिणींची मोट बांधत आहेत. वर्गणी जमा करीत आपले स्नेहसंमेलन घेत आहेत. तसेच शाळेला सुध्दा मदत करीत आहेत. परंतु, जिल्हा परिषद शाळांच्या माजी विद्यार्थी मेळाव्यासाठी स्वतः शाळा पुढाकार घेत आहे. शाळेचे शिक्षक संपर्क साधून त्यांना एकत्रित आणीत आहेत. तसेच त्यांचे मेळावे घेवून शाळेची गरज समोर ठेवत आहेत.

कोट
मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियान अंतर्गत जिल्हा परिषदेच्या प्रत्येक शाळांना माजी विद्यार्थ्यांचा मेळावा घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात मोठ्या संख्येने मेळावे घेण्यात येत आहेत. याबाबत निश्चित आकडेवारी अद्याप प्राप्त नाही. ती घेण्याचे काम सुरू आहे. मात्र, जिल्ह्यात या संकल्पनेला चांगला प्रतिसाद लाभत आहे.
- डॉ. गणपती कमळकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी

Marathi News Esakal
www.esakal.com