''नमो नेत्र संजीवनी'' उपक्रमाचा लाभ घ्या
''नमो नेत्र संजीवनी''
उपक्रमाचा लाभ घ्या
सिंधुदुर्गनगरीः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ‘नमो नेत्र संजीवनी स्वास्थ्य अभियान पंधरवडा’ या विशेष उपक्रमाला १७ सप्टेंबरपासून सुरुवात झाली आहे. या उपक्रमाचे उद्घाटन कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयात पालकमंत्री नीतेश राणे यांच्या हस्ते करण्यात आला. हा उपक्रम २ ऑक्टोबरपर्यंत घेण्यात येणार असून, तज्ज्ञांमार्फत रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात येणार आहे. दृष्टीदोष असणाऱ्या रुग्णांना शासनामार्फत मोफत चष्मे पुरविण्यात येणार आहे. या अभियानामध्ये आढळलेल्या मोतिबिंदू रुग्णांची मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया जिल्हा रुग्णालयात करण्यात येणार आहे. नेत्रविषयक इतर आजारांवर सुध्दा उपचार होणार आहे. या अभियानात २३ सप्टेंबर अखेर १ हजार २९० रुग्ण सहभागी झाले. यात २४५ रुग्णांनी मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी नोंदणी झाली. तसेच ५६६ रुग्णांची मोफत चष्म्यासाठी नोंदणी झाली, तर ३५८ रुग्णांची मोतिबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यामध्ये तालुका व गावपाळीवर नेत्र तपासणी शिबिरे आयोजित केली जात आहेत. सर्व नागरिकांनी या शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी केले आहे.
.......................
माजी सैनिकांना
कौशल्य प्रशिक्षण
सिंधुदुर्गनगरीः जिल्ह्यातील माजी सैनिकांना कौन्सिलिंगद्वारे कौशल्य प्रशिक्षण देण्याकरिता १० ऑक्टोबरपर्यंत नाव नोंदणी करावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केले आहे. संचालक, सैनिक कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी अन्वये ज्ञानदीप समाज विकास संस्था संचलित कॅरिअर डेव्हलपमेंट व रिसर्च इन्स्टिटयूट, ही संस्था पुणे येथे मोठ्या प्रमाणात कौशल्य विकास प्रशिक्षणाचे काम करत आहे. ज्या माजी सैनिकांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात काम करण्याची इच्छा आहे, त्यांना फोनव्दारे कौन्सिलिंग करून प्रशिक्षण देणार असल्याचे संस्थेने कळविले आहे. जिल्ह्यातील मागील १० वर्षांत सैन्यातून निवृत्त झालेल्या माजी सैनिकांनी सैन्यसेवा पुस्तक, माजी सैनिक ओळखपत्रासह जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सिंधुदुर्ग येथे १० ऑक्टोबरपर्यंत भेट देऊन नाव नोंदणी करावी.
...................
माजी सैनिक, विधवांना
ऑनलाईन अर्ज सुविधा
सिंधुदुर्गनगरीः जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी यांना केंद्रीय सैनिक बोर्ड, नवी दिल्ली यांनी ‘के.एस.बी.’ला ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्याचे संकेतस्थळ अद्ययावत करून ते सर्वांसाठी सुरू केले आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी दिली. जिल्ह्यातील संबंधित माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी यांना के.एस.बी. प्रणालीव्दारे पाल्यांची शैक्षणिक प्रकरणे व इतर अर्ज संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्यात यावे. के.एस.बी.च्या संकेतस्थळवर आता लाभार्थ्यांची ई-मेल पडताळणी अनिवार्य केली आहे. पात्र माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी यांनी याची नोंद घ्यावी व या कार्यालयाला सहकार्य करावे. अधिक माहितीसाठी संपर्क करावा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.