पान एक-तीन हजार हेक्टर भातावर नुकसानीचे सावट
९४३२६
तीन हजार हेक्टरांतील भात संकटात
सिंधुदुर्गात शेतकरी चिंतातूर : सततच्या पावसाने कापणीयोग्य पीक भुईसपाट होण्याची भीती
सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. २५ ः जिल्ह्यातील अडीच ते तीन हजार हेक्टरवरील भात पीक परिपक्व झाले आहे; मात्र सतत पडणाऱ्या पावसामुळे परिपक्व झालेले पीक जमिनीवर कलंडण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच पुढील काही दिवस जोरदार पावसाची शक्यता असल्याने या सर्व पिकांवर नुकसानीचे सावट घोंघावत आहे. त्यामुळे भात उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
जिल्ह्यात मॉन्सूनपूर्व पावसाला ८ मे पासून सुरुवात झाली. त्यानंतर २४ मेपर्यंत सतत पाऊस पडत होता, तर २५ ला मॉन्सून दाखल झाला. शेतकऱ्यांचे सर्व अंदाज चुकले. त्यामुळे भात रोपवाटिकांची कामे विस्कळीत झाली. तीन-चार टप्प्यात भात रोपवाटिकांची कामे करण्यात आली होती. ज्याप्रमाणे रोपवाटिका झाल्या, त्याचप्रमाणे तीन-चार टप्प्यात भातरोप पुनर्लागवड झाली. काही ठिकाणी १५ जून ते ऑगस्टचा पहिला आठवडा या कालावधीत लागवडीची कामे सुरू होती. पहिल्या टप्प्यात साधारणपणे अडीच ते तीन हजार हेक्टरवरील भात पीक परिपक्व झाले आहे. हे भात पीक परिपक्व होऊन पंधरापेक्षा अधिक दिवस झाले आहेत; मात्र गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. काही भागात जोरदार तर काही भागात हलक्या सरी पडत आहेत. त्यामुळे परिपक्व झालेले भात पीक आता जमिनीवर कोसळण्यास सुरुवात झाली आहे. पिकलेल्या भातांच्या लोंब्या चिखलात पडत असल्याने शेतकऱ्यांची बैचेनी वाढली आहे. एकीकडे पीक जमिनीवर कोसळत असताना दुसरीकडे पावसाचा जोर जिल्ह्यात कायम आहे. हवामान विभागाने २ ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यात पावसाचा अंदाज दिल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. जोपर्यंत पाऊस थांबत नाहीत, तोपर्यंत भात पिकांची कापणी करणे शक्य नसल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. पुढील सहा-सात दिवसांत भात पिकांची कापणी करता आली नाही, तर मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तीन हजार हेक्टरवरील भातपिकांवर नुकसानीचे सावट घोंघावत आहे.
२७, २८ ला
ऑरेंज अलर्ट
जिल्ह्यात काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसाचा जोर वाढणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. हवामान विभागाने उद्या (ता. २६) येलो अलर्ट तर, २७ आणि २८ सप्टेंबरला ऑरेंज अलर्ट दिला आहे. या कालावधीत वारे ताशी ३० ते ४० कि.मी. वेगाने वाहणार असून विजांच्या गडगडाटांसह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पाऊस झाला तर जिल्ह्यातील भात पिकावर मोठे संकट ओढवणार आहे.
नवी पीक विमा
योजना कूचकामी
जुन्या पीक विमा योजना गुंडाळून शासनाने नवी योजना यावर्षीपासून लागू केली. या योजनेंतर्गत एखाद्या शेतकऱ्याचे नुकसान झाले तर कृषी विभाग किंवा विमा कंपनीला सूचना देण्याची तरतूद नाही. सरसकट नुकसान झाले आणि पीक कापणीत पाच वर्षांच्या तुलनेत उत्पादन कमी आले, तरच या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना योजनेचा फायदा होण्याची शक्यता कमी आहे.
कोट
पहिल्या टप्प्यात लागवड केलेले पाच टक्के पीक परिपक्व झालेले आहे. या पिकाची कापणी पावसामुळे रखडली आहे. शेतकऱ्यांनी पावसाने उघडीप देताच भात पिकाची कापणी करावी. कापणी केलेले पीक सुरक्षितपणे ठेवावे.
- निरजंन देशमुख, तालुका कृषी अधिकारी, वैभववाडी
कोट
सतत पडणाऱ्या पावसामुळे भात पिकाला फुलोरा येतानाच पीक कोलमडून जमिनीवर कोसळले आहे. त्यातच अजूनही पाऊस कमी झालेला नाही. त्यामुळे हे पीक पूर्णतः वाया जाणार आहे.
- राजाराम लाड, भात उत्पादक, नापणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.