ग्रामपंचायतीत एआय; ‘सभासार’मुळे कारभारावर राहणार केंद्राचा ‘वॉच’
94555
ग्रामपंचायतीतही ‘एआय’; ‘सभासार’मुळे कारभारावर राहणार केंद्राचा ‘वॉच’
जिल्ह्यात २ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी; ग्रामीण भागात हायटेक क्रांतीसाठी पाऊल
विनोद दळवी ः सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २६ ः ग्रामीण भारताच्या शासनव्यवस्थेत हायटेक क्रांती घडवून आणण्यासाठी केंद्र सरकारने ‘सभासार’ प्रणाली लागू करण्याची घोषणा केली आहे. जिल्ह्यातील सर्व ४३३ ग्रामपंचायतींमध्ये २ ऑक्टोबरच्या ग्रामसभेपासून या टूलचा वापर सुरू होणार आहे. यामुळे सरपंचापासून ते ग्रामपंचायत अधिकारी कशाप्रकारे ग्रामपंचायतीचा कारभार हाकतात यावर थेट केंद्राची नजर राहणार आहे.
ग्रामीण भारताच्या शासनव्यवस्थेत हायटेक क्रांती घडवून आणण्यासाठी केंद्राने ‘सभासार’ प्रणाली लागू करण्याची घोषणा केली आहे. या प्रणालीद्वारे ग्रामपंचायत आणि पंचायत समितीच्या कारभारावर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) मदतीने देखरेख ठेवली जाणार आहे. त्यामुळे ग्रामीण स्वराज्य संस्थांचे कामकाज अधिक पारदर्शक, लोकाभिमुख आणि उत्तरदायी करण्याचे केंद्राने उद्दिष्ट आहे. ग्रामपंचायतींच्या कारभारात अनेकदा सरपंच आणि ग्रामसेवकांकडून मनमानी होत असल्याच्या तक्रारी वारंवार समोर येतात. अनेक ठिकाणी ग्रामसभा केवळ कागदोपत्रीच घेतली जाते. त्यामुळे गावांच्या विकास योजनांवर परिणाम होतो आणि निधीचा योग्य वापर होत नाही. हीच परिस्थिती बदलण्यासाठी सभासार टूलचा वापर केला जाणार आहे.
-----------------
‘सभासार’ आहे तरी काय?
१) ‘सभासार’ ही ‘एआय’ संचलित बैठक सारांश प्रणाली आहे. यामध्ये ग्रामपंचायतींच्या बैठकीचे इतिवृत्त, घेतलेले निर्णय, त्यांचे डेटा विश्लेषण या सर्व गोष्टींची नोंद ‘एआय’द्वारे केली जाईल. यामुळे बैठकींचे रेकॉर्डिंग, रिपोर्टिंग आणि पारदर्शकता वाढेल. ग्रामविकास निधीचा योग्य वापर झाला का, घेतलेले निर्णय अंमलात आले का, यावर थेट देखरेख ठेवता येईल.
२) पंचायतीराज मंत्रालय, भारत सरकार यांनी ग्रामसभेच्या इतिवृत्ताचे दस्ताऐवजीकरण कृत्रिम बुद्धिमत्ताद्वारे करण्यासाठी सभासार हे टूल विकसित केले आहे. मंत्री, पंचायतीराज मंत्रालय, भारत सरकारच्या हस्ते १४ ऑगस्टला ‘सभासार’ या टूलचे उद्घाटन केले आहे. या टूलद्वारे बैठक, सभांच्या इतिवृत्ताचे व्हिडीओ, ऑडीओ रेकॉर्डिंग इंग्रजी व स्थानिक भाषेत स्वयंचलितरित्या करता येणार आहे. यामुळे मनुष्यबळ, वेळ व कामाचा ताण कमी होण्यास मदत होणार असून बैठक, सभांच्या इतिवृत्ताच्या नोंदणीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामुळे मर्यादित वेळत इतिवृत्त लेखन पूर्ण होणार असून वेळेत दस्ताऐवजीकरण करणे सोपे होणार आहे.
३) केंद्रीय पंचायत राज मंत्रालय, भारत सरकार यांच्याकडील ९ सप्टेंबरच्या अहवालानुसार १५ ऑगस्टला झालेल्या ग्रामसभांसाठी सभासार टूलचा वापर राज्यातील केवळ ८७६ ग्रामपंचायतीनी केल्याचे दिसून आले आहे. देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत ही संख्या अत्यंत नगण्य आहे. सिंधुदुर्गात एकाही ग्रामपंचायतीने १५ ऑगस्टला सुरवात केली नाही.
४) पंचायतीराज मंत्रालय, भारत सरकार यांनी २ ऑक्टोबरच्या ग्रामसभेत राज्यातील सर्वच ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभांसाठी सभासार टूलचा वापर करण्याबाबत कळविले आहे. त्यानुसार आपल्या जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभांसाठी व मासिक बैठका व इतर अनुषंगिक बैठकांसाठी सभासार टूलचा वापर ग्रामसभेच्या इतिवृत्ताचे दस्तावेजीकरण करण्यासाठी संबंधितांना सूचना दिल्या आहेत. त्यामुळे सिंधुदुर्गात २ ऑक्टोबरपासून सर्व ४३३ ग्रामपंचायतीत या टूलची सुरवात होणार आहे.
-----------------
कोट
जिल्ह्यात २ ऑक्टोबरला होणाऱ्या ग्रामसभा केंद्राने विकसित केलेल्या सभासार प्रणालीद्वारे घेण्याचे आदेश जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना दिले आहेत. जिल्ह्यात पहिल्यांदाच या प्रणालीचा वापर होत असल्याने आवश्यक नियोजन करण्याचे या आदेशात नमूद केले आहे.
- जयप्रकाश परब, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत), जिल्हा परिषद
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.