भोसले फार्मसीमध्ये फार्मासिस्ट दिन
94461
प्रामाणिक सेवेसह आदर्शतेचा गौरव
भोसले फार्मसीमध्ये ‘फार्मासिस्ट दिन’; देवगडच्या कुळकर्णींना ‘फार्मासिस्ट ऑफ द इयर’
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २६ ः यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये जागतिक फार्मासिस्ट दिन आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. फार्मा लोगो, फार्मा स्लोगन, फार्मा रांगोळी अशा विविध स्पर्धांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला वाव मिळाला. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरलेला ‘फार्मासिस्ट ऑफ द इयर’ पुरस्कार यावर्षी देवगड येथील ज्येष्ठ फार्मासिस्ट श्रीपाद कुळकर्णी यांना प्रदान करण्यात आला. सत्तर वर्षांहून अधिक काळ त्यांचे कुटुंब फार्मसी व्यवसायाच्या माध्यमातून देवगडवासीयांची
सेवा करत आहे.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रत्नागिरी व सिंधुदुर्गचे सहाय्यक आयुक्त (अन्न व औषध प्रशासन) शशिकांत यादव उपस्थित होते. त्यांनी भारतीय औषध उद्योग, देशातील वैद्यकीय व्यवस्था आणि फार्मासिस्ट समुदायाची जबाबदारी यावर भाष्य केले. ‘‘औषध हे जीवन वाचवणारा घटक आहे, त्यामुळे फार्मासिस्टने कोणताही शॉर्टकट न वापरता प्रामाणिकपणे उच्च शिक्षण घेऊन या क्षेत्रात तज्ज्ञ होणे गरजेचे आहे,’’ असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. श्री. कुळकर्णी म्हणाले, ‘‘सचोटी, प्रामाणिकपणा आणि शिस्त हे गुण फार्मासिस्टसाठी अत्यावश्यक आहेत. अनेक ग्रामीण भागांत जेथे वैद्यकीय सेवा अपुरी पडते, तेथे फार्मासिस्ट हा उपचाराचा महत्त्वाचा दुवा ठरतो. लोकांचा विश्वास हाच खरा सन्मान. आज मिळालेला पुरस्कार हा आमच्या कुटुंबाने केलेल्या प्रामाणिक सेवेचे फळ आहे.’’ सिंधुदुर्ग जिल्हा केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष आनंद रासम म्हणाले, "गेल्या दहा वर्षांपासून आमची संघटना व कॉलेज संयुक्तपणे हा दिन साजरा करत आहे. या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करणे आणि समाजाशी फार्मासिस्टचा सशक्त संवाद घडवणे हेच आमचे उद्दिष्ट आहे.’’ कॉलेजचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत-भोसले यांनी, आदर्श फार्मासिस्ट कसा असावा याची विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष जाणीव व्हावी आणि अशा आदर्श व्यक्तींचे गुण त्यांनी अंगीकारावेत, यासाठीच आम्ही ‘फार्मासिस्ट ऑफ
द इयर’ हा पुरस्कार सुरू केला. कुलकर्णी यांच्यासारख्या ज्येष्ठ फार्मासिस्टकडून प्रेरणा घेऊन आमचे विद्यार्थीही जबाबदार व आदर्श फार्मासिस्ट बनतील, हीच आमची अपेक्षा आहे. भोसले नॉलेज सिटी ही गुणवत्तापूर्ण शिक्षण, नैतिक मूल्ये व शिस्त या तत्त्वांसाठी नेहमीच कटिबद्ध आहे, असे सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला डी. फार्मसी प्राचार्य डॉ. सत्यजित साठे यांनी भारतीय औषध उद्योगाची सुरुवात, विस्तार व भारताचे जागतिक औषधनिर्मिती क्षेत्रातील योगदान यावर माहिती दिली. भारत हा आज जगातील आघाडीचा औषध निर्यातदार आणि व्हॅक्सीन उत्पादनात अग्रस्थानी असलेला देश आहे, असे ते म्हणाले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. विजय जगताप यांनी केले. कॉलेजच्या स्थापनेला दहा वर्षे पूर्ण झाल्याबद्दल विशेष स्मरणिकेचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर संस्थेच्या अध्यक्षा अॅड. अस्मिता सावंतभोसले, श्री. कुळकर्णी यांच्या पत्नी व नात, संस्थेच्या प्रशासकीय अधिकारी सुनेत्रा फाटक, सावंतवाडी तालुका केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष विनायक दळवी, संतोष राणे, अमर गावडे, सचिन बागवे, प्रसाद सप्ते, ग्रेगरी डान्टस आदी फार्मासिस्ट उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन प्रा. अंकिता नेवगी व डॉ. प्रशांत माळी तर सूत्रसंचालन प्रा. गौरी भिवशेठ यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.