दिव्यांगांच्या नोंदणीसाठी १० ऑक्टोबरची मुदत
दिव्यांगांच्या नोंदणीसाठी
१० ऑक्टोबरची मुदत
मालवण : महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार मालवण नगरपरिषद कार्यक्षेत्रातील दिव्यांग व्यक्तींसाठी दारिद्र्य निर्मूलन योजनेअंतर्गत सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात ५ टक्के निधी राखीव ठेवला आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील व परिसरातील दिव्यांग व्यक्तींनी हयात प्रमाणपत्र व नवीन नोंदणीची कागदपत्रे १० ऑक्टोबरपर्यंत पालिकेत जमा करावीत, असे आवाहन प्रभारी मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी केले आहे. शहरातील ज्या दिव्यांग व्यक्तींनी यापूर्वीच मालवण नगरपरिषदेकडे नोंदणी केली आहे त्या व्यक्तींनी आपले हयातीचे प्रमाणपत्र १० ऑक्टोबरपर्यंत मालवण नगरपरिषद कार्यालयात कार्यालयीन वेळेत जमा करणे बंधनकारक आहे. वेळेत प्रमाणपत्र जमा न केल्यास योजनेच्या लाभापासून ते वंचित राहण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त मालवण नगरपरिषद हद्दीतील ज्या दिव्यांग व्यक्तींनी अद्याप त्यांची नोंदणी केलेली नाही. अशा सर्व व्यक्तींनीही आवश्यक कागदपत्रांसह नगरपरिषद कार्यालयात कार्यालयीन वेळेत भेट देऊन आपली नोंदणी तातडीने करून घ्यावी, असे आवाहनही आयोजकांनी केले आहे.
-------
मालवण येथे आज
‘नवदुर्गांच्या नवदुर्गा’
मालवण ः श्री शिवराज मंचतर्फे उद्या (ता.२७) किल्ले सिंधुदुर्ग व बंदर जेटी येथे ‘नवदुर्गांच्या नवदुर्गा’ या ऐतिहासिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
नवरात्रोत्सवानिमित्त किल्ले सिंधुदुर्गावरील श्री जरीमरी देवी व श्री भवानी देवी यांच्या ओटी भरण्याचा कार्यक्रम होणार आहे. कवी भूषण, इतिहास अभ्यासक पंकज भोसले, शिवशंभू विचारमंच व ममता भोसले यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडेल. स्वराज ढोल पथक व एएस १ प्लस पथक (बिडवाडी) यांच्यातर्फे शिववंदना व मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक सादर केले जाईल. विशेष म्हणजे अठरा मुली मर्दानी खेळांचे सादरीकरण करणार आहेत. यात सायंकाळी ४ वाजता किल्ले सिंधुदुर्ग येथे देवी ओटी भरणे कार्यक्रम होईल. त्यानंतर ४.३० वाजता बंदर जेटी येथे ढोल पथक आणि मर्दानी खेळ कार्यक्रम होणार आहे.
------------------
कणकवलीत सोमवारी
ईपीएस-९५ ची बैठक
कुडाळ ः राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटना, सिंधुदुर्ग विभागातर्फे ईपीएस-९५ पेन्शनधारकांची बैठक सोमवारी (ता.२९) सकाळी १०.३० वाजता कणकवली येथे होणार आहे. भविष्य निर्वाह निधी कार्यालय (कोल्हापूर)चे उपायुक्त मार्गदर्शन करणार असून, पेन्शन बंद असलेले, सुरू न झालेले किंवा विधवा पत्नीला पेन्शन न मिळणारे कर्मचारी कागदपत्रांसह उपस्थित राहवे, असे आवाहन करण्यात आले आहे.
--------------
वरवडे स्कूलचे
फुटबॉलमध्ये यश
कणकवली ः माणगाव येथे झालेल्या जिल्हा फुटबॉल स्पर्धेत ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या (वरवडे) १७ वर्षांखालील मुलांच्या गटाने उपविजेतेपद पटकावले. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. विद्याधर तायशेटे, उपाध्यक्ष मोहन सावंत, कार्याध्यक्ष बुलंद पटेल आदींनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
----
सावंतवाडीत
आज वॉकेथॉन
सावंतवाडी ः स्नेह नागरी पतसंस्था, सावंतवाडीच्या रौप्यमहोत्सवानिमित्त ज्येष्ठ नागरिकांसाठी वॉकेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा उद्या (ता.२७) सकाळी ६ वाजता जनरल जगन्नाथराव भोसले उद्यानात होणार आहे.
---------------
मल्लखांब स्पर्धेत
‘पणदूर’चे यश
पणदूर ः मालवण येथे झालेल्या जिल्हास्तरीय मल्लखांब व रोप मल्लखांब स्पर्धेत शिवाजी इंग्लिश स्कूल, पणदूरच्या विद्यार्थ्यांनी उत्तम यश मिळविले. १७ वर्षांखालील गटात सागर निकम (प्रथम), वनिता निकम (प्रथम), रोहित निकम (तृतीय), तसेच १४ वर्षांखालील गटात उजा पवार (प्रथम) यांनी यश मिळविले. सर्व विद्यार्थ्यांची निवड विभागीय स्पर्धेसाठी झाली आहे.
---------------
आरोग्य शिबिरला
परुळेत प्रतिसाद
परुळे ः येथील आयुष्मान आरोग्य मंदिरात ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ या अभियानांतर्गत आरोग्य शिबिर पार पडले. याचे उद्घाटन सरपंच नीलेश सामंत यांच्या हस्ते झाले. डॉ. शलाका सावंत, डॉ. सागर पवार, डॉ. नीळकंठ यांनी तपासण्या केल्या. रक्तदाब, मधुमेह, ईसीजी, नेत्रतपासणी, हिमोग्लोबिन, कर्करोग तपासणी आदी सेवा उपलब्ध होत्या. एकूण १०९ लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.