कुलदैवतेच्या घटावर अठरा धान्यांची पेरणी
-rat२६p३१.jpg-
२५N९४५५७
मंडणगड : कुलदैवतेच्या गाभाऱ्यात घट मांडणी करून केलेली अठरा धान्य पेरणी.
----
कुलदैवतेच्या घटावर अठरा धान्यांची पेरणी
नवरात्रात घटस्थापना ; शेतकरी, निसर्गासह देवत्वाचे भावबंध
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. ३ : कोकणात नवरात्र उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा होत असून पहिल्या दिवशी कुलदैवतेच्या घटावर पेरणी केलेल्या अठरा धान्यांना अंकुर फुटले आहेत. दसऱ्याच्या दिवशी या धान्यांचे उगवलेले अंकुर (रो) उपटून देवीला वाहण्याची परंपरा ग्रामीण भागात जोपासली जाते.
गावोगावी कुलस्वामिनीचे घट बसवून नऊ दिवस षोडशोपचार पूजन सुरू आहे. प्रत्येक घराण्यांच्या परंपरा व रुढीनुसार हा भक्तिमय उत्सव साजरा केला जात आहे. यानिमित्ताने शेतकरी व कारागीर आपापली शेती-अवजारे व हत्यारे यांचीही पूजनपरंपरा आजही कायम आहे. नवरात्रातील घटस्थापना हा मुख्य विधी मानला जातो. यावेळी देव्हाऱ्यातील देवींच्या मूर्ती स्वच्छ धुवून त्यांना स्थानापन्न केले जाते. समोरील मातीच्या वेदीवर तांब्याच्या घड्यात नारळ ठेवून घटस्थापना केली जाते. त्याभोवती मातीमध्ये मिसळून चवळी, पावटे, उडीद, तीळ, नाचणी, भात, वरी, जोंधळे अशा अठरा धान्यांची पेरणी करण्यात आली आहे. नवरात्रभर रोज घटाची षोडशोपचार पूजा सुरू असून नऊ दिवस झेंडू किंवा रानफुलांच्या माळा केल्या जात आहेत.
चौकट
धान्याची भरभराटीची प्रार्थना
सध्या शेतात पिके तयार होत आहेत. ती घरी आणण्याची लगबग सुरू होणार आहे. अशा वेळी केली जाणारी घटस्थापना शेतकऱ्यांसाठी अधिक महत्त्वाची ठरते. यावेळी घराघरात धनधान्यांची भरभराट व्हावी, अशी प्रार्थना करण्यात येते.