‘समृद्ध कोकण’ हीच बॅ. पैंना आदरांजली
94741
‘समृद्ध कोकण’ हीच बॅ. पैंना आदरांजली
नीतेश राणे ः वेंगुर्ले समुदाय केंद्रात जयंतीनिमित्त अभिवादन
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. २७ ः कोकण विकास परिषदेचे अधिवेशन बोलावून बॅ. नाथ पै यांनी कोकण विकासाच्या दृष्टीने पहिले पाऊल उचलले. त्या परिषदेचे अध्यक्ष या नात्याने त्यांनी कोकण विकासाचा सूत्रबद्ध आराखडा सादर केला. कोकण रेल्वे त्यांचे स्वप्न होते. त्यांनी ही मागणी आग्रहाने अधिवेशनात लावून धरली. कोकण विकास परिषदेच्या रूपाने एक सर्वपक्षीय व्यासपीठ निर्माण करून कोकणवासीयांना विकासासाठी एकत्र आणण्याचे काम केले. कोकणच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम केल्यास तीच त्यांना खऱ्या अर्थाने आदरांजली ठरेल, असे प्रतिपादन राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नीतेश राणे यांनी केले.
येथील बॅ. नाथ पै समुदाय केंद्र येथे उत्कृष्ट स्वातंत्र्यसैनिक, संसदपटू बॅ. नाथ पै यांच्या १०३ व्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री राणे यांच्या हस्ते झाले. व्यासपीठावर आमदार दीपक केसरकर, तहसीलदार ओंकार ओतारी, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, माजी सभापती जयप्रकाश चमणकर, बॅ. नाथ पै यांच्या नात तथा बॅ. नाथ पै फाउंडेशन फॉर कोकण डेव्हलपमेंटच्या अध्यक्षा आदिती पै, बॅ. नाथ पै संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर, सौ. गाळवणकर, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, भाजप तालुकाध्यक्ष पप्पू परब आदी उपस्थित होते.
पालकमंत्री म्हणाले, ‘‘बॅ. नाथ पै यांचे भाषण ऐकण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू हे संसदेत आवर्जून उपस्थित राहत असत. कोकणच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन खांद्याला खांदा लावून काम करायला हवे, ही संकल्पना त्यावेळी नाथ पै यांनी मांडली. त्यांचे विचार केवळ शब्दांमधून नव्हे, तर कृतीतून दाखविण्याची आज गरज आहे.’’ आदिती पै यांनी प्रास्ताविक केले. जयप्रकाश चमणकर यांनी विचार मांडले.
........................
‘चिपी’चे नामकरण होईल तो सुवर्णक्षण!
आमदार केसरकर म्हणाले, ‘‘बॅ. नाथ पै यांची आठवण प्रत्येकाच्या हृदयात खोलवर जपली आहे. उत्कृष्ट संसदपटू म्हणून त्यांची ओळख होती. कोकणात समाजवादी विचारसरणीचे विचार त्यांनी रुजवले. त्यांच्या कार्याची कायमस्वरुपी आठवण टिकविण्यासाठी सिंधुदुर्ग चिपी विमानतळाला त्यांचे नाव देण्यात येईल, तो कोकणासाठी सुवर्णक्षण ठरेल. त्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोत, असे प्रतिपादन आमदार केसरकर यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.