‘देवगड’ आराखड्यात पारदर्शकतेचा अभाव
94763
‘देवगड’ आराखड्यात पारदर्शकतेचा अभाव
काँग्रेसचा आरोप; जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडली कैफियत
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २७ ः येथील देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या संभाव्य शहर विकास आराखड्याच्या अनुषंगाने येथील तालुका काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे कैफियत मांडली. आराखड्याच्या संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता, प्रामाणिकपणा तसेच नागरिकांशी प्रामाणिक संवाद नसल्याकडे लक्ष वेधून नागरिकांची दिशाभूल केली जात असल्याचे नमूद करून काही प्रश्न उपस्थित करण्यात आले.
आराखड्याच्या अनुषंगाने काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी धोडमिसे यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी युवक जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर, तालुकाध्यक्ष उमेश कुळकर्णी, युवक तालुकाध्यक्ष सूरज घाडी, काँग्रेसचे जिल्हा व्यापार उद्योग अध्यक्ष तुषार भाबल, दशरथ उर्फ बंड्या मेस्त्री, विनायक म्हापसेकर आदी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, देवगड-जामसंडे नगरपंचायत शहर विकास आराखडा तयार केला आहे. या आराखड्यात शेती, जमीन, पिढीजात जमिनी यांवर अनेक प्रकारची आरक्षणे दाखवली आहेत. हा आराखडा पुढील सुमारे २०-२५ वर्षांसाठी लागू केला आहे. मात्र, या संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता नाही, प्रामाणिकपणा नाही आणि नागरिकांशी प्रामाणिक संवाद नाही. उलट नागरिकांची दिशाभूल केली जात आहे. विकास आराखडा सर्वांसाठी खुल्या ठिकाणी लावण्याऐवजी उपनगराध्यक्षांच्या कक्षामध्ये लावला आहे. आराख़डा नेमका केव्हा लावला, याची पंचयादी नाही. कर्मचारी वेगवेगळी माहिती देत आहेत. शासनाची सुचना, प्रसिद्धीपत्रक हे नागरिकांसाठी सुचना फलकावर लावलेले नाही. २५ सप्टेंबरला सात दिवस उलटूनही वाडीवार वाहनावरून एकही उद्घोषणा केलेली नाही. देवगड जामसंडे या मोक्याच्या ठिकाणी यासंदर्भात सूचना फलक नाहीत. अनेक नगरसेवकांनाही योग्य माहिती दिलेली नाही. नकाशात केवळ सर्व्हे क्रमांक टाकले आहेत. हिस्से क्रमांक स्पष्ट केलेले नाहीत, त्यामुळे नागरिकांना हरकत घेणे अडचणीचे झाले आहे. सर्वच ठिकाणी पूर्ण सर्व्हे क्रमांकावर आरक्षण टाकले आहे, जिथे प्रत्यक्षात गरजच नाही. शुल्क भरून नकाशाची प्रत मागितल्यावर ती नागरिकांना देत नाहीत. नगरपंचायतीचे अभियंता नागरिकांना थेट ‘आमच्याकडे माहिती नाही, जिल्हा नगररचना कार्यालयाला विचारा,’ असे सांगतात. नगरपंचायतीचे मुख्याधिकारी देवगडला हजरच नसतात, त्या कणकवलीला असतात. त्यामुळे नागरिकांना यासंदर्भात योग्य मार्गदर्शन मिळू शकत नाही. या सर्वांमुळे नागरिक नाराज आहेत, कारण पारदर्शकता शून्य आहे.
.......................
प्रसंगी न्यायालयात जाण्याचा इशारा
आराखड्याबाबत जनता अनभिज्ञ आहे. काही ठराविक मंडळींनी बंद दाराआड आपल्या सोयीनुसार आराखडा बनवल्याचे आराखडा निरीक्षण केल्यावर भासत आहे. जनतेला विश्वासात न घेता आराखडा कायम केल्यास प्रसंगी न्यायालयीन लढाई लढण्यास मागे हटणार नाही, असा सज्जड इशारा काँग्रस पदाधिकाऱ्यांनी जामसंडे येथे पत्रकारांशी बोलताना दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.