वैभववाडीत सहकार भवन उभारणार
94818
वैभववाडीत सहकार भवन उभारणार
पालकमंत्री नीतेश राणे ः खरेदी-विक्री संघाच्या सहकार मेळाव्यात ग्वाही
सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. २७ ः कोकणात आर्थिक समृद्धी आणायची असेल तर सहकार हा एकमेव सक्षम पर्याय आहे. देशात आणि राज्यात सहकारासाठी पोषक वातावरण आहे. वैभववाडीतील सहकाराला बळकटी मिळण्यासाठी सहकार भवन आणि तालुका खरेदी-विक्री संघाच्या कार्यालयासाठी शासकीय भूखंड उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री नीतेश राणे यांनी येथे दिली.
सेवा पंधरावड्यानिमित्त तालुका खरेदी-विक्री संघातर्फे येथील मेजर कौस्तुभ रावराणे सभागृहात आज सहकार मेळाव्याचे आयोजन केले. या मेळाव्याला जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, संचालक दिलीप रावराणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष तुळशीदास रावराणे, संघाचे अध्यक्ष प्रमोद रावराणे, सहकार निबंधक बाळा परब, नासीर काझी, अरविंद रावराणे, जयेंद्र रावराणे, भालचंद्र साठे, सीमा नानिवडेकर, सुधीर नकाशे, अभिनव विचारे, सज्जन रावराणे, शारदा कांबळे, श्रध्दा रावराणे, अंबाजी हुंबे आदी उपस्थित होते. यावेळी खरेदी-विक्री संघाने जाहीर केलेल्या पुरस्कारांचे वितरण पालकमंत्री राणेंच्या हस्ते करण्यात आले.
पालकमंत्री राणे म्हणाले, ‘‘देशात आणि राज्यात सहकार क्षेत्रात काम करण्यासाठी पोषक वातावरण आहे. कृषी, सहकार क्षेत्राकरिता सुर्वणकाळ सुरू आहे. सहकारातून समृद्धी साधण्याची योग्य वेळ आली आहे. कोकणचे दरडोई उत्पन्न वाढवायचे असेल, तर सहकाराशिवाय दुसरा पर्याय नाही. सहकार क्षेत्रात प्रचंड ताकद आहे. त्यामुळे सहकार, कृषीवर आधारित चांगल्या प्रकल्पांचे प्रस्ताव येत्या काळात तयार करा, जेणेकरून रोजगारनिर्मिती होईल. अशा प्रस्तावांना मंजुरी देण्यासाठी पाठपुरावा करू. सहकाराच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रातून अनेक प्रस्ताव शासनाकडे येत असताना कोकणातून असे प्रस्ताव येणे अपेक्षित आहे. सिंधुदुर्गातील सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना पूर्ण ताकदीने पाठबळ दिले जाईल. खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष रावराणे यांनी मागणी केल्याप्रमाणे शासकीय भूखंड मिळवून देण्यात येईल. तसेच सुसज्ज असे सहकार भवनही उभारू.’’
मनीष दळवी म्हणाले, ‘‘सहकाराची विचारधारा घेऊन आम्ही पुढे चाललो आहोत. सहकाराला बळकटी मिळेल असे निर्णय शासन पातळीवर घेतले जात आहेत. शेती आणि शेतीपूरक व्यवसायांवर भर दिला जात आहे. दुग्धोत्पादन, दुग्ध प्रकिया, प्रकिया उद्योग उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. बाजार समितीच्या माध्यमातून मार्केट यार्ड उभे राहत आहे. त्याचा मोठा फायदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणार आहे. सहकार क्षेत्रातील कार्यकर्त्यांना बळ देणे आवश्यक आहे. येत्या काळात सहकार संस्थांसाठी १०० सचिव नियुक्त करण्यात येणार आहेत. वैभववाडीप्रमाणे जिल्हाभर सहकार मेळावे आयोजित केले पाहिजेत.’’ या कार्यक्रमात सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था, उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्ती, शेतीत प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान पालकमंत्री राणे यांच्या हस्ते करण्यात आला.
.........................
महावितरणच्या कारभाराचा फटका
सहकार मेळावा महत्त्वाच्या टप्प्यावर असताना वीजप्रवाह खंडित झाला. त्यामुळे काही काळ कार्यक्रम थांबवावा लागला. पालकमंत्री महावितरणच्या कारभाराचा अनुभव आला. ते चांगलेच वैतागले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.