झोळंबेच्या जैवसंपदेत ‘अॅटलास’ची भरारी
95279
झोळंबे ः येथे आढळलेला दुर्मीळ ‘अॅटलास मॉथ’.
झोळंबेच्या जैवसंपदेत ‘अॅटलास’ची भरारी
दुर्मीळ पतंग ः दोडामार्गच्या ‘दुसरे अॅमेझॉन’ला दुर्मीळ भेट
सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. २९ : झोळंबे येथे ‘अॅटलास मॉथ’ हा दुर्मीळ मानला जाणारा पतंग अभ्यासकांना आढळला. त्यामुळे या भागातील समृद्ध जैवसंपत्तीत भर पडली आहे.
दोडामार्ग तालुका आपल्या जैवविविधतेसाठी प्रसिद्ध असून संशोधकांमध्ये ‘दुसरे अॅमेझॉन’ म्हणून ओळखला जातो. याच तालुक्यातील झोळंबे हे गाव, जे नैसर्गिक जलस्रोत आणि त्यावरील फळ बागायतीसाठी प्रसिद्ध आहे.
बागायतदार ‘फार्म स्टे’ याच गावात आहे. नुकत्याच या फार्म स्टेच्या परिसरात काही प्रदेशनिष्ठ उभयचर प्रजाती आणि बेसुमार जंगलतोडीमुळे अस्तित्व धोक्यात असलेल्या काही उभयचर प्रजाती आढळून आल्या आहेत. अशातच आता जगातील सर्वांत मोठा समजला जाणारा ‘अॅटलास मॉथ’ या प्रजातीचा पतंग आढळला आहे. त्यामुळे झोळंबे गावाच्या जैवविविधतेत भर पडली आहे. पश्चिम घाटालगत असल्याने हा प्रदेश सदाहरित जंगलांनी समृद्ध असा आहे.
‘अॅटलास मॉथ’चे दर्शन अतिदुर्मीळ असते आणि दक्षिण पूर्ण आशिया खंडामध्ये तो प्रामुख्याने आढळून येतो. प्रथमदर्शनी फुलपाखराप्रमाणे दिसतो. मात्र, हा एक पतंग आहे. फुलपाखरे आपले पंख उघड-झाप करतात तर पतंगांचे पंख उघडे आणि लांबवर पसरलेले असतात. निसर्गप्रेमी, अभ्यासक ओंकार गावडे, सूरज गावडे आणि विकास कुलकर्णी यांना हा पतंग बागायतीच्या परिसरात आढळून आला. बदामी, तपकिरी आणि लालसर रंग, आकार १० ते १२ इंच किंवा साधारण २५ ते ३० से.मी. लांबीचा असतो. पंख पसरलेले आणि मोठ्या आकाराचे आणि टोकाला नागासारखी मिळतीजुळती आकृती असते, ज्यामुळे शिकारी पक्ष्यांपासून त्याचा बचाव होतो. (हे नैसर्गिक संरक्षण लाभलेले असते). पंखांवर मोठे पांढरे ठिपके असतात आणि नकाशाप्रमाणे नक्षीमुळे त्याला ‘अॅटलास मॉथ’ हे नाव आहे, असे पर्यावरण आभ्यासक वरद गिरी यांनी सांगितले.
नरापेक्षा मादी आकाराने मोठी असते. प्रजनन काळात मादी ‘फेरोमोन’ नावाचे विशिष्ट संप्रेरक हवेत सोडते, ज्यामुळे नर मादीकडे आकर्षित होतो. या पतंगास तोंड किंवा पचनसंस्था नसते. अळी (सुरवंट) अवस्थेतच ते पुरेसे अन्न खातात, जे त्यांची वाढ होण्यास आणि प्रजननादरम्यान पुरेसे असते. या पतंगाचे आयुष्य अगदी जेमतेम ५ ते ७ दिवसांचे असते आणि प्रजननाचे कार्य संपल्यावर त्यांचा मृत्यू होतो. प्रजाननानंतर मादी पतंग एकावेळेस १०० ते २०० अंडी घालते. त्यासाठी सदाहरित फळझाडे निवडते, जसे की आंबा, पेरू, अवाकडू, लिंबू वर्गीय वनस्पती आदी. अंड्यातून दहा-बारा दिवसांत सुरवंट बाहेर येतो. सुरवंट ३०- ४० दिवस सतत झाडाची पाने खाऊन जगतात आणि आपल्याभोवती एक कोष तयार करतात. साधारण २१ दिवसांनी त्या कोशातून पुन्हा नवे पतंग बाहेर येतात. हा पतंग निशाचर असून, रात्रीच्या वेळेस दिव्याच्या प्रकाशाकडे आकर्षित होतात. याआधी सभोवतालच्या वेगवेगळ्या ठिकाणांहून आणि दोडामार्गमध्ये तिलारी खोऱ्यात तसेच वानोशी होम स्टेच्या परिसरात ‘अॅटलास मॉथ’ आढळला आहे.
....................
कोट
95267
पश्चिम घाट आणि जगातले ‘दुसरे अॅमेझॉन’ तिलारी आणि त्यातील झोळंबे गाव हे वेस्टर्न घाट कॉरिडॉरमध्ये आहे. त्यामुळे इथे वन्यप्राण्यांची अक्षरशः रेलचेल आहे. खवले मांजर, साळिंदर, पट्टेरी वाघ, बिबट्या, अस्वले यांचे दर्शन आजूबाजूस असणाऱ्या फुकेरी, खडपडे, भेकुर्ली, घारपी, उडेली गावांतील ग्रामस्थांना होत असते. इथे औषधी वनस्पतीही मुबलक प्रमाणात आहेत. सदाहरित वने आणि फुलझाडे, फळझाडे असल्याने विविध फुलपाखरांचे आणि पतंगांचे दर्शन इथे होते. नुकताच आढळलेला ‘अॅटलास मॉथ’ हा पतंग सहसा दिसून येत नाही. आढळल्यास त्याला इजा करू नये. त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात जगण्याची संधी द्यावी.
- डॉ. वरद गिरी, प्रधान संशोधक, रिलायन्स फाउंडेशन
----
95280
झोळंबे आणि आजूबाजूचा भाग हा घनदाट जंगलांनी वेढलेला आहे. हनुमंतगड, घारपी येथे पठारी प्रदेशही आहे. पश्चिम घाटालगत असल्यामुळे या परिसरात फुलपाखरे आणि पतंगांच्या शेकडो प्रजाती आढळून येतात. मात्र, त्याचा पुरेसा अभ्यास आणि शोध झालेला नाही. त्यामुळे बरीचशी जैवविविधता अज्ञातात आहे. अशा शोधक वृत्तीमुळे आपल्या भागाची विशेष ओळख ठळक होते.
- विकास कुलकर्णी, निसर्गप्रेमी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.