इन्सुली शाळेस सर्वतोपरी सहकार्य
95269
इन्सुली शाळेस सर्वतोपरी सहकार्य
माजी विद्यार्थ्यांची ग्वाही; स्नेहमेळाव्यात शालेय स्मृतींना उजाळा
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ३० ः जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, इन्सुली पागावाडी क्र. ५ चा माजी विद्यार्थी स्नेहमेळावा नुकताच झाला. शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दीपेश सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मेळाव्यात माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनातील ८५ वर्षांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. या मेळाव्यास ६० माजी विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी निवृत्त पोलिस निरीक्षक अशोक सावंत यांनी प्राथमिक शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. निवृत्त सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश सावंत यांनी, त्यांच्या शिक्षणकाळात सुविधा कमी होत्या, पण आता सर्व सुविधा उपलब्ध आहेत, असे सांगितले. अभिमन्यू लोंढे यांनी चिंतन, मनन करताना अवांतर वाचन आणि संगणकीय प्रणाली जाणून घेण्यावर भर दिला पाहिजे, असे मत व्यक्त केले.
दीपेश सावंत म्हणाले, मुलांना भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. तुम्ही मोठी स्वप्ने पूर्ण करण्यासाठी शिक्षणाची संधी वृद्धिंगत करत राहा. व्यासपीठावर माजी विद्यार्थी प्रकाश सावंत, अशोक सावंत, अभिमन्यू लोंढे, प्रताप सावंत, प्रभाकर मांजरेकर, नागेश सावंत, फास्कू फर्नांडिस, मुख्याध्यापक भास्कर माजगावकर, शिक्षक सुधीर गावडे आदी उपस्थित होते. मुख्याध्यापक माजगावकर यांनी शाळेच्या भौतिक गरजा, विद्यार्थ्यांची प्रगती व गुणवत्ता यावर विचार मांडले.
यावेळी इन्सुली पागावाडी शाळेच्या माजी विद्यार्थी संघाची कार्यकारिणी निवडण्यात आली. यामध्ये अशोक सावंत यांची अध्यक्षपदी, प्रकाश सावंत यांची उपाध्यक्षपदी तसेच सचिव दीपेश सावंत, खजिनदार विवेकानंद नाईक यांची निवड करण्यात आली. प्रभाकर मांजरेकर, भिवा मुळीक, बाप्पा सावंत, राजेंद्र सावंत, नागेश सावंत, फास्कू फर्नांडिस, कृष्णा नाईक, राजेश शिंदे, विलास सावंत, अशोक सावंत, अमर सावंत, ओमकार सावंत यांची सदस्यपदी निवड झाली. यावेळी भिमसेन सावंत, न्हानू सावंत आदी उपस्थित होते. शिक्षक सुधीर गावडे यांनी सूत्रसंचालन केले. गोविंद शेर्लेकर यांनी आभार मानले.