सदर

सदर

Published on

जागर--------लोगो

नवरात्रीमध्ये शक्तीचा जागर केला जातो. साक्षात दुर्गा देवी शक्तीचा स्रोत आहे. तिची विविध रूपे आपल्याला शक्ती प्रदान करतात. परंतु शक्ती म्हणजे नक्की काय? शक्तीचा विचार करताना शारीरिक बलाबरोबर मनाचा आणि त्यामधून येणाऱ्या भावनांचा विचार झाला पाहिजे. नवरात्रीमध्ये आपण दुर्गा देवीची विविध रूपे बघतो, त्याचबरोबर त्या दिवशीचा शुभ रंग, मुद्रा, नैवेद्य यांची माहिती देखील घेतो. पण नवरात्री हा फक्त मूर्तिपूजेपुरता मर्यादित नाही. नवरात्री महोत्सव शारीरिक आणि भावनिक शक्तीचा जागर आहे. दुर्गा देवीची विविध रूपे आपल्याला भावनिक शुद्धीचा संदेश देतात. प्रत्येक सामान्य माणसापासून अगदी योग साधकापर्यंत भावनिक शुद्धी अतिशय महत्त्वाची आहे.
म्हणूनच दुर्गा देवीची विविध रूपे आणि योग शास्त्रातील विविध तत्त्वांमधून भावनिक शक्तीचा जागर कसा होतो ते या लेखामध्ये बघूया...

- rat३०p२६.jpg-
25N95667
– सानिका बाम
--------
नवरात्री आणि योग :
जागर शारीरिक अन् भावनिक शक्तीचा

देवी शैलपुत्री आणि ब्रह्मचारिणी या दोघीही कडक ब्रह्मचर्याची दोन रूपे आहेत. ब्रह्मचर्य हे योग शास्त्रातील महत्त्वाचे तत्त्व. ब्रह्मचर्य धारण करणे आणि त्याचे पालन करणे हे अतिशय अवघड आहे. देवीच्या या दोन्ही रूपांमधून आपल्याला हाच संदेश मिळतो. आजकालच्या जगामध्ये मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे जग जास्त जवळ येत आहे. यामधून जगभरातील विविध माहिती आपल्याला मिळतेच, पण त्याचबरोबर सोशल मीडियावर स्त्री आणि पुरुषांचे विभत्स असे चित्र बघायला मिळते. यामुळे भावनिक अस्थिरता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अगदी वयात येणाऱ्या मुला-मुलींपासून वृद्धांपर्यंत शारीरिक स्तरावर उन्माद वाढत आहे. येथे शारीरिक-मानसिक ब्रह्मचर्याची संकल्पना योग्य प्रकारे काम करेल असे वाटते. म्हणजेच स्त्रीकडे, मुलीकडे फक्त संभोग घेण्याचे साधन म्हणून बघू नये. घरामध्ये, कामाच्या ठिकाणी स्त्री–पुरुषाने एकमेकांना सन्मानाने वागणूक द्यावी.

* कामवासनेच्या विचारांवर संयम मिळविण्यासाठी पुढील योगसाधना करावी ः
- सूर्यनमस्कार केल्याने हार्मोन्स संतुलित होतात. सूर्यनमस्कारासारखा परिपूर्ण व्यायाम करावा.
- वाईट विचार आपल्या मनामध्ये सतत का येतात? याबद्दल स्वतःचे स्वतः अवलोकन करणे गरजेचे आहे.
- योग्य त्या कामामध्ये दिवसभर स्वतःला व्यस्त ठेवावे. यामुळे अस्थिर भावना स्थिर व्हायला मदत होते आणि संभोगाच्या विचारांवर संयम प्राप्त होऊ शकतो.
- ओंकाराचा जप हा मन, बुद्धी, विचार, चित्त, भावना शुद्ध करतो. म्हणूनच ब्रह्मचर्य पालनासाठी ओंकाराची किमान १० आवर्तने रोज केली पाहिजेत.

चंद्रघंटा देवी आपल्याला शत्रूवर विजय मिळविण्याचा संदेश देत आहे. योग शास्त्रामध्ये शत्रू म्हणजे नक्की कोण? याचे एक संस्कृत सूत्र मिळते. क्रोध, ईर्ष्या, द्वेष यांनी आपल्याच मनाला क्लेश होतात. कारण या सर्व भावना आपले मन दूषित करतात. ईर्षेची भावना आज समाजात खूप दिसते. दुसऱ्याची प्रगती होताना त्याबद्दल आपल्या मनामध्ये ईर्ष्या निर्माण होऊ देऊ नये. देवी कुष्मांडा आपल्याला संदेश देते की, प्रत्येक माणसाने स्वतःचे काम प्रामाणिकपणे आणि सकारात्मक दृष्टिकोनाने करावे. यालाच कर्मयोग असे म्हणतात. आपल्यामध्ये काय बदल करणे अपेक्षित आहे? याचा विचार करावा. यालाच योगशास्त्रामध्ये स्वाध्याय असे म्हणतात.
देवीचे पुढचे रूप आहे स्कंदमाता. ती तिच्या बाळाला म्हणजेच स्कंदाला मांडीमध्ये घेऊन बसली आहे. आई आणि बाळाचे नाते हे जगातील सर्वात सुंदर नाते असते. स्कंदमाता देवीच्या या रूपामधून कुटुंब व्यवस्थेविषयीचा आदर दिसतो. अपत्याला जन्म देणे, बाळाचे संगोपन करणे, स्वतःच्या मुलांबरोबरच गरजू, अनाथ मुलांवर देखील प्रेम करणे. या भावना स्त्री आणि पुरुषाला नैसर्गिकपणे मिळालेल्या आहेत. भोग घेण्याच्या भावनेपासून दूर राहावे. शरीर हे फक्त भोग घेण्यासाठी मर्यादित नसून ते एक नवीन उत्पत्तीचे स्थान आहे हे समजून घेणे गरजेचे आहे.
कात्यायनी देवीचे रूप आपल्याला अंतर्मुख होऊन मनातील विषयुक्त विचार संपविण्याचा संदेश देत आहे. देवी कालरात्री ही आपल्यामधील अंध:काराला दूर करून मनातील भीतीचा नाश करते. देवी महागौरी आपल्याला शांती आणि शुद्धतेचा संदेश देत आहे. आणि देवी सिद्धीदात्री या नवरात्रीच्या उपासनेचे फळ म्हणजे साक्षात यश प्रदान करते. म्हणूनच नवरात्रीचे हे नऊ दिवस शरीर आणि भावना शुद्ध करतात. शक्ती या शब्दाचा अर्थ फक्त शारीरिक शक्ती नसून त्यामध्ये भावनिक शक्ती देखील आहे.
आनंद, दुःख, नैराश्य, उत्साह, वैराग्य तर कधी प्रेम अशा विविध भावना मनामध्ये सतत जन्म घेत असतात. यानुसारच मनुष्य कर्म करत असतो. मनामध्ये येणाऱ्या या भावनांविषयी जागरूक राहणे गरजेचे आहे. भावना कोणत्याही असल्या तरी मनाचे स्थैर्य साधणे म्हणजेच भावनिक जागर. याच जागरूकतेसाठी सूर्यनमस्कार, ओंकार साधना, स्वाध्याय, कर्मयोग आणि ब्रह्मचर्य ही योगशास्त्रातील महत्त्वाची तत्त्वे आहेत. दुर्गा देवीचं प्रत्येक रूप शक्ती आणि स्थिरतेचं दर्शन देत आहे आणि म्हणूनच नवरात्री हा भावनिक शक्तीचा जागर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com