पूरग्रस्तांना चिपळूणच्या गणेशोत्सव मंडळाकडून मदत
पूरग्रस्तांना चिपळूणच्या
गणेशोत्सव मंडळाकडून मदत
चिपळूण : चिपळूणच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने पाकणी (उत्तर सोलापूर) गावाला ७५० किलो गहू, २५० किलो तांदूळ आणि बिस्किट पुडे अशी जीवनावश्यक मदत पुरवली. सोलापूर जिल्ह्यातील मौजे पाकणी (ता. उत्तर सोलापूर) येथील ३५० बाधित कुटुंबांना मदत करण्यासाठी चिपळूण प्रांताधिकारी आकाश लिंगाडे यांनी चला देऊ हात मदतीचा, आपल्या कृतज्ञतेचा, असे आवाहन केले होते. या आवाहनाला तत्काळ प्रतिसाद देत चिपळूणच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने प्रांताधिकारी यांच्या समन्वयातून पाकणी गावाला ७५० किलो गहू, २५० किलो तांदूळ आणि बिस्किट पुडे अशी जीवनावश्यक मदत पुरवली. या उपक्रमासाठी मंडळाचे अध्यक्ष बाळा कदम, कार्याध्यक्ष तात्या खरे व सदस्य नितीन कोवळे यांनी विशेष आर्थिक सहकार्य केले.
--------
एसटीत साप आढळल्याने
प्रवाशांची धावपळ
संगमेश्वरः संगमेश्वर-बडदवाडी मार्गावर धावणाऱ्या एसटी बसमध्ये सोमवारी (ता. २९) साप आढळल्याने प्रवाशांची घाबरगुंडी उडाली. बस सुरू होताच चालकाच्या शेजारील आसनावर बसलेल्या मुलीला साप दिसताच ती घाबरून ओरडली, आणि काही क्षणात संपूर्ण बसमध्ये गोंधळ झाला. प्रवाशांनी तातडीने चालकाला गाडी थांबविण्यास सांगितले. साप बेलच्या दोरीला विळखा घालून बसमध्येच पुढे सरकत होता. साप दरवाजाजवळ आल्यानंतर एका धाडसी प्रवाशाने काठीच्या साह्याने तो साप अलगदपणे रस्त्यावर फेकून दिला.
-----------
चिपळूण बाजारपेठेत
मोफत आरोग्य शिबिर
चिपळूण : नवरात्रोत्सवानिमित्त झिक्रा ग्लोबल फाउंडेशन व चिपळूण शहर बाजारपेठ मित्रमंडळातर्फे आयोजित मोफत ऑर्थोपेडिक व स्पाईन तपासणी शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. पानगल्ली येथे शिबिर झाले. शिबिरात डॉ. नोमान अत्तार (ऑर्थोपेडिक अँड स्पाइन सर्जन) यांच्या मार्गदर्शनाखाली गुडघेदुखी, कंबरदुखी, मणक्याचे विकार आणि इतर हाडांचे आजार असलेल्या रुग्णांची सविस्तर तपासणी करण्यात आली. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिलावर्ग आणि श्रमिक वर्गातील लोकांनी या शिबिराचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला.
----------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.