मचाण बांधून शेतकरी करतोय राखण
- rat३०p१४.jpg
P२५N९५६२९
साखरपा : शेतात राखणीसाठी बांधलेले मचाण
---
पिक संरक्षणासाठी शेतकरी बनले पाहरेकरी
शेतातील मचाणावर मुक्काम; गवे, रानडुक्करांचा वाढता त्रास,
सकाळ वृत्तसेवा
साखरपा, ता. ३० : गावागावातील भातशेती कापणी योग्य झाली आहे. मात्र गेल्या काही दिवसात गवा, रानडुक्करांकडून पिकांची नासधूस होत आहे. रानटी जनावरांना बंदोबस्त करण्यासाठी शेतकरी शेताच्या बांधावर जागर करीत आहे. मात्र यावेळी स्वतःच्या संरक्षणासाठी शेतामध्ये मचाणे उभी केली आहेत. रात्री त्या मचाणावर बसून राखण करीत आहेत. हे चित्र संगमेश्वर तालुक्यात सर्वाधिक पहायला मिळत आहे.
चिपळूण, संगमेश्वर, लांजा, राजापूर या परिसरात जंगल भाग अधिक असल्यामुळे रानटी जनावरांचा वावर सर्वाधिक आहे. चांदोली अभयारण्यातील गवे कळपाने संगमेश्वर तालुक्यात उतरलेले आहेत. त्यामुळे गेल्या चार ते पाच वर्षामध्ये शेतीचे मोठे नुकसान होत आहे. यंदा पाऊस अनियमित होता. तरीही शेवटच्या टप्प्यात पडलेल्या समाधानकारक पावसामुळे भात रोपांना लोंब्या लगडलेल्या पहायला मिळत आहेत. भातशेती पिकण्याच्या अवस्थेत आली आहे. जून महिन्यापासून मेहनत घेतलेली पिकं आता कापणी योग्य झालेली आहेत. असे असले तरीही ठिकठिकाणी डुकरे आणि गवे शेतात शिरून पिकांचे नुकसान करीत आहेत. त्यामुळे अंतिम टप्प्यात आलेले पीक उध्वस्त होऊन शेतकऱ्यांच्या तोंडाचा घास हिरावून जाण्याची भीती निर्माण झालेली आहे. या उपाय म्हणून रात्रीच्या राखणीला शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे. त्यासाठी स्वत:च्या संरक्षणासाठी शेतकरी शेतांमधून मचाण बांधण्यात आली आहेत. सध्या वाडीवस्तीबाहेरच्या शेतांमधून अशी मचाणे आणि रात्री त्यात राखणीसाठी मुक्कामाला असलेले शेतकरी हे दृश्य ठिकठिकाणी दिसत आहे. सायंकाळी जेवणं आटपून शेतकरी शेताकडे जातात. त्यानंतर पहाटेपर्यंत ते शेतामध्येच राहतात. त्यामुळे शेतीचे संरक्षण होत आहे.
----
कोट
रानटी जनावरांचा त्रास मोठ्याप्रमाणात होत आहे. त्यापासून शेतीचे संरक्षण करणे आव्हानात्मक आहे. काहीवेळा झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्याएवढे क्षेत्र नसते. त्यामुळे शेतकरी त्याकडे दुर्लक्ष करतो. त्यांना वनविभागाकडून भरपाई मिळत नाही.
- संतोष भडवळकर, संगमेश्वर