सरदार वल्लभभाई पटेल यांच्यावर व्याख्यान
सरदार पटेलांची दूरदृष्टी आजही मार्गदर्शक
प्रा. दळवी ः आठल्ये-सप्रे महाविद्यालयात व्याख्यान
सकाळ वृत्तसेवा
साडवली, ता. १ ः भारताचे थोर स्वातंत्र्य सेनानी स्व. वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंती वर्षानिमित्त आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयात ‘सरदार वल्लभभाई पटेल यांची दूरदृष्टी व वर्तमान संदर्भ’ या विषयावर विद्यार्थ्यांना प्रा. धनंजय दळवी यांनी मार्गदर्शन केले. या व्याख्यानाची सुरुवात एन. एस. एस. कार्यक्रमाधिकारी प्रा. सीमा कोरे यांनी आपल्या प्रास्ताविकाने केली. यामध्ये त्यांनी व्याख्यानाचा उद्देश व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्यकर्तृत्वाचा परिचय विद्यार्थ्यांना करून दिला.
प्रा. धनंजय दळवी यांनी लोहपुरुष सरदार वल्लभाई पटेल यांनी स्वातंत्र्य सैनिक म्हणून केलेल्या बहुमोल व अभ्यासपूर्ण कार्याचा सविस्तर आढावा घेतला. देशातील प्रमुख राजकारणी तसेच, भारताचे उपपंतप्रधान व गृहमंत्री म्हणून कार्यरत असताना त्यांनी घेतलेले महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या परिस्थितीमध्ये कसे महत्त्वपूर्ण आहेत, हे विविध उदाहरणासह पटवून दिले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या काळात भारताच्या राजकीय एकसंघीकरणासाठी ५६५ अर्धस्वायत्त संस्थांचे शांतता व सलोख्यासाठी केलेले विलीनीकरण भारताच्या एकात्मता व एकजुटीच्या दृष्टीने कसे योग्य होते, याबाबत सविस्तर माहिती दिली. प्रा. स्वप्नाली झेपले यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांसह प्रा. विजय मुंडेकर, प्रा. मयुरेश राणे, प्रा. वसंत तावडे आणि प्रा. शिवराज कांबळे उपस्थित होते.