लांज्यात १४ ला रोजगार मेळावा
लांज्यात १४ला
रोजगार मेळावा
पावस ः जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांनी जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्यादृष्टीने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा १४ ऑक्टोबरला आयोजित करण्यात आला आहे. सकाळी १० वाजता लांजा येथील कल्पना कॉलेज ऑफ मॅनेजमेंट येथे मेळावा होणार आहे. जिल्ह्यातील उमेदवारांनी त्यांची नोंदणी या विभागाच्या www.mahaswayam.gov.in पोर्टलवर करावी, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकताचे प्र. सहाय्यक आयुक्त मोरेश्वर दुधाळ यांनी केले आहे.
रत्नागिरीत बुधवारी
रोजगार मेळावा
पावस ः जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याकरिता पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा/ प्लेसमेंट ड्राईव्ह ८ ऑक्टोबरला होणार आहे. सकाळी ११ वाजता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संस्था यांचे कार्यालय, नाचणे रोड, एमआयडीसी, रत्नागिरी येथे मेळावा होईल. सर्व उमेदवारांनी त्यासाठी नोंदणी रोजगार विभागाच्या www.mahaswayam.gov.in पोर्टलवर करावी. नोंदणीकृत असलेल्या सर्व उमेदवारांनी त्यांचे प्रोफाईल अद्ययावत करावे.
पोस्टाद्वारे पाठवा
परदेशात फराळ
पावस ः जिल्ह्यातील अनेक मुले तसेच नागरिक शिक्षणासाठी, नोकरीसाठी परदेशात आहेत. त्यांना दिवाळीत घरचा फराळ मिळावा यासाठी टपालखात्याने परदेशात फराळ पाठवण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. फराळ परदेशात पाठवण्यासाठी काही निवडक देशांसाठी ५ किलो पार्सलचे दर ठरवण्यात आले आहेत. ऑस्ट्रेलिया ४ हजार ९९७ रुपये, कॅनडा ५ हजार २६ रुपये, युएई १ हजार ८९९ रुपये, युके ४ हजार ५३७ रुपये आणि जर्मनी ३ हजार ६९९ रुपये. या देशाव्यतिरिक्त इतर देशांमध्ये पार्सल पाठवता येतील. त्यासाठी इच्छुकांनी नजीकच्या पोस्ट ऑफिसशी संपर्क साधावा, असे आवाहन डाकघर अधीक्षक ए. डी. सरंगले यांनी केले आहे. रत्नागिरी व चिपळूण प्रधान डाकघर येथे फराळ पॅकिंगची सुविधा उपलब्ध आहे.