बीएसएनएल ग्राहकांच्या तक्रारी थेट लोकप्रतिनिधींकडे

बीएसएनएल ग्राहकांच्या तक्रारी थेट लोकप्रतिनिधींकडे

Published on

बीएसएनएलच्या सेवेला ग्राहक वैतागले
तक्रारी थेट लोकप्रतिनिधींकडे ; खासदारांशी करणार पत्रव्यवहार
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. ५ ः भारत संचार निगमच्या सेवेला ग्राहक वैतागले आहेत. महिनाभराचे रिचार्जचे पैसे पाण्यात गेल्याची अनुभूती ग्राहक घेत आहेत. त्यामुळे त्रस्त झालेल्या भारत संचार निगमच्या ग्राहकांनी वेळोवेळी कार्यालयात जाऊन तक्रारी केल्या; पण प्रत्येक वेळी ये रे माझ्या मागल्या हीच स्थिती आहे.
या प्रकाराला कंटाळून आमसभेत या विषयाची ठिणगी पेटली. आमदार शेखर निकम यांनी मतदारसंघातील जनतेला आश्वस्त केले. अधिकाऱ्यांना फैलावर घेतले, पण परिस्थिती जैसे थे. आता सावर्डे येथील जनसंपर्क कार्यालयात लोकांनी आमदारांची भेट घेऊन या समस्येचे लवकर निराकरण करावे, असे विनंती अर्ज दिले आहेत.
नेटवर्क नसल्याने प्रशासकीय कामे, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे अभ्यासविषयक कामे, रेशन दुकानदार यांना ऑनलाइन पद्धतीने ठेवावे लागणारे रेकॉर्ड आणि रोजच्या व्यवहारात आप्तस्वकीयांशी फोनवरील संपर्क होत नाही. त्यामुळे बीएसएनएलच्या ग्राहकांचा संताप वाढत चालला आहे. आमदार निकम खासदार नारायण राणे, सुनील तटकरे यांच्याशी पत्रव्यवहार करणार आहेत. त्यानुसार या गंभीर विषयावर संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावली जाईल. त्या बैठकीला आमदार निकम उपस्थित राहून या गंभीर विषयाकडे सर्वांचे लक्ष वेधून घेतील, अशी आशा आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com