स्वच्छता अभियानात सिंधुदुर्ग अग्रेसर
96427
स्वच्छता अभियानात सिंधुदुर्ग अग्रेसर
रवींद्र खेबुडकर ः आंदुर्लेत ‘घर तेथे शोषखड्डा’ अभियान
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ४ ः महिला व पुरुष यांच्या एकत्र सहभागातून स्वच्छता ही माझी जबाबदारी आहे. या भावनेने चळवळ उभी राहिल्यास स्वच्छता अभियानाला गती मिळू शकते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे सिंधुदुर्ग आहे. जिल्ह्यात श्रमदानाच्या माध्यमातून स्वच्छता कार्यक्रमांचे आयोजन कायम ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात होत असते. यामुळेच जिल्ह्याला स्वच्छता क्षेत्रात विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत, असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबूडकर यांनी केले.
स्वच्छ भारत मिशनअंतर्गत महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून २ ऑक्टोबर हा दिवस ‘स्वच्छ भारत दिवस’ म्हणून साजरा करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने ‘स्वच्छता ही सेवा’ मोहीम जिल्ह्यात राबविली जात आहे. जिल्ह्यातील सांडपाणी समूळ नष्ट करण्यासाठी बुधवारी (ता. १) जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात ‘घर तेथे शोषखड्डा’ अभियान राबविले. या अभियानांचा जिल्हास्तरीय प्रारंभ कुडाळ तालुक्यातील आंदुर्ले ग्रामपंचायत येथे करण्यात आला. यावेळी आंदुर्ले सरपंच अक्षय तेंडोलकर, कुडाळ माजी सभापती संजय वेंगुलेकर, माजी सभापती, मुख्य लेखा वित्त अधिकारी अमित मेश्राम, मुख्य लेखा वित्त अधिकारी सुदेश राणे, कुडाळ गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक संतोष पाटील आदी उपस्थित होते. या अभियानात सर्व जिल्हावासीयांनी श्रमदान करून शोषखड्ड्यांचे बांधकाम करावे, असे आवाहन यावेळी खेबूडकर यांनी केले. त्यानुसार त्याचा जिल्हास्तरीय प्रारंभ आदुर्ले येथे करण्यात आला.
...................
आंदुर्ले येथील महिलेचे कौतुक
आंदुर्ले येथील ७६ वर्षीय शालिनी मेस्त्री यांनी सांडपाण्याचा योग्य निचरा करण्यासाठी शोषखड्डा उभारणीच्या कामाचा प्रारंभ केला. याबाबत खेबूडकर यांनी त्यांचे विशेष कौतुक केले.