आदिम बियाणांची साठवणूक

आदिम बियाणांची साठवणूक

Published on

जपूया बीज वारसा---------लोगो
(३० सप्टेंबर टुडे ३)

दसऱ्यानंतर खरिपाच्या पिकांची कापणी सुरू होते. अशावेळी तयार झालेले धान्य आणि बियाणे साठवणूक हे अन्नसुरक्षा आणि बियाणे स्वयंपूर्णतेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. उत्तम साठवणुकीसाठी धान्य आणि बियाण्याला कीड, रोगापासून सुरक्षित ठेवून योग्य प्रकारचे वातावरण उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. बियाणांची योग्य पद्धतीने साठवणूक केली तर आपण योग्य दर मिळवून आपले धान्य विकू शकतो तसेच त्यांचा दर्जा जास्त कालावधीपर्यंत चांगला राखला जातो.
- rat६p९.jpg-
25N96805
- कुणाल अणेराव,
वरिष्ठ प्रकल्प अधिकारी
सृष्टिज्ञान संस्था
---
आदिम बियाण्यांची साठवणूक
खाण्याचे किंवा विकण्याचे धान्य आणि बियाणी ही वेगवेगळी ठेवावीत. बियाणी ही शक्यतो खाण्यासाठी वापरू नयेत. धान्य आणि बियाणी साठवताना ओलावा, तापमान आणि ऑक्सिजनचे प्रमाण हे तीन महत्त्वाचे पर्यावरणीय घटक आहेत. यांचे योग्य संतुलन राखले तर धान्ये आणि बियाण्यांची गुणवत्ता टिकून राहते. धान्यातील पोषणमूल्ये टिकून राहतात तर बियाण्यांची अंकूरक्षमता आणि जोम टिकून राहतो. म्हणून धान्य आणि बियाणी साठवण्यासाठी सभोवतालचे वातावरण जितके थंड आणि कोरडे असेल तितके चांगले. हवेत कमीत कमी आर्द्रता असावी, साधारण ३० टक्केपेक्षा सापेक्षआर्द्रता वाढू देऊ नये. तापमान साधारण १५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नसावे तसेच या साठवणुकीच्या जागेत खेळती हवा असेल तर ऑक्सिजनचे योग्य प्रमाण राखले जाऊन धान्य आणि बियाणी उत्तम राहतात. साठवणूक करण्याकरिता धान्ये ही पाखडून, स्वच्छ करून, कडक उन्हात वाळवून त्यात कडुनिंबाची पाने घालून ठेवल्यास चांगली टिकतात. ही धान्ये ठेवायच्या काही पारंपरिक पद्धती आहेत, ज्या आता नामशेष होत चालल्या आहेत. तरीही त्याबद्दल आपण माहिती करून घेऊ.
कोकणात मुख्यत: बांबू, शेणमाती यांचा वापर करून विविध साठवणुकीची साधने तयार केली जात होती. यातील काही प्रकार असे -
कणगी-बांबूच्या बारीक पट्ट्यांपासून केलेली कणगी किंवा ताटकीची धान्य साठवण्यासाठी क्षमता ५०० ते १००० किलो असते. विणलेल्या कणगीला गाईच्या श्रावण महिन्यातील शेण आणि मातीने लिंपले जाते. या काळात ओला चारा खात असल्याने गाईचे शेण मऊसूत असते. ही कणगी उन्हात खडखडीत वाळवून तिच्या तळाला सागाची पाने पसरवली जातात. त्यावर उन्हात वाळवलेले धान्य, त्यामध्ये निर्गुडी, करंज, काळा कुडा इत्यादींची वाळलेली पाने मिसळून भारतात. कणगी वरपर्यंत भरली की, त्यावर सागाची पाने पसरून शिवून घेतात आणि नंतर शेण-मातीच्या मिश्रणाने लिंपून घेतात. काही कणग्यांना खालच्या बाजूने धान्य काढण्याची सोय असते जेणेकरून नवीन धान्य वरून भरले जाईल व खालून जुने धान्य आधी वापरले जाईल. कणगी विणताना बांबूच्या काठ्यांना बिब्याचे तेल लावलेले असेल तर या कणग्यांत कधी कीडा मुंगी लागत नाही तसेच उंदीरही कुरतडत नाहीत. त्यामुळे अनेक वर्षे ही कणगी वापरता येते.
मोठ्या प्रमाणावर धान्य साठवण्यासाठी पेव किंवा बळद यांची व्यवस्था एकोणिसाव्या शतकापर्यंत अस्तित्वात होती. शेतमालाचा पुरवठा वर्षातून एक किंवा दोनदा मोठ्या प्रमाणावर होतो. औद्योगिक उत्पादकाला किंवा ग्राहकाला शेतमालाची गरज मात्र वर्षभर साधारणपणे सारखी असते. शेतमालाच्या मागणी व पुरवठ्यातील या तफावतीमुळे जशी गिऱ्हाईकाची अडचण होते त्यापेक्षा जास्त शेतकऱ्याची होते. सुगीच्यावेळी सर्वांचाच माल तयार झाल्याने बाजारातील आवक वाढते व त्यामुळे भाव पडतात. अशावेळी काही घाऊक व्यापारी मोठ्या प्रमाणावर माल खरेदी करतात. साठवलेला माल पुढे ते चढ्या भावाने विकतात म्हणजे गिऱ्हाईकाला द्याव्या लागणाऱ्या किमतीचा काही हिस्साच प्रत्यक्ष उत्पादकाच्या पदरात पडतो. बाजारपेठेच्या या चढ-उतारापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आणि धान्य सुरक्षित ठेवण्यासाठी पेव आणि बळदची व्यवस्था केलेली दिसते.
पेव हा शब्द ‘खड्डा’ या अर्थाच्या पेयडू किंवा पोयडू या कानडी शब्दापासून तयार झालेला आहे. पेव म्हणजे जमिनीमधून पाणी झिरपून आत येणार नाही, असे तयार केलेले गोदाम. पेव तयार करण्यासाठी जमिनीमध्ये ठराविक खोलीपर्यंत गोल खड्डा खणत. त्याच्या आतील बाजूने मुख्यतः पांढऱ्याशुभ्र चिकणमातीचा वापर केला जात असे. कारण, या मातीत पाणी कमी प्रमाणात झिरपते तसेच ही माती ढासळत नाही. धान्य भरण्याच्यावेळी पेव आतून शेणा-मातीने सारवून घेत. पेवाच्या तळाशी उसाच्या वाळलेल्या पेंढ्या टाकत. त्यावर शिंदीच्या पानांपासून तयार केलेल्या चटया अंथरून मधल्या भागात धान्याची पोती रिकामी करत. पेवाच्या झाकणापासून खाली कमीत कमी ४ फुटांचा थर मोकळा ठेवला जात असे. एका पेवात साधारणतः १५० ते २५० क्विंटलइतके धान्य मावत असे. आतील धान्य काढायचे असेल तर एक व्यक्ती सहज प्रवेश करू शकेल, असा मार्ग असायचा. पेवामध्ये उतरण्यासाठी व चढण्यासाठी दोराचा वापर केला जात असे. वेळेनुसार आवश्यक तेवढे धान्य काढले जात असे. धान्य बाहेर काढण्याच्या वेळी पेवाचे तोंड मोकळे करून बराच वेळपर्यंत उघडे ठेवून पेवात बाहेरची मोकळी हवा मिसळू देत.
महाराष्ट्रातील ग्रामीण भागांमध्ये आजही नवीन घराचे अथवा इमारतीचे बांधकाम करताना अशी अनेक पेवं आढळून येतात. अकोले (जिल्हा- नगर) तालुक्याच्या ऐतिहासिक विश्रामगड उर्फ पट्टाकिल्ल्यावरील एका गुहेत असे दोन पेव सापडले आहेत. विशेष म्हणजे त्यात सुमारे ५० पोते नाचणी आणि वरी असे धान्यही सापडले आहे. हे धान्य शिवकाळातील असावे, असा अंदाज व्यक्त होतो. अफवांचे पेव फुटले असा शब्दप्रयोग आजही केला जातो. त्यातील पेव म्हणजे हेच. जर पेव फुटले तर त्यातून धान्य भसाभस बाहेर सांडते आणि धान्याची लूट होते. त्यानुसार अफवा भसाभस पसरत जातात, असा त्यामागील अर्थ आहे.

बळद ः बळद म्हणजे घराच्या भिंतीला तिन्ही बाजूंनी मातीच्या विटांचे आयताकृती बांधकाम करून बनवलेली उभट रचना होय. याची उंची ५ ते ७ फुटांपर्यंत असून, यामध्ये ५०० किलो ते १००० किलोपर्यंत साठवणूक क्षमता असते. बळदाच्या समोरील बाजूस एक लहानसे छिद्र ठेवलेले असते. त्यातून आतील धान्य काढून घेता येते. हे छिद्र शेणमातीच्या मिश्रणाने बंद केले जाते. बळदाच्या वरचा भागसुद्धा शेणमातीच्या मिश्रणाने लिंपून बंद केला जातो आणि शक्यतो तो शेवटपर्यंत उघडला जात नाही. अशा हवाबंद रचनेमुळे आत ठेवलेले धान्य ओलावा आणि कीड यापासून मुक्त राहते. बळदामध्ये ठेवलेले धान्य तीन ते चार वर्षे सुरक्षित राहते. अकोले तालुक्यातील कळसूबाई आणि हरिश्चंद्रगड परिसरात आजही बळद वापरात आहेत.
आदिम धान्यांच्या बियाण्यांची साठवणूक करताना या धान्याची संपूर्ण कणसेच माळ्यावर पारंपरिक पद्धतीने टांगून ठेवतात. ती साधारणपणे चुलीच्या वरच्या भागात असतात. चुलीचा मंद धूर आणि उष्णतेमुळे कणसे ओलसर राहात नाहीत, त्यांना बुरशी-कीड लागत नाही. उंदीरही ही कणसे खात नाहीत. त्याचप्रमाणे बियाण्यांच्या साठवणुकीसाठी गवताची मुडी बांधली जात असे. मुडी म्हणजे गवत आणि दोरी वापरून धान्याची नैसर्गिकरित्या साठवण करून ठेवण्याचं एक साधन. मुडी ही भाताची मळणी केल्यावर मिळणाऱ्या गवताची बांधली जाते. हे मोठं कौशल्याचं आणि ताकदीचंही काम आहे. मोठी मुडी ही दहा कुढवांची बांधली जाते तर अगदी लहान म्हणजे दोन-तीन कुडू धान्याच्या मुडीला ‘बिवळा’ म्हणतात. या मुडी भात, आदिमधान्ये, कडधान्ये यांच्या बियाणांच्या साठवणुकीसाठी बनवल्या जात. बियाणी तसेच धान्य टिकण्यासाठी गवतात काळा कुडा आणि निर्गुडीची पानेही टाकली जात असत. एखाद्या मुडीतले धान्य दोन-अडीच वर्षांपर्यंतही उत्तम स्थितीत राहत असे.
धान्य आणि बियाणी साठवणुकीची ही साधने त्या वेळी आपल्या आसपास सहज उपलब्ध असलेल्या सामग्रीपासून बनवली जात होती. जसे की, बांबू, शेणमाती, गवत इ. आता या गोष्टी इतक्या सहजतेने उपलब्ध होत नाहीत आणि हे बनवणारे कारागीरही कमी झाले आहेत. त्यामुळे अर्थातच हे सारे खर्चिक झाले आहे शिवाय बियाणी आणि धान्य हे आता थेट बाजारातून आणले जाते. त्यामुळे ही पारंपरिक साठवणुकीची साधने मागे पडत चालली आहेत.
(लेखक स्वत: शेतकरी असून, आदिम बियाणी संवर्धन करत आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com