जिल्हाधिकारी कार्यालय परिसराची स्वच्छता
मालगुंड विद्यालयाचे
खो-खो स्पर्धेत यश
रत्नागिरी ः महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय रत्नागिरी तसेच तालुका शारीरिक संघटना यांच्यावतीने शनिवारी (ता. ४) येथील शिवाजी स्डेडियम येथे १४ वर्षे वयोगटातील तालुकास्तरीय खो-खो स्पर्धा उत्साहात झाल्या. स्पर्धेत मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या बळीराम परकर विद्यालय व मुरारी तथा भाई मयेकर ज्युनिअर कॉलेजमधील मुलांचा संघ अजिंक्य ठरला. तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत मालगुंड हायस्कूलच्या १४ वर्षे वयोगटातील संघातील खेळाडूंनी उत्तम खेळाचे प्रदर्शन करून अजिंक्यपद पटकावले. अर्पित सुर्वे या खेळाडूला स्पर्धेतील अष्टपैलू खेळाडू म्हणून गौरवण्यात आले. या सर्व खेळाडूंना प्रशालेतील क्रीडा शिक्षक संजय थोरात, रूपेश तावडे, सुनील मोडक यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या सर्व विद्यार्थ्यांनी तालुकास्तरावर मिळवलेल्या यशाबद्दल मुख्याध्यापक बिपिन परकर, उमेश केळकर यांनी अभिनंदन केले. मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुनील उर्फ बंधू मयेकर, विवेक परकर, विनायक राऊत, संदीप कदम यांनी सर्वांचे अभिनंदन केले.
--------------
जिल्हाधिकारी कार्यालय
परिसराची स्वच्छता
रत्नागिरीः गांधी जयंती सप्ताहानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय, प्रांत कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत परिसरात स्वच्छता करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात स्वामी बाळ सत्यधारी महाराज व्यसनमुक्त केंद्राचे सुधाकर सावंत यांनी उपस्थितांना व्यसनमुक्ती संकल्प प्रतिज्ञा दिली. या मोहिमेत जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, बाळ सत्यधारी महाराज, उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी , प्रांताधिकारी जीवन देसाई, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहूल गायकवाड, खनिकर्म अधिकारी भाग्यश्री जोशी, तहसीलदार मीनल दळवी, राजाराम म्हात्रे, समाजकल्याण अधिकारी विश्वनाथ बोडके, मिरजोळे उपसरपंच राहूल पवार आदी उपस्थित होते.
--------
वालावलकर रुग्णालयात
महाशस्त्रक्रिया शिबिर
रत्नागिरी ः डेरवण येथील वालावलकर रुग्णालयातर्फे १० ऑक्टोबरला सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळात मोफत महाशस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबारात हर्निया, अॅपेंडिक्स, मूळव्याध, हायट्रोलिसल, चरबीच्या गाठी, थायरॉइड, फिसर, मुतखडा, पित्ताशयातील खडे, प्रोस्टेड ग्रंथी, टॉन्सिल, कान-नाकाच्या शस्त्रक्रिया, मोतीबिंदू, खुबा बदलणे तसेच महिलांच्या गर्भाशयाच्या शस्त्रक्रियांसह विविध उपचार मोफत केले जाणार आहेत. पिवळे व केशरी रेशनकार्ड तसेच आधारकार्ड आवश्यक आहे. इच्छुकांनी सचिन धुमाळ, संकेत जांभळे किंवा संदीप पाटील यांच्याशी संपर्क साधावा.
...........
कोतवडेमध्ये
महिलांचा सत्कार
रत्नागिरी ः तालुक्यातील कोतवडे ग्रामस्थ मंडळ मुंबई संचलित श्रीमंत वि. प. कोतवडे इंग्लिश स्कूलमध्ये शारदोत्सवानिमित्त शाळेतील महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान कोतवडे ग्रामस्थ मंडळाच्यावतीने करण्यात आला. या वेळी शाळेतील महिला कर्मचारी सुर्वे, मोहिते, पेडणेकर, कामतेकर, शितूत त्याचप्रमाणे शाळेतील सेविका खांडके, शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या शितप, भागाडे यांचा मंडळातर्फे शाल, श्रीफळ देऊन संस्थेचे उपाध्यक्ष संजय मयेकर, शाळा समिती अध्यक्ष नरेश कांबळे, कार्यकारिणी सदस्य शंकर कोळंबेकर, प्रकाश ठोंबरे, जांभरूण गावचे सरपंच गौतम सावंत, मुख्याध्यापक प्रेमदास पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.