सुमनताईंचे जीवन म्हणजे संघर्षाचा नंदादीप
प्रासंगिक
- rat७p१.jpg-
२५N९७०५०
सुमन भिडे
पन्नास वर्षांपूर्वीच्या काळात ब्राह्मणांचा भाजप असा शिक्का असताना आणि भाजपचे कार्यक्रम किंवा प्रचार हा कुचेष्टेचा विषय होत असतानासुद्धा एकत्रितपणे आणि एकदिलाने घराच्या जोत्यामधले जणू दगड असावं, तशा पद्धतीने भाजप आणि संघविचारांचे काम अनेक वर्षे सुमनताई यांच्यासारख्यांनी केले. आज त्याचेच फळ म्हणून त्याच मजबूत जोत्यावर भाजपच्या यशाच्या उंच इमारती उभ्या दिसत आहेत. पायाचे असे काम करणाऱ्या सुमनताई भिडे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनाने संघर्षाचा नंदादीप निमाला अशी भावना व्यक्त करणारी ही श्रद्धांजली...
- योगेश भागवत, चिपळूण
----
सुमनताईंचे जीवन म्हणजे
संघर्षाचा नंदादीप
सुमनताईंचा आवाज अत्यंत खणखणीत. साधं बोलताना, वागतानासुद्धा अतिशय आक्रमक आणि निश्चयी असे ठाम बोलणे. त्या वागण्यातून आणि बोलण्यातूनसुद्धा संघर्षाची शिकवण. संघ-जनसंघ-भाजप यांच्या विचारांची आजन्म बांधिलकी. सत्तेचा लवलेश नसताना आणि निवडून येणार नाही, याची खात्री असताना कित्येक वर्ष घरची भाजीभाकरी घेऊन प्रचाराला फिरणारी अखेरची कार्यकर्ती. ५०हून जास्त वर्ष संघर्ष करत भारतीय जनता पक्ष आणि त्याचे विचार टिकवण्यासाठी फक्त कार्यकर्ती म्हणूनच राहिलेली जुन्या पिढीतील आदर्श महिला. अशा अनेक गुणवैशिष्ट्यांनी भरलेले त्यांचे आयुष्य होते.
माझ्या वयाच्या १६व्या वर्षी अर्थात् १९८७ मध्ये त्यांची आणि माझी मी संघाचा कार्यकर्ता म्हणून ओळख झाली. त्या आधी ३ वर्ष म्हणजे १९८४- ८५ या काळात मी चिपळूणमधील काविळतळी वडार कॉलनी या भागात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता म्हणून स्वतंत्र जबाबदारीने काम सुरू केले होते. प्रारंभीच्या काळात संघ कार्यकर्ता म्हणून त्या भागातील सुमनताईंची ओळख झाली आणि पुढे पुढे त्या ओळखीतून अतिशय जिव्हाळ्याचे आणि आपुलकीचे संबंध निर्माण झाले. सुमनताईंची मुलगी ज्योती, मला संगीत स्पर्धेमधून हार्मोनिअमची उत्तम साथ करणारा आणि सध्याच्या काळातील यशस्वी उद्योजक त्यांचा मुलगा विवेक, सुमनताईंचे पती गंगाधर भिडे हे त्यांचं कुटुंब हे माझे हक्काचे ठिकाण बनले.
सुमनताईंना माझ्या संघकार्याचे विशेष कौतुक होते. ३५ वर्षांपूर्वी १९९० या वर्षात त्यांना मी अतिशय मागास असलेल्या वडार कॉलनी या भागात तेथील कष्टकरी समाजातल्या गुणवंतांच्या सत्कारासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बोलवले होते. आम्ही मोठे होताना त्या काळात फार कोणी वेगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नसल्याने निवडणुका आल्या की, मी अभय चितळे, विवेक गिजरे यांच्यासोबत त्यांनी भिंती रंगवून पार्टीचेही काम केले. कैलासवासी तात्या नातू यांच्या अनेक निवडणुकांसाठी सुमनताई ट्रकात मागे बसून सकाळी घरातून बाहेर पडत आणि आमच्या सोबत ट्रकमध्ये मागे बसून गावोगाव प्रचार करून संध्याकाळी दमूनभागून घरी परत येत होत्या. कोणी वडापावसुद्धा देत नव्हते, अशावेळी त्यांच्यासोबत घरची पोळी, भाजीभाकरी हे आमच्यासाठी अमृतासमान होते. कितीही दमणूक झाली तरी दुसऱ्या दिवशी पदर खोचून पुन्हा प्रचाराची त्यांची तयारी असे.
त्यांच्यासोबत विचारांशी पक्की बांधिलकी असलेल्या प्रमिलाताई दाबके, विद्याताई आंबुर्ले, क्षेमाताई थत्ते, मंगला अभ्यंकर, मापातील मंगलाताई ढवण, बेंदरकराळीत अपर्णाताई पटवर्धन, खेंड भागातील पद्मजा सोहनी वहिनी, रावतळ्यातील मंगलाताई चितळे अशा काही निवडक महिला सदैव आघाडीवर होत्या. आम्ही युनायटेड इंग्लिश स्कूलच्या कऱ्हाड रोडकडील मैदानावर समाजवादी नेत्या मृणाल गोरे यांची सभा अंडी आणि टोमॅटो फेकून उधळून लावली. त्या आरोपाखाली मला पोलिसांनी पकडून अटक केली; पण ती सभा उधळून लावण्याचे नेतृत्व क्षेमाताई थत्ते आणि सुमन भिडे यांनी केले होते. आम्ही पाहिलेला त्यावेळचा सुमनताईंचा उत्साह आणि जोश थक्क करणारा होता.
त्या काळच्या समकालीन लोकांनी संघर्ष केला. आणखी एक महत्त्वाची गोष्ट. यातल्या कुणीही कधीही पदासाठी किंवा स्वार्थासाठी पक्ष बदलला नाही. कुणालाही पक्ष बदलावा असं कधीच वाटलं नाही. सुमनताईंना तर त्यांच्या कार्याच्या तुलनेमध्ये कधीच फार मोठे सामाजिक पद किंवा प्रतिष्ठा लाभली नाही; पण त्यांना याची कधीच तमा नव्हती.
आज भारतीय जनता पक्ष वटवृक्ष बनला आहे. मी एक कार्यकर्ता म्हणून भूतकाळाकडे जेव्हा पाहतो तेव्हा सुमनताई भिडे आणि त्यांचे समकालीन सर्व लोक यांचे मोठेपण आणि त्यांचे वेगळेपण मला ठसठशीतपणे जाणवते आणि ते मला घरात सतत तेवत राहणाऱ्या नंदादीपाप्रमाणे भासते. सुमनताई भिडे यांच्या निधनाने माझी वैयक्तिक मोठी हानी आहे; पण भारतीय जनता पक्षाच्या वाटचालीतील आणखी एक नंदादीप निमाला आहे.
आज अनेक कारणांनी भारतीय जनता पक्षामध्ये येणाऱ्या आणि आलेल्या कार्यकर्त्यांनी सुमनताई भिडे आणि त्यांच्या समकालीन कार्यकर्त्यांच्या जीवनाचा अभ्यास करावा. त्यांच्या खडतर संघर्ष केलेल्या कार्याचे मोठेपण समजून घ्यावे आणि अशा लोकांच्या वेगळेपणात आपण नक्की कुठे आहोत? असा प्रश्न भाजप किंवा संघपरिवारातील प्रत्येक नवीन कार्यकर्त्याने स्वतःला विचारत स्वतःला तपासणे, हीच कार्यकर्ता म्हणून सुमनताईंना श्रद्धांजली असेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.