शिस्त हा यशस्वी जीवनाचा पाया
97069
शिस्त हा यशस्वी जीवनाचा पाया
नंदकुमार घाटे ः देवगडात जांभवडेकरांचा निवृत्तीनिमित्त सत्कार
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. ७ ः शालेय जीवनात विद्यार्थ्यांना शिस्तीचे धडे मिळतात. मोठे झाल्यावर समाजात कसे वावरावे, याचे ज्ञानही विद्यार्थी दशेतच मिळते. त्यामुळे शालेय जीवनातच विद्यार्थ्यांनी अंगी शिस्त बाळगावी, असे आवाहन उद्योगपती नंदकुमार घाटे यांनी येथे केले. शिस्तीमुळे जीवनात माणुसकी हाच धर्म असल्याचीही जाणीव होत असल्याचे त्यांनी सांगितले.
येथील किल्ला प्राथमिक शाळेतील उपक्रमशील शिक्षक विकास जांभवडेकर यांची तालुक्यातील पाटथर शाळेत बदली झाली. साडेबारा वर्षे त्यांनी किल्ला प्राथमिक शाळेत अध्यापनाचे काम केले. त्यांची बदली झाल्याने त्यांना निरोप देण्यात आला. उद्योगपती नंदकुमार घाटे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. मंचावर उपनगराध्यक्षा मिताली सावंत, शिक्षक आनंद जाधव, नवीन जाधव, विकास जांभवडेकर, दीपिका जांभवडेकर, शिवराम निकम, आंचल धोंड, अंकिता भाटकर, सादिका शेख आदी उपस्थित होते.
घाटे यांनी शाळेच्या निर्मितीपासून तत्कालीन परिस्थितीत शिक्षणाची स्थिती कथन केली. उपनगराध्यक्षा सावंत यांनी, जांभवडेकर यांनी चांगले विद्यार्थी घडवले. शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार मिळत असल्याचे सांगितले. जांभवडेकर यांनी काम करताना कधी भेदभाव केला नाही. पालकांना सोबत घेऊन त्यांनी शैक्षणिक विकास साधल्याचे निकम यांनी सांगितले. आनंद जाधव यांनी, केंद्रातील शिक्षकांमध्ये जांभवडेकर यांची नेहमीच आघाडी असे. पालक, शिक्षक, समाज आणि विद्यार्थी एकत्र असल्यास शैक्षणिक विकास होतो, असे सांगितले. पालक नयना वाडेकर यांनी, ‘तोक्ते’ वादळानंतर शाळा इमारत दुरुस्तीसाठी जांभवडेकरांचे योगदान होते. कोरोना काळात त्यांनी चांगले काम केले. मुलांसोबत लहान होऊन त्यांनी विद्यार्थी घडवले, असे गौरवोद्गार काढले. यावेळी राधा खवणेकर, नवीन जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. स्वाती पांचाळ यांनी आभार मानले.
...............................
शिस्त, जबाबदारी, कर्तव्याला प्राधान्य
यावेळी विकास जांभवडेकर यांनी, शाळेत शिकवण्याचे आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पूर्ण केले. या काळात मुलांमध्ये जिद्द निर्माण केली. आपले काम प्रामाणिकपणे करण्यासह मुलांनाही प्रामाणिकपणा शिकवला. शिस्त आणि जबाबदारपणा याकडे कटाक्षाने लक्ष दिले. मुलांचे हस्ताक्षर सुधारण्यावर भर दिला. मुलांना शिस्त लावताना पालकांचेही सहकार्य मिळाले, असे सांगितले.