खेर्डीचा लौकिक वाढवणारा “आयर्न मॅन”
- rat७p८.jpg-
२५N९७०६१
चिपळूण ः आयर्न मॅन किताब मिळवलेले प्रशांत दाभोळकर यांचा प्राप्त गौरव करताना गोंदू गुप्ते कृष्णा.
खेर्डीचे प्रशांत दाभोळकर ठरले ‘आयर्न मॅन’
कोल्हापूच्या ट्रायथलॉन स्पर्धेत यश ; सात तास ४६ मिनिटांत पूर्ण केले अंतर
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ७ ः तालुक्यातील खेर्डी गावाने कधी काळी लोह उद्योगासाठी नाव कमावले होते. आता गावातील नव्या पिढीने ‘लोहपुरुष’ घडवला आहे. प्रशांत दाभोळकर या खेर्डीतील तरुणाने कोल्हापूर येथे पार पडलेल्या ट्रायथलॉन स्पर्धेत ‘आयर्न मॅन’ हा प्रतिष्ठेचा किताब मिळवला आहे.
कोल्हापूरमध्ये नुकत्याच झालेल्या या स्पर्धेत देश-विदेशातील ३००हून अधिक सायकलपटू सहभागी झाले होते. अत्यंत कठीण अशा या स्पर्धेत स्विमिंग १.९ किलोमीटर, सायकलिंग ९० किमी आणि धावणे २१.१० किमी असा त्रिसंघर्षात्मक प्रकारांचा समावेश असतो. ही स्पर्धा १० तासांच्या आत पूर्ण करण्याची ही अट आहे. दाभोळकर यांनी ही अवघड स्पर्धा केवळ ७ तास ४६ मिनिटांमध्ये पूर्ण करत खेर्डीसह चिपळूणवासियांचा अभिमान वाढवला आहे. ते खेर्डीचे रहिवासी आहेत. सुरुवातीला त्यांनी कराटे प्रशिक्षक म्हणून कारकीर्द सुरू केली होती. ते स्वतः ब्लॅक बेल्ट विजेते असून, प्रशिक्षण केंद्र चालवतात. सशक्त शरीर ठेवण्याची आवड असल्यामुळे त्यांनी विविध खेळात प्रयत्न केले. २०२३ मध्ये त्यांनी सायकलिंग क्षेत्रात प्रवेश केला. पहिल्याच वर्षी त्यांनी १००० किमीची बीआरएम ही सायकलिंग स्पर्धा फक्त ७३ तासांत पूर्ण केली. त्यानंतर १२०० किमीची एलआरएम ही अजून कठीण स्पर्धा ८६ तासांत पार केली. या कामगिरीमुळे त्यांचा दोनवेळा ‘सुपर रँडोनर’ हा किताब देऊन सन्मान झाला आहे. या कामगिरीची दखल घेत रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सायकलिंग क्लबने त्यांना सायकल सम्राट हा विशेष पुरस्कार दिला.
कोल्हापूर येथील स्पर्धा पूर्ण केल्यानंतर त्यांचा चारवेळा आयर्न मॅन किताब मिळवलेले प्रसिद्ध ट्रायथलॉनपटू गोंदू गुप्ते कृष्णा यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला. दाभोळकर यांची ही कामगिरी ही केवळ एक वैयक्तिक यशकथा नाही तर खेर्डी गावाला, चिपळूण तालुक्याला आणि संपूर्ण कोकणाला ‘होऊ शकतं’ अशी नवी दिशा देणारी गोष्ट आहे. एक मध्यमवर्गीय, ग्रामीण पार्श्वभूमीतून आलेला खेळाडू जिद्दीने, मेहनतीने आणि सकारात्मक दृष्टिकोनाने आंतरराष्ट्रीय दर्जाची कामगिरी करू शकतो, हे त्यांनी सिद्ध केलं आहे.
----
चौकट
रोज सहा तास सराव
‘आयर्न मॅन’ बनण्याचे स्वप्न बाळगून प्रशांत यांनी तयारी केली. किरकोळ दुखापतीमुळे या स्पर्धेत मागीलवेळी त्यांना सहभागी होता आले नव्हते; मात्र त्यांनी हार मानली नाही. दुखापतीतून सावरल्यानंतर त्यांनी दररोज सहा तास सराव केला. वाशिष्टी नदी आणि चिपळूण नगरपालिकेच्या जलतरण तलावात पोहण्याचा विशेष सराव केला. धावणे ही पूर्वीपासून त्यांची ताकद होतीच; परंतु स्पर्धेसाठी त्यांनी दररोज ५० किमी सायकलिंग केले. स्पर्धेपूर्वीचा संपूर्ण वर्षभराचा कठोर आणि शिस्तबद्ध सराव, आहार, वेळेचे नियोजन तसेच कुटुंब आणि चिपळूण सायकलिंग क्लब यांचं सातत्यपूर्ण पाठबळ यामुळे त्यांनी ही अभूतपूर्व कामगिरी केली.
---
कोट
आयर्न मॅन हा किताब केवळ माझा नाही. माझ्या कुटुंबाचा, माझ्या गावाचा, चिपळूण सायकलिंग क्लबचा आहे. आता पुढचं लक्ष्य आहे ‘टायगर मॅन’ स्पर्धा पूर्ण करून अजून एक मैलाचा दगड गाठण्याचं.
- प्रशांत दाभोळकर, खेर्डी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.