-चिपळूणसाठी हवी स्वतंत्र रेल्वे
चिपळूणवासियांना हवी ‘सुपरफास्ट रेल्वे’
मेमूचे प्रवाशांकडून स्वागत; एका दिवसात मुंबई प्रवासाची संकल्पना
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ७ ः दिवाळीसाठी कोकण रेल्वेमार्गावर सोडण्यात येणाऱ्या मेमू रेल्वेचे नागरिकांकडून स्वागत केले जात आहे; मात्र चिपळूणमधील नागरिकांना सकाळी मुंबईत जाऊन संध्याकाळी परतता येईल, अशी नवी रेल्वे सुरू करावी ही मागणी जोर धरू लागली आहे.
दिवाळीच्या काळात कोकण रेल्वेमार्गावर पर्यटकांची गर्दी वाढणार आहे. या पार्श्वभूमीवर कोकणात येणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सोपा, सुखकर व्हावा यासाठी कोकण रेल्वेने दिवाळीच्या काळात दोन मेमू स्पेशल ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ही अनारक्षित डब्यांची गाडी ५ ऑक्टोबरपासून कोकण रेल्वेमार्गावर सुरू झाली आहे. या रेल्वेला प्रवाशांचा फारसा प्रतिसाद मिळत नाही. कारण, रेल्वेचे वेळापत्रक चिपळूणमधील प्रवाशांच्या गैरसोयीचे आहे. ही रेल्वे चिपळूणपासून पुढे पनवेलपर्यंत सर्व स्थानकावर थांबते. धीम्या गतीने चालणाऱ्या या रेल्वेमुळे नागरिकांना कमी खर्चात मुंबईत जाणे सोयीचे झाले आहे; परंतु जलद प्रवास करण्याची नागरिकांची प्रतीक्षा कायम आहे. कोकण रेल्वेमार्गावर दिवसभरात एकूण २३ एक्स्प्रेस रेल्वे धावतात. त्यातील काही रेल्वेंना चिपळूणमध्ये थांबा आहे. या एक्स्प्रेस गाड्यांमधून प्रवास करताना चिपळूणसह उत्तर रत्नागिरी भागातील प्रवाशांना कायमच प्रतीक्षायादीत राहावे लागते. अनेकदा लोंबकळत प्रवास करावा लागतो. सकाळी निघालेला प्रवासी दुपारी आणि दुपारी निघालेला रात्री पोचतो. त्यामुळे एखादी व्यक्ती मुंबईत कामासाठी गेली तर, चिपळूणमध्ये परतण्यासाठी दुसरा दिवस उजाडतो. एका दिवसाच्या कामासाठी दोन ते तीन दिवस वाया जातात. मुंबईत खरेदीसाठी जाणारे व्यापारी रविवारी संध्याकाळच्या ट्रेनने निघतात. मध्यरात्री किंवा पहाटे पोहोचल्यानंतर सकाळपासून दिवसभर खरेदी करतात आणि पुन्हा रात्रीच्या ट्रेनने माघारी परततात. दोन रात्री व्यवस्थित झोप मिळत नाही. त्यामुळे चिपळूणमधील नागरिकांना रत्नागिरीतून पहाटे पाच वाजता सुटणारी एक्स्प्रेस गाडी हवी आहे, जी चिपळूणला ६.१५ येईल. खेड, रोहा, पनवेल, ठाणे नंतर ती सकाळी दहा वाजता दादरला पोहचेल. तीच रेल्वे संध्याकाळी सात वाजता दादरमधून सुटली की, रात्री अकरा वाजेपर्यंत चिपळूणमध्ये पोहोचेल. म्हणजे सकाळी मुंबईत जाऊन दिवसभरात आपली कामे करून पुन्हा रात्री घरी येता येईल. मासिक पास काढून प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढेल.
-------
२५N९७०६२
कोट
रेल्वे प्रशासनाने दक्षिणेकडील सर्व गाड्या सुरू ठेवल्या आहेत. उत्तर भारतीय जनतेकरिता जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. त्यामुळे त्या लोकांचे लोंढेच्या लोंढे मुंबईत ये-जा करत असतात. रत्नागिरी जिल्ह्यासाठी सुपरफास्ट गाडी हवी असून, तो आमचा हक्क आहे. मेमू देऊन तोंडाला पाने पुसली जात आहेत. या गाडीला सर्व ठिकाणी क्रॉसिंगकरिता थांबवले जात आहे. त्यामुळे हा प्रवास डोकेदुखी ठरू शकतो.
- इंतिकाब चौगुले, चिपळूण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.