-पित्रे महाविद्यालयात रंगले टिपरी नृत्य
पित्रे महाविद्यालयात रंगले टिपरी नृत्य
स्पर्धेला प्रतिसाद; १२वी संयुक्त वर्गाला विजेतेपद
सकाळ वृत्तसेवा
साडवली, ता. ८ ः देवरूख येथील आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयात नवरात्रोत्सवातील सरस्वतीपूजनाचा कार्यक्रम आनंददायी वातावरणात आयोजित झाला. या निमित्त आयोजित पारंपरिक टिपरी नृत्य स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी सरस्वती देवीच्या प्रतिमेचे व ग्रंथांचे विधीवत पूजन केले. या वेळी उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, प्रा. धनंजय दळवी, प्रा. अभिनय पातेरे, प्रा. आर्य अणेराव उपस्थित होते. सरस्वती व ग्रंथपूजनासाठी आर्यन व आयुष या सोनवडकर बंधूंनी आकर्षक पुष्पहार तयार करून उपस्थितांची शाबासकी मिळवली. नवरात्रोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांसाठी पारंपरिक टिपरी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थिनींनी पारंपरिक व रंगीबेरंगी वेशभूषेत सादर केलेल्या टिपरी नृत्याने वातावरण उत्साहवर्धक केले. पारंपरिक टिपरी नृत्य स्पर्धेचे परीक्षक प्रा. सानिका भालेकर यांनी केले. स्पर्धेत कनिष्ठ महाविद्यालयातील ९ संघ सहभागी झाले होते. स्पर्धेचे विजेतेपद १२वी संयुक्त वर्गाने तर उपविजेतेपद ११वी वाणिज्य वर्गाने प्राप्त केले. तृतीय क्रमांक १२वी बँकिंग वर्गाने तर उत्तेजनार्थ पारितोषिक १२वी वाणिज्य वर्गाने मिळवले.
विजेतेपद प्राप्त करणाऱ्या १२वी संयुक्त वर्गाने उत्तम पदलालित्याच्या सहाय्याने नृत्य सादरीकरण, संगीत व गायनाने रसिकांची मने जिंकली. विद्यार्थिनींनी डोक्यावर समई व हातात प्रज्वलित दीप घेऊन उत्तम समतोलाद्वारे सादरीकरण करून उपस्थितांची वाहवा मिळवली. या संघातील नेत्रा कदम या विद्यार्थिनीने पायात परात पकडून नृत्य सादर करून रसिकांच्या डोळ्याचे पारणे फेडले. या संघात नेत्रा कदमसह समीक्षा भिशे, विजया कांगणे, प्रणाली गुरव, तनुजा उंडे, सानिका आग्रे, रिया जोयशी, हर्षदा अडबल, तन्वी खांडेकर यांनी नृत्य सादर केले. संगीतसाथ विराज गुरव, सार्थक खेडेकर व पार्थ गोपाळ यांनी दिली. गायनाची बाजू सिद्धी पर्शराम आणि कोरस साथ नेत्रा कदम व सांची सावंत यांनी उत्तमप्रकारे सांभाळली.