निवडणुकीचे बिगुल लवकरच वाजणार

निवडणुकीचे बिगुल लवकरच वाजणार

Published on

निवडणुकीचे बिगुल लवकरच वाजणार
राजकीय पक्षांची जमवाजमवः महायुती एकत्र लढणार की स्वबळाचा नारा देणार?
तुषार सावंतः सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. ९ः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजू लागले आहे. जिल्हा परिषदेसह नगरपरिषद आणि नगरपंचायतींचे आरक्षण जाहीर झाले असून दिवाळीनंतर नगरपालिका, नगरपंचायत आणि डिसेंबर मध्ये जिल्हा परिषद, पंचायत समितींच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोग याचा कार्यक्रम लवकरच जाहीर करण्याची शक्यता असल्याने राजकीय पक्षांची तयारी सुरू झाली आहे. सर्वच राजकीय पक्ष स्वबळाचा नारा देत असले तरी भाजप आणि शिवसेना शिंदे गट एकत्रित लढणार का यावर बरेच काही अवलंबून राहणार आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अर्थात जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुका गेल्या चार वर्षापासून प्रलंबित आहेत. इतर मागास प्रवर्गातील आरक्षणाचा तिढा अखेर सुटला असून आता जोरदार तयारी सुरू झाली आहे. प्रभाग रचना निश्चित झाल्या असून सदस्य संख्येप्रमाणे ५० टक्के महीलासह जातनिहाय आरक्षण निश्चित केले जाणार आहे. तत्पूर्वी कणकवली नगरपंचायतीच्या प्रभाग रचना आणि आरक्षण सोडत कार्यक्रम पूर्ण झाला आहे. नगरपरिषदांचा ही कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे या निवडणुका निश्चितपणे ३१ डिसेंबर पूर्वी पूर्ण होतील अशी शक्यता आहे. गेल्या चार वर्षापासून या स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासकीय राजवट आहे. त्याचा विकास कामावर मोठा परिणाम झाला आहे.
लोकसभा आणि विधानसभेचा कल हा महायुतीच्या पदरात पडला आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महायुती एकत्रित लढणार का याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. सर्वच राजकीय पक्ष स्वतंत्र लढण्याची भाषा आज बोलत असले तरी वरिष्ठ पातळीवरून निवडणुका एकत्रित लढण्याबाबतच विचार विनिमय सुरू आहे. आता त्याला अंतिम रूप येत्या पंधरा दिवसात येईल अशी शक्यता आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या तीन विधानसभा मतदारसंघांपैकी दोन विधानसभा मतदारसंघ हे शिवसेना शिंदे गट तर एक विधानसभा मतदारसंघ हा भाजपकडे आहे. या तीनही विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण ५० जागांसाठी जिल्हा परिषदेच्या आणि १०० जागांसाठी पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहे. मात्र, या जागांचे वाटप कशा पद्धतीने होते. यावर महायुतीचा एकत्रित लढण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर आजही खासदार नारायण राणे यांचा एक हाती अमल आहे. मात्र या खेपेस राजकीय चित्र कमालीचे बदलले आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गट म्हणजेच महाविकास आघाडी एकत्रित लढणार का याबाबतही अद्याप निर्णय झालेला नाही. काँग्रेसकडे पारंपारिक मतदार आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडेही मतांची बेगमी आहे. मात्र, शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडे प्रभावी मतदार आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी म्हणून लढत झाली तर जागा वाटपाचा तिढा मात्र संघर्षाचा ठरणार आहे. जशी परिस्थिती महायुतीमध्ये आहे तसेच परिस्थिती महाविकास आघाडीमध्ये आहे.

चौकट
पक्षातील प्रमुख कार्यकर्त्यांवर लक्ष
गेल्या पाच वर्षापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भाजपने एक हाती अंमल ठेवला होता. मात्र, शिवसेना शिंदे गटाच्या अस्तित्वानंतर राजकीय बदल कमालीचे झाले आहेत. त्यामुळे येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पक्षातील प्रमुख कार्यकर्त्यांवर लक्ष ठेवून मोठ्या प्रमाणात पक्षांतर होण्याची शक्यता आहे. पुढच्या काळामध्ये पक्षप्रवेशांना ऊत येईल असे बोलले जात आहे. सत्तेतील भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडे राजकिय कार्यकर्ते ओढले जात आहेत.
-----------------
लाडक्या बहिणींच्या नाराजीची गणिते
राज्य सरकारने विधासभा निवडणूकी पुर्वी महीलांसाठी दरमहा २१०० रूपये घोषित केले. पण, १५०० रूपये मिळाले. मात्र, सध्या या लाडक्या बहीणींन मध्ये नाराजी आहे. गेल्या दोन महीण्यापासून खात्यात रक्कम जमा झालेली नाही. सरकारने केवायसी बंधणकारक केली आहे. ज्यांची केवायसी झाली नाही अशा महील्यांना सप्टेंबर २०२५ मधील हप्ता अजून ही मिळाला नाही. ज्या संकेस्थळावर ई- केवायसी केली जाते तेथे अडचणी आहेत. त्यामुळे अनेक महीला अपात्र ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्यांची ई- केवायसी होत नाही तेथे नाराजीचा सुरू असल्याने याचा थेट परिणाम आगामी मतदानावर होईल अशी शक्यता आहे.
----------------

चौकट
मुदत संपलेल्या संस्था
जिल्हा परिषद २१ मार्च २०२२
पंचायत समित्या १३ मार्च २०२२
कणकवली नगरपंचायत ४ मे २०२३
सावंतवाडी, मालवण, वेंगुर्ला - २०२१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com