
सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्यास दंड
खेर्डी ग्रामपंचायतीचा निर्णय ; फोटो दिल्यास बक्षीस
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ९ ः शहराजवळील खेर्डी ग्रामपंचायतीच्यावतीने घंटागाडीद्वारे गावातील कचरा संकलित केला जातो. तरीही सार्वजनिक ठिकाणी काही नागरिकांकडून कचरा टाकला जातो. याला आळा घालण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्यास एक हजार रुपये दंड केला जाणार आहे. कचरा टाकणाऱ्याचा फोटो काढून दिल्यास ५०० रुपयांचे बक्षिस दिले जाईल, असा निर्णय खेर्डी ग्रामपंचायतीने घेतला आहे. त्यामुळे कचरा टाकणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
तालुक्यात सर्वाधिक श्रीमंत असलेल्या खेर्डी गावात गेल्या काही वर्षापासून घंटागाडीचा उपक्रम राबवला जात आहे. या सुविधेमुळे गावातील अंतर्गत तसेच सार्वजनिक ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य अथवा ढीग दिसत नाहीत. गावात घंटागाडीची सुविधा असतानाही काही सार्वजनिक ठिकाणी बिनधास्तपणे रस्त्याच्या कडेला कचरा टाकला जातो. सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकण्याबाबत ग्रामपंचायतीकडून वारंवार प्रसिद्धी करत सूचना देण्यात आल्या आहेत. याबाबत जनजागृतीदेखील केली आहे; मात्र तरीही काही ठिकाणी कचऱ्याचे ढीग आढळत आहेत. त्यास पायबंद घालण्यासाठी ग्रामपंचायतीने दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. ग्रामसभेत यावर चर्चा करून तसा निर्णय घेण्यात आला. सोशल मीडिया तसेच जनजागृती फलकाद्वारे याची माहिती ग्रामस्थांना दिली जात आहे.
चौकट
सामूहिक स्वच्छतामोहीम राबवणार
गावात नियमित स्वच्छता राहण्यासाठी प्रत्येक वाडीत सामूहिक स्वच्छतामोहीम राबवण्यात येणार आहे. या कामी बचतगटाच्या महिलांनी मोठा पुढाकार घेतला आहे. लोकसहभागातून स्वच्छता अभियान आणि दंडात्मक कारवाईच्या बडग्यामुळे खेर्डीत नियमित स्वच्छता राहण्यास मदत होणार आहे, असा विश्वास सरपंच सुगंधा माळी, उपसरपंच अभिजित खताते व सर्व सदस्यांनी व्यक्त केला.