चिपळूण-युती-आघाडी झाल्यास जागा वाटपाचा संघर्ष अटळ

चिपळूण-युती-आघाडी झाल्यास जागा वाटपाचा संघर्ष अटळ

Published on

स्थानिक पातळीवर स्वबळाचीच तयारी
पक्ष वाढीवरच राजकर्त्यांचा भर; युती-आघाडी झाल्यास जागावाटपाचा संघर्ष अटळ
मुझफ्फर खानः सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १० : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवल्या जातील, असे नेते सांगत आहेत; मात्र युती किंवा आघाडी झाली तर जागावाटपाचा तिढा संघर्षाचा ठरणार आहे. प्रत्येकाला आपला पक्ष वाढवायचा आहे. युती किंवा आघाडी झाली तर पक्षवाढ होणार नाही. त्यामुळे सर्वच पक्षाकडून स्वबळाची तयारी सुरू असल्याचे दिसते. त्याला अंतिम रूप येत्या पंधरा दिवसात येईल, अशी शक्यता आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजू लागले आहे. जिल्हा परिषदेसह पंचायत समिती, पालिका आणि नगरपंचायतींचे आरक्षण जाहीर झाले आहे. दिवाळीनंतर पालिका, नगरपंचायत आणि डिसेंबरमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समितींच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे. दिवाळीनंतर राजकीय फटाके फुटणार आहेत. जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या चार वर्षापासून प्रलंबित आहेत. गेल्या चार वर्षापासून या स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासकीय राजवट आहे. त्याचा विकासकामावर मोठा परिणाम झाला आहे.
लोकसभा आणि विधानसभेचा कल महायुतीच्या पदरात पडला आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महायुती एकत्रित लढणार का, याबाबत चर्चा सुरू आहेत. इतर मागास प्रवर्गातील आरक्षणाचा तिढाही सुटला असून, आता जोरदार तयारी सुरू झाली आहे. प्रभागरचना निश्चित झाल्या असून, सदस्यसंख्येप्रमाणे ५० टक्के महिलांसह जातनिहाय आरक्षण निश्चित केले जाणार आहे. जिल्ह्यातील पाचपैकी ३ मतदार संघ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे तर अजित पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंच्या सेनेकडे प्रत्येकी एक मतदार संघ आहे.
यापूर्वी रत्नागिरी जिल्हा परिषदेवर शिवसेनेचे एकहाती वर्चस्व होते. आता परिस्थिती बदलली आहे. जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे प्राधान्य वाढले आहे. भाजपची ताकदही जिल्ह्यात वाढली आहे. अजित पवारांची राष्ट्रवादी चिपळूणमध्ये चांगल्या स्थितीत आहे. हे तिन्ही पक्ष सत्तेत असल्यामुळे निश्चितच प्रत्येकाला जागावाटपात मोठा वाटा अपेक्षित आहे. त्यामुळे स्थानिक नेते जागावाटपांचे गणित कशा पद्धतीने सोडवणार, यावर युतीचे भवितव्य अवलंबून आहे.

चौकट
पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे पक्षप्रवेश
पालकमंत्री उदय सामंत यांनी मागील काही वर्षापासून जिल्ह्यात एकहाती अंमल ठेवला आहे. ज्या पक्षाचा पालकमंत्री त्या पक्षात प्रवेश करण्यासाठी कार्यकर्ते उत्सुक असतात. त्यामुळे येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पक्षातील प्रमुख कार्यकर्त्यांवर लक्ष ठेवून मोठ्या प्रमाणात पक्षांतर होण्याची शक्यता आहे. सत्तेतील भाजप आणि शिवसेना शिंदेगटाकडे कार्यकर्ते ओढले जात आहेत.

चौकट
लाडक्या बहिणींच्या नाराजीची गणिते
राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी महिलांसाठी दरमहा २१०० रुपये घोषित केले; पण, १५०० रुपये मिळाले. मात्र, सध्या या लाडक्या बहिणींमध्ये नाराजी आहे. गेल्या दोन महिन्यापासून खात्यात रक्कम जमा झालेली नाही. सरकारने केवायसी बंधनकारक केली आहे. ज्यांची केवायसी झाली नाही अशा महिलांना सप्टेंबरमधील हप्ता अजून मिळाला नाही. ज्या संकेतस्थळावर ई-केवायसी केली जाते तेथे अडचणी आहेत. त्यामुळे अनेक महिला अपात्र ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्यांची ई-केवायसी होत नाही तेथे नाराजीचा सूर असल्याने याचा थेट परिणाम आगामी मतदानावर होईल, अशी शक्यता आहे.

कोट
रत्नागिरी जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आहे. जागावाटपात चिपळूणसह जिल्ह्यात आमच्या पक्षाला सन्मानाने वाटा मिळावा. सन्मानपूर्वक युती झाली नाही तर आम्ही स्वतंत्र लढण्यास तयार आहोत.
- शेखर निकम, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com