स्त्री-पुरुष समानतेची भावना रुजवा
97915
स्त्री-पुरुष समानतेची भावना रुजवा
न्यायाधीश स्वाती पाटील ः सिंधुदुर्गनगरीतील कार्यक्रमात जागृती
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ११ ः समाजात स्त्री-पुरुष समानतेची कल्पना पूर्णपणे रुजली पाहिजे. स्त्री ही उपभोग्य वस्तू नसून ती व्यक्ती आहे याचे भान समाजाला येत नाही, तोपर्यंत लैंगिक छळासारख्या समस्या निर्माण होत राहणार. त्यासाठी योग्य कायदेशीर तरतुदी, समित्या या सर्व बाबी महत्त्वाच्या आहेत; पण मनाची नैतिकताही तेवढीच महत्त्वाची आहे. सगळ्यांत मोठी जबाबदारी म्हणजे, स्त्री-पुरुषांनी सहकारी म्हणून एकमेकांसोबत सहकार्याने काम केले पाहिजे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे तिसरे सहदिवाणी न्यायाधीश (व.स्तर) व अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी स्वाती पाटील यांनी केले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आयोजित ‘कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ २०१३’ या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांनी दिलेल्या निर्देशान्वये प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण डॉ. सुधीर देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्गतर्फे ‘कामाच्या ठिकाणी महिलांचा लैगिक छळ २०१३’ हा कार्यक्रम सिंधुदुर्गनगरी येथील पत्रकार भवनात नुकताच झाला. सिंधुदुर्ग डाक विभाग अधीक्षक एन. टी. कुरलपकर, सहायक अधीक्षक व्ही. जी. गिरकर, सहायक लोकअभिरक्षक ॲड. रुचा लोखंडे तसेच सिंधुदुर्ग डाक विभागामधील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
न्यायाधीश पाटील म्हणाल्या, ‘महिला आता मुलगी, सून, पत्नी, माता या चौकटीत न राहता स्वावलंबी बनत आहे. डॉक्टर, अभियंता, वैमानिक, न्यायाधीश, शिक्षक अशा विविध क्षेत्रांमध्ये आपला ठसा उमटवला आहे. त्यांनी ही चमक आपल्या कर्तृत्वाने दाखवली आहे. थोर समाजसुधारकांनी स्त्री-पुरुष समानतेची चळवळ उभी केली. त्याला काही अंशी यश आल्याचे दिसून येत आहे.’
अधिवक्ता ॲड. रुचा लोखंडे यांनी, अंतर्गत समितीची भूमिका, तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया (३ महिन्यांच्या आत) आणि लैंगिक छळाचे प्रकार समजून सांगत कायदा अंतर्गत समितीच्या सदस्यांनी या कायद्याची गंभीरता समजून घेऊन प्रत्येक तक्रारीकडे संवेदनशीलतेने व कायदेशीर दृष्टिकोनातून पाहणे आवश्यक आहे, असे सांगितले. महिलांनी या कायद्याचा गैरवापर न करता आपल्या हक्कांच्या संरक्षणासाठी याचा योग्य उपयोग करावा, असेही त्यांनी नमूद केले. कार्यालय सहाय्यक श्वेता मुसळे यांनी सूत्रसंचालन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.