
97920
विज्ञान नाट्यरुपात ज्ञान, कल्पकता, अभिनयाचा मेळ
राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव; कुडाळातील उपक्रमास विद्यार्थ्यांचा प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ११ ः राज्य विज्ञान शिक्षण संस्था, रविनगर नागपूर, विभागीय शिक्षण उपसंचालक, कोल्हापूर, माध्यमिक शिक्षण विभाग सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव-२०२५’ ही जिल्हास्तरीय स्पर्धा नुकतीच मराठा सभागृह (ता. कुडाळ) येथे उत्साहात झाली. या स्पर्धेत जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून अव्वल ठरलेल्या अशा आठ शाळांच्या संघांनी दर्जेदार नाटिकांचे सादरीकरण केले. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना वाव देण्यासाठी शिक्षण विभाग व जिल्हा विज्ञान मंडळाने हे यशस्वी आयोजन केले.
माध्यमिक शिक्षणाधिकारी कविता शिंपी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष वामन तर्फे, माजी सचिव गुरुदास कुसगावकर, जिल्हा विज्ञान मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग काकतकर, सचिव प्रकाश कानूरकर, उपाध्यक्ष रघुनाथ कारेकर, जिल्हा संघटक सत्यपाल लाडगावकर आदी उपस्थित होते. कुडाळ हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी स्वागतगीत सादर केले. स्पर्धेतील प्रत्येक संघाने विविध वैज्ञानिक संकल्पना नाट्यरुपाने मांडत ‘विकसित तंत्रज्ञानाचा मानवी जीवनात उपयोग’ याबाबत प्रभावी संदेश दिला. उल्लेखनीय शैक्षणिक कार्याबाबत वामन तर्फे, प्रकाश कानूरकर, संजय वेतुरेकर, गुरुदास कुसगावकर आदींचा सन्मान करण्यात आला. दिनेश म्हाडगुत, सुरेंद्र गवस आदींच्या उपस्थितीत बक्षीस वितरण केले. रुपेश नेवगी, संतोष पवार आणि प्रदीप बर्डे यांनी परीक्षण केले. विद्यानंद पिळणकर, गिरीश गोसावी यांनी सूत्रसंचालन केले. प्रीती सावंत यांनी आभार मानले.
----
कुडाळ हायस्कूल, कुडाळ संघ प्रथम
या स्पर्धेत कुडाळ हायस्कूल, कुडाळ संघाने प्रथम, सावंतवाडी मिलाग्रीस हायस्कूल द्वितीय आणि सौ. इंदिराबाई दत्तात्रय वर्दम हायस्कूल पोईप-विरण (मालवण) संघाने तृतीय क्रमांक मिळविला. याव्यतिरिक्त उत्कृष्ट नायक-सचिन परब (पोईप हायस्कूल), उत्कृष्ट नायिका-सावी मुद्राळे (कासार्डे हायस्कूल), उत्कृष्ट दिग्दर्शक-गुरुप्रसाद शिरसाट (कुडाळ हायस्कूल), उत्कृष्ट नेपथ्य-दत्ताराम नाईक (मिलाग्रीस हायस्कूल, सावंतवाडी) यांना गौरविले.