धाकोरेतील ‘त्या’ रस्त्याची हद्द पुन्हा निश्चित करावी
97943
धाकोरेतील ‘त्या’ रस्त्याची
हद्द पुन्हा निश्चित करावी
ग्रामस्थ ः कायमस्वरूपी मोकळा करा
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ११ ः प्रशासनाने अतिक्रमण हटवलेला धाकोरे गावातील होळीचे बाटली ते अशोक साटेलकर व तिथून रघुनाथ मुळीक घरापर्यंतच्या रस्त्याची हद्द पुन्हा निश्चित करून रस्ता कायमस्वरूपी मोकळा करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी तहसीलदार श्रीधर पाटील यांच्याकडे केली आहे. याबाबत त्यांनी लेखी निवेदनही सादर केले.
यासंदर्भात राजू साटलकर यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, ‘धाकोरे गावातील या रस्त्याची तीन सप्टेंबरला मोजणी करून १७ सप्टेंबरला अतिक्रमण हटवण्याची कारवाई केली होती. या कारवाईत जेसीबीद्वारे बेकायदेशीर बांधकाम हटविले होते आणि सरकारी रस्ता मोकळा केला होता. यावेळी ग्रामस्थांनी तहसीलदार, ग्रामपंचायत तसेच पोलिस प्रशासनाचे आभार मानले होते. मात्र, कारवाईदरम्यान काही ठिकाणी सिमेंटचे खांब काढले, ते पुन्हा बसविलेले नाहीत. काही ठिकाणी अतिक्रमण पुन्हा केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे या रस्त्याची हद्द पुन्हा निश्चित करून रस्ता कायमस्वरूपी मोकळा ठेवण्याची मागणी त्यांनी नियोजनाद्वारे केली आहे. रस्त्यावरील अडथळे पूर्णपणे काढून रस्ता वाहतुकीस खुला करावा व या रस्त्याचे डांबरीकरण तातडीने करावे, जेणेकरून ३५ वर्षांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम मिळेल.’