निसर्गाला आरक्षण द्या, नाहीतर मरणाला तयार व्हा...

निसर्गाला आरक्षण द्या, नाहीतर मरणाला तयार व्हा...

Published on

वसा वसुंधरा रक्षणाचा... लोगो

rat12p12.jpg
98072
प्रशांत परांजपे

इंट्रो

शाळेत परिपाठ आणि पर्यावरणाच्या तासिकेला शिकलेल्या व शिकवल्या जाणाऱ्या प्रत्येक गोष्टी आयुष्याच्या अंतापर्यंत आचरणात आणायच्या असतात. त्या प्रत्येक गोष्टीवर अधिक अभ्यास करून सदाचार आचरणात आणायचा असतो. पण त्याचा विसर पडल्यामुळे आज निसर्गाची अतोनात हानी होत आहे.
- डॉ. प्रशांत परांजपे, दापोली


निसर्गाला आरक्षण द्या, नाहीतर मरणाला तयार व्हा...


धर्म-जाती- प्रांत - भाषा - भेद इथले संपू दे...
माणसाने माणसाशी माणसा सम वागणे...

ही प्रार्थना केवळ शाळेमध्ये किंवा कार्यक्रमांच्या सुरुवातीला म्हणण्यापुरती स्तिमित राहू नये. प्रत्येकाच्या मनात सद्भावना, परोपकार आणि संवर्धन याची ज्योत प्रज्वलित होणे गरजेचे आहे. दुर्दैवाने सद्विचारांचे संवर्धन कमी होत चालले असून पैसा हेच सर्वस्व वाटू लागल्याने परिस्थिती प्रचंड गंभीर बनली आहे. शाळेत शिकलेल्या प्रत्येक गोष्टींचा उपयोग आणि वापर हा मनुष्याने आयुष्याच्या अंतापर्यंत करायचा असतो. मात्र याचा विसर पडल्यामुळे शाळेत पहिल्या तासाला शिकवलेल्या सर्व गोष्टी आपण कचराकुंडीत टाकतो. शाळेत प्रामुख्याने सातवीपर्यंत परिपाठ शिकवला जातो. माध्यमिक शाळांमध्ये परिपाठाला आणि पर्यावरण विषयाला कितपत महत्त्व आणि वेळ दिला जातो, हा संशोधनाचा विषय ठरेल. शिक्षण हे पायाभूत सुविधांचा विकास करणारे असावे. म्हणजे नक्की काय0 या पायाभूत सुविधांमध्ये शाश्वत पर्यावरण विकास हा विषय प्रत्येकाच्या मनामनात ठासून भरणे अत्यावश्यक झाले आहे.
वृक्षसंवर्धन, जलसंवर्धन, वायूसंवर्धन - अर्थात पंचमहाभूतांचे संवर्धन - या महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्दैवाने फारच कमी प्रमाणात लक्ष दिले जाते. तेही केवळ प्रकल्प (प्रोजेक्ट) पुरते किंवा गुणांच्या पूर्ततेकरिता मर्यादित राहते. त्यामुळे जो विद्यार्थी उद्याचा भारताचा सक्षम नागरिक आहे, त्याचाच पाया कच्चा राहतो. आणि त्यामुळे उद्याचा भारतीय नागरिक व पालक पर्यावरण संवर्धनात १०० टक्के नापास झालेला दिसतो. निसर्गाला आरक्षण देणे अत्यावश्यक आहे. ही बाब अनेक मुद्द्यांवर आधारित आहे.
पहिलीपासून ते पदवीपर्यंतचे पर्यावरण शिक्षण जीवनात अनिवार्य करणे आवश्यक आहे. सद्यःस्थितीत शाळा आणि महाविद्यालय स्तरावर पर्यावरण विषय फक्त परीक्षेतील गुणवाढीसाठी शिकवला जातो. या शिक्षणात बदल करून प्रात्यक्षिक (प्रॅक्टिकल) भागाला ७५ टक्के गुण देणे गरजेचे आहे. तसेच ज्या पद्धतीने चित्रकला, संगीत यांसारख्या विषयांना दहावी व बारावीमध्ये अतिरिक्त गुणांकन दिले जाते, त्याचप्रमाणे पर्यावरण विषयात वैशिष्ट्यपूर्ण सादरीकरण, लोकसहभाग आणि मानसिक बदल यावर काम करणाऱ्या विद्यार्थ्याला अतिरिक्त १० गुण देण्यात यावेत. त्यामुळे विद्यार्थी मन लावून अभ्यास करतील आणि जनतेपर्यंत ते ज्ञान पोहोचवण्याचा प्रयत्न करतील.
सर्व नियमावली विद्यार्थ्यांसाठीच का लागू असावी? परिपाठ आणि पर्यावरणासारख्या विषयांची नियमावली प्रत्येक पालक आणि नागरिकांसाठीही अनिवार्य असणे गरजेचे आहे. कारण शाळा-महाविद्यालयात पर्यावरण आणि परिपाठ शिकवले जात असले, तरी घरी पालकांचा त्या विषयांशी संबंध नसल्याचा गैरसमज असतो -त्यात बदल करणे आवश्यक आहे.
परिपाठाच्या किंवा पर्यावरणाच्या तासाला विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक नागरिकशास्त्र याचे धडे दिले जातात. मात्र घरी गेल्यानंतर पालकांना आपल्या पाल्याचे विषय, इयत्ता किंवा अभ्यासक्रम याची कल्पनाच नसते, ही गंभीर बाब आहे. त्यामुळे पर्यावरण साक्षरता ही पालकांमध्ये निर्माण होण्यासाठी ज्या पद्धतीने साक्षरता अभियान राबवले गेले, त्याच पद्धतीने पर्यावरण साक्षरता अभियान राबवणे अत्यावश्यक आहे. पर्यावरण साक्षरतेत कचरा साक्षरता, जल साक्षरता, प्रदूषण साक्षरता, ध्वनी साक्षरता, अक्षय साक्षरता इत्यादी मुद्दे येतात.
जगभर दररोज कुठेतरी भूस्खलन, महापूर, उष्माघात, कडाक्याची थंडी, अतिवृष्टी असे निसर्गकोपाचे प्रकार घडताना दिसतात. भारतातील उत्तराखंड, पंजाबपासून ते सोलापूर, छत्रपती संभाजीनगर आणि कोकणापर्यंत अनेक ठिकाणी पूरस्थिती गंभीर झाली आहे. पुढे कडाक्याच्या थंडीला आणि उष्माघाताला सामोरे जावे लागणार आहे. कोकणात सह्याद्रीच्या प्रचंड रांगा घनदाट वनराईने आच्छादिलेल्या आहेत. मात्र मानवाच्या वक्रदृष्टीमुळे या वनराईची शेकडो एकर जमीन नष्ट केली जात आहे.
शाळेत आपण शिकतो - झाडे लावा, झाडे जगवा; झाडे जमिनीची धूप थांबवतात; पावसाला आपलंसं करतात; हरित आच्छादन वाढवल्याने वातावरण शांत राहते, उष्णता कमी होते, सावली मिळते. मात्र हेच शिक्षण आपण पालक झाल्यानंतर विसरतो. परिणामी पर्यावरणाचा ऱ्हास वेगाने सुरू झाला आहे. नदी-नाले यांच्यावर अतिक्रमण करून आपण सिमेंटच्या जंगलांची उभारणी करत आहोत. नदी-खाड्यांमधील गाळ उपशाच्या नावाखाली अपरिमित वाळूचे उत्खनन होत आहे. त्याचा परिणाम जलव्यवस्थापनावर आणि जलसृष्टीवर होत आहे. रासायनिक सांडपाणी आणि कचरा नाल्यांमध्ये टाकल्यामुळे जलप्रदूषण आणि महापुरांचा धोका वाढतो आहे. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजेच आपण अनुभवत असलेला जागतिक तापमानवाढीचा परिणाम होय. वातावरणातील बदल हा एका क्षणात झालेला नाही. अनेक वर्षांपासून मानवाने डोळेझाक करून निसर्गाचा ऱ्हास केला आहे. त्यामुळे आज निसर्ग कोपला आहे आणि मानवाचा नाश करण्यास सज्ज झाला आहे. पुढील पंचवीस वर्षांत मानवाच्या अनेक प्रजाती नष्ट होण्याची भीती अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.
कोकणात सरळ, विस्तीर्ण रस्त्यांचा अट्टाहास सोडायला हवा. वळणावळणाचे, झाडांना वळसा घालून जाणारे रस्तेच निसर्गस्नेही आहेत. पण सध्या “विकास म्हणजे वृक्षतोड” ही चुकीची संकल्पना रुजल्यामुळे निसर्गाचा कोप अधिक वाढला आहे. तसेच प्रत्येक शहराच्या सीमेबाहेर डंपिंग ग्राउंडच्या नावाखाली उभे केलेले कचऱ्याचे डोंगर आता भूमीला सहन होत नाहीत. जलप्रदूषणाने सर्व मर्यादा ओलांडल्याने समुद्रतळापर्यंत प्लास्टिक कचऱ्याने व्यापले आहे. त्यामुळे जलचर किनाऱ्यावर येऊन गतप्राण होतात. समुद्रपातळी वाढल्यामुळे भूमी गिळंकृत करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. म्हणूनच निसर्गावरील होणारे अनन्वित अत्याचार थांबवून, कठोर नियमांची अंमलबजावणी करून निसर्गाला आरक्षण देणे अत्यावश्यक आहे.

(लेखक पर्यावरणाच्या शाश्वत विकास या विषयातील डॉक्टरेट पदवीधर आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com