पर्यावरण संवर्धनाचा ‘दशावतारा’तून संदेश
98284
पर्यावरण संवर्धनाचा ‘दशावतारा’तून संदेश
सुबोध खानोलकर ः ‘सकाळ संवाद’मध्ये भूमिका
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १३ ः दशावतार चित्रपटाचे शो परदेशातही गाजत आहेत. तेथील रसिकांनाही यातून पर्यावरण संवर्धनाचा दिलेला संदेश भावतो आहे. कोकणातील निसर्गाचे संरक्षण आणि संवर्धन कोकणावासीयांनी एकत्र येवूनच करायचे आहे. त्यासाठी बाहेरून कोण येणार नाही. हाच संदेश आम्हाला या चित्रपटातून द्यायचा होता. असे दशावतारचे लेखक दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी सकाळशी बोलताना सांगितले.
तळकोकणातील संस्कृतीवर आधारीत दशावतार हा चित्रपट गाजतो आहे. यात कोकणात पर्यावरणावर होत असलेल्या आघातांचे वास्तव मांडण्यात आले आहे. या चित्रपटाच्या निर्मिती टीममधील लेखक, दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांच्यासह निर्माते सुजय हांडे, ओंकार काटे आणि इतर सहकाऱ्यांनी ‘सकाळ’च्या येथील कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. ‘सकाळ’चे विशेष प्रतिनिधी शिवप्रसाद देसाई यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांनी या चित्रपटाच्या निर्मितीमागची पार्श्वभूमी, उद्देशही खुलेपणाने स्पष्ट केला. श्री. खानोलकर म्हणाले, ‘‘अगदी बालपणापासून कोकण अनुभवतोय आणि जगतोय. केळुस या माझ्या मामाच्या गावी यायचो तेव्हा कोकणातील पर्यावरणपुरक संस्कृतीची ताकद लक्षात यायची. येथील लोकजीवन, निसर्गाशी अनेक पिढ्या जोडले गेले आहे. ते इथल्या लोकांनी जपले आहे. या सगळ्या गोष्टी सोबत घेऊन चित्रपट तयार करण्याची दीर्घकाळापासून इच्छा होती. ती या कलाकृतीमधून पूर्ण झाली. हा चित्रपट कोकणावासीयांच्या सहकार्याशिवाय पूर्ण झाला नसता. सिंधुदुर्गातील अगदी गावपाड्यापर्यंत फिरून चित्रपटात कोकणची संस्कृती उतरवण्याचा प्रयत्न केला. यात दाखवलेला राखणदार, दशावतार कलेविषयीचा जिव्हाळा, यातील कलावंतांचे आयुष्य, येथील समृद्ध पर्यावरण या सगळ्या गोष्टी पर्यावरणाच्या भविष्यातील संरक्षणासाठी काहीतरी संदेश जावा हा हेतू ठेवून मांडला. यात राखणदार म्हणून मुद्दामहून ब्लॅक पँथर दाखवला. यातून येथील समृद्ध जैवविविधता अधोरेखीत करण्यासह अंधश्रद्धेपेक्षा कोकणवासीयांची श्रद्धा मांडायची होती.”
--------------
कोट
दशावतार चित्रपटाला पूर्ण महाराष्ट्रात रसिकांनी भरभरुन दाद दिली. तसेच परदेशातही हा चित्रपट चालतो आहे. यामधून मांडलेली निसर्ग संरक्षणाची थिम, कोकणातील संस्कृती याचे परदेशातील रसिकही कौतुक करत आहेत. यातून काहीतरी नवे देण्याचा आम्ही प्रयत्न केला.
- सुजय हांडे, निर्माते
----------------
कोट
कोकणातील रसिकांनी या चित्रपटाला भरभरुन दाद दिली. अगदी निर्मितीपासून आतापर्यंतच्या प्रवासात कोकणवासीयांकडून मिळालेले प्रेम कधीच विसरता येणार नाही. काहीतरी नवे देण्याचा आम्ही केलेला प्रयत्न रसिकांना आवडला, यातच मोठे समाधान आहे.
- ओंकार काटे, निर्माते
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.