रत्नागिरी-३६,४६८ आंबा-काजू बागायतदार परताव्याच्या प्रतिक्षेत

रत्नागिरी-३६,४६८ आंबा-काजू बागायतदार परताव्याच्या प्रतिक्षेत

Published on

परताव्याच्या प्रतिक्षेत ३६ हजार ४६८ बागायतदार
शासनाचे उदासीन धोरण; कृषी विभागाकडून दिवाळीचा मुहूर्त
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १३ः आंबा-काजूचा हंगाम मे महिन्यात संपला आणि नव्या हंगामासाठीची फळपिक विमा योजनेसाठीची मुदतही जाहीर झाली. तरीही मागील हंगामात विमा उतरवलेले रत्नागिरी जिल्ह्यातील ३६ हजार ४६८ बागायतदार अजूनही परताव्याच्या प्रतिक्षेत आहेत. कोकणातील बागायतदारांबाबतच्या उदासीन धोरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. याबाबत काही दिवसांपूर्वी जिल्हा प्रशासनाला निवेदनही दिले होते; मात्र त्यावर अजूनही निर्णय झालेला नाही.
वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे होणारे नुकसान भरून मिळावे यासाठी केंद्र आणि राज्यशासनाने फळपिक विमा योजना लागू केली आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांकडून विशिष्ट रक्कम विमा हप्त्यापोटी घेतली जाते. २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील ३० हजार १३५ आंबा बागायतदार आणि ३ हजार ३३३ काजू बागायतदारांनी विमा उतरवला होता. यामध्ये दोन्ही मिळून १८ हजार २४ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित झाले. शेतकऱ्यांनी हप्त्यापोटी २१ कोटी ७४ लाख रुपये भरले आहेत. केंद्र, राज्य व शेतकरी मिळून १०८ कोटी ५४ लाख रुपये हप्त्यापोटी विमा कंपनीला देय आहेत. त्यातील राज्यशासनाने हप्त्यापोटीची रक्कम मंजूर केली आहे तर केंद्राच हप्ता अजून येणे बाकी आहे. हंगाम संपल्यानंतर पुढील १५ दिवसात कार्यान्वित झालेल्या ट्रिगरची माहिती संकलित केली जाते. हंगाम संपल्यानंतर ४५ दिवसांत परतावा जाहीर करणे हे बंधनकारक आहे; मात्र, विमा कंपन्यांकडून अद्यापही त्यावर कार्यवाही केलेली नाही. विमा परताव्यातील रक्कम बागायतदारांना पुढील हंगामातील व्यवस्थापनासाठी उपयुक्त ठरत असते अन्यथा बागायतदारांना कर्ज काढण्याशिवाय पर्याय राहत नाही. बागांची साफसफाई, खते व औषधे देणे यासारखी कामे प्राप्त रकमेतून केली जातात.
यावर्षी नियमित हंगामापूर्वीच म्हणजेच २० मे रोजी पावसाला सुरवात झाली. पावसामुळे शेवटच्या टप्प्यातील आंबा बागायतदारांच्या हातात येण्यापूर्वीच जमिनीवर आला. त्यामुळे बागायतदारांचे नुकसान झाले. आधीच आंबापिक कमी त्यातच थ्रीप्स, तुडतुडा, बुरशीजन्य रोग, फळमाशीचा प्रादुर्भाव झाल्याने कीटकनाशक फवारणी करावी लागली. आंबा उत्पादन कमी असताना, दर गडगडल्याने बागायतदारांनी केलेला खर्चही वसूल झाला नसल्याचे आंबा बागायतदारांनी सांगितले तसेच अवकाळी पाऊस, गारपीट, निच्चांक तापमान, सर्वोच्च तापमानसारख्या समस्यांनी बागायतदारांचे नुकसान झाले आहे. बागायतदारांना आर्थिक फटका बसला असला तरी अजून परतावा जाहीर झालेला नाही. आता दोन महिन्यात आंब्याचा नवा हंगाम सुरू होईल. त्याचदरम्यान पुढील वर्षाची पिकविमा योजनाही कार्यान्वित होईल; मात्र आधीच्या हंगामाबाबत कोणतीच हालचाल झालेली नाही. त्यामुळे बागायतदार शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.
दरम्यान, येत्या दिवाळीपर्यंत विमा कंपन्यांकडून बागायतदारांना कार्यान्वित झालेल्या ट्रिगरप्रमाणे भरपाई दिली जाणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे दिवाळीच्या तोंडावर बागायतदारांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बागायतदारांनी आंदोलन केल्यानंतर बंदरे व मत्स्यमंत्री नितेश राणे यांनी मंत्रालयात आढावा बैठक घेतली होती. त्यामध्ये ही माहिती विमा कंपनीकडून पुरवण्यात आली आहे.

कोट
आंबा-काजू बागायतदारांना विमा परतावा अद्यापही मिळालेला नाही. परताव्याची रक्कम पुढील काही दिवसात मिळेल, अशी आशा आहे. मंत्रालय स्तरावरून तशा सूचना मिळालेल्या आहेत.
- डॉ. शिवकुमार सदाफुले, जिल्हा कृषी अधीक्षक

कोट
दरवर्षी डिसेंबरमध्येच बागायतदारांकडून फळपिक विमा योजनेची रक्कम वसूल केली जाते शिवाय हंगाम संपल्यानंतर ४५ दिवसांत परतावा जाहीर करणे आवश्यक आहे. तरीही अद्याप विमा कंपन्यांकडून परतावा जाहीर केलेला नाही. मागील हंगामात नैसर्गिक दुष्टचक्रामुळे बागायतदारांचे मोठे नुकसान झाले होते. याची दखल घेऊन परतावा वेळेत देणे अपेक्षित आहे.
- राजन कदम, बागायतदार

चौकट
तालुका शेतकरी संख्या
रत्नागिरी ५३६७
लांजा ३६१७
चिपळूण ३६१७
राजापूर ४५४७
गुहागर २०३३
संगमेश्वर ६७३७
खेड ३७९१
दापोली २४९६
मंडणगड ४५४७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com