तक्रार समिती गठित करण्याचे आवाहन
तक्रार समिती गठित
करण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी ः कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी या अधिनियमान्वये ज्या कार्यालयांमध्ये १० किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी असतील, अशा सर्व खासगी आस्थापनांमध्ये अंतर्गत तक्रार समिती स्थापन करणे बंधनकारक असल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी बा. भि. शिणगारे यांनी दिली. तक्रार समिती गठित न केल्यास तसेच वार्षिक अहवाल सादर न केल्यास अथवा या अनिनियमातील तरतुदीचे काटेकोरपणे पालन न केल्यास नियोक्त कार्यालय प्रमुख यांना ५० हजारपर्यंत दंडाची तरतूद करण्यात आली आहे. तसेच हाच गुन्हा पुन्हा केल्यास त्यासाठी लायसन्स रद्द किंवा दुप्पट दंड अशा कठोर शिक्षेची तरतूद आहे. जिल्ह्यातील सर्व खासगी आस्थापनांनी अंतर्गत तक्रार समिती गठित करून या समितीचा नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग प्रशासकीय इमारत येथे संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.
---
जिल्हा रुग्णालयाचा
रस्ता शुक्रवारी बंद
सिंधुदुर्गनगरी ः शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संलग्न रुग्णालय, सिंधुदुर्ग संस्थेच्या १०० विद्यार्थी क्षमता व ५०० खाटांचे रुग्णालय तसेच इतर अनुषंगिक बांधकाम सुरू आहे. त्यामुळे सध्या रुग्णालयात येण्यासाठी असलेला मुख्य मार्ग शुक्रवारी (ता. १७) पूर्णपणे बंद करण्यात येणार असल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अनंत डवंगे यांनी दिली. या कालावधी दरम्यान रुग्णांना ये-जा करण्याकरिता रुग्णालयाच्या मागील बाजूने विश्रामगृह सिंधुदुर्गनगरी रोड येथून पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे. वाहतुकीसाठी आवश्यक दिशादर्शक फलक व माहिती या मार्गावर जागोजागी लावण्यात आली आहे. रुग्णालयात येणाऱ्या रुग्ण व नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी बसचालक आणि अन्य वाहनचालकांना नवीन पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याबाबत आवश्यक सूचना दिल्या आहेत.
.....................
‘लिपिक टंकलेखक
पदासाठी अर्ज करा’
सिंधुदुर्गनगरी ः सैनिक कल्याण विभागाच्या अधिपत्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील लिपिक टंकलेखक (ग-क) एकूण ७२ पदांसाठी केवळ माजी सैनिक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. जिल्ह्यातील पात्र माजी सैनिकांनी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी केले आहे. वरील पदांपैकी १ पद हे अपंग संवर्गातून किमान ४० टक्के अपंगत्व असलेल्या उमेदवारामधून दिव्यांगत्वाच्या प्रकारांनुसार कर्तव्ये व जबाबदारीचा विचार करून गुणवत्ता, उपलब्धतेनुसार भरण्यात येईल. ही भरती प्रक्रिया टीसीएस-आयओएन यांच्यामार्फत होणार आहे. परीक्षेसाठी अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीने स्वीकारण्यात येतील. पात्र उमेदवारांनी संकेतस्थळावर उद्या (ता. १४) सकाळी ११ वाजल्यापासून ते ५ नोव्हेंबर रात्री ११.५९ वाजेपर्यंत सादर करणे आवश्यक आहे.