‘जलसिंचन’ नाटिकेस सावंतवाडीत प्रतिसाद
‘जलसिंचन’ नाटिकेस
सावंतवाडीत प्रतिसाद
सावंतवाडी ः कोकण पाटबंधारे विकास, ठाणे यांच्यातर्फे नृत्यनाटिका सादर करण्यात आली. येथील तिलारी पाटबंधारे विभागातर्फे हा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी सरपंच व पाणी वापर संस्थांचे संचालक, चेअरमन उपस्थित होते.
‘‘शेतकऱ्यांनी आता गावागावांत पाणी वापर संस्था अधिक सक्षम करणे गरजेचे आहे. त्यासाठी तुम्हाला सर्व मदत पाटबंधारे विभागाकडून केली जाईल,’’ असे अधीक्षक अभियंता पी. एन. पाटील यांनी सांगितले. पाटील यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. व्यासपीठावर कार्यकारी अभियंता बी. बी. जाधव, सरपंच सुरेश गावडे, वसंत धुरी, प्रवीण पंडित, संजय लाड, प्रकाश दळवी, नितीन राऊत, वसंत धुरी, प्रकाश वालावलकर आदी होते. पाटबंधारे विभागाचे अधिकारी कविटकर यांनी प्रास्ताविक केले. आशा क्रिएशन, छत्रपती संभाजीनगर यांच्या टीमने ‘जलसिंचन’वर नृत्यनाटिका सादर केली. गावागावांत पाणी वापर संस्था अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने पाटबंधारे विभागातर्फे असे प्रशिक्षण देण्याची मोहीम हाती घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.
---
सावंतवाडीत आजपासून
आकाशकंदील प्रदर्शन
सावंतवाडी ः बी. एस. बांदेकर कॉलेज ऑफ फाइन आर्ट महाविद्यालयाचे वार्षिक आकाशकंदिल प्रदर्शन यंदाही रंगतदार पद्धतीने आयोजित केले आहे. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पकतेतून आणि कलात्मकतेतून साकारलेले विविधरंगी आकाशकंदील प्रदर्शनात पाहायला मिळणार आहेत. खरेदीचीही सुवर्णसंधी नागरिकांना उपलब्ध होणार आहे. येथील नारायण मंदिर, मोती तलावासमोर हे प्रदर्शन भरविले असून १५ ते १७ दरम्यान सकाळी ९ ते सायंकाळी ७ पर्यंत सर्वांसाठी खुले राहील. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सर्वांनी प्रदर्शनाला भेट द्यावी. अधिक माहितीसाठी श्री. मोरजकर, श्री. नेरुरकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रा. उदय वेले यांनी महाविद्यालयातर्फे केले आहे.
..................
आंबोली सैनिक
स्कूलचे यश
आंबोली ः क्रीडा व युवक सेवा संचालनालयांतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे आयोजित जिल्हास्तरीय शालेय हँडबॉल स्पर्धेत १४, १७ आणि १९ वर्षे वयोगटाखालील स्पर्धांमध्ये आंबोली सिंधुदुर्ग सैनिक स्कूलचे संघ विजेते ठरले. स्पर्धेत १४ वर्षे वयोगटातील मुलांचा अंतिम सामना इन्सुली विरुद्ध सैनिक स्कूल यांच्यात झाला. यात सैनिक स्कूलच्या संघाने ११-०० अशा गोल फरकाने विजय मिळवला. १७ वर्षे वयोगटातील अंतिम सामना सिंधुदुर्ग सैनिक स्कूल विरुद्ध इन्सुली यांच्यातच झाला. या सामन्यात सैनिक स्कूलच्या खेळाडूंनी १४-०३ अशा गोल फरकाने विजय संपादन केला, तर १९ वर्षे वयोगट मुलांचा अंतिम सामना सैनिक स्कूल आणि खेमराज मेमोरियल हायस्कूल, बांदा यांच्यात झाला. सैनिक स्कूलच्या संघाने ११-०३ अशा गोल फरकाने हा सामना जिंकून जिल्हास्तरीय शालेय हँडबॉल स्पर्धेतील वर्चस्व सिद्ध केले.
....................
वेंगुर्लेत आज
ग्रंथ प्रदर्शन
वेंगुर्ले ः डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून उद्या (ता. १५) येथील नगर वाचनालयातर्फे नवीन खरेदी केलेल्या पुस्तकांचे कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. प्रदर्शनात कथा, कादंबऱ्या, ललित लेख, प्रवास वर्णने, धार्मिक पुस्तके, ऐतिहासिक, काव्य, स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त अशा विविध विषयांवरील पुस्तके मांडण्यात येणार आहेत. सर्वांनी ग्रंथप्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कार्याध्यक्ष अनिल सौदागर, कार्यवाह कैवल्य पवार यांनी केले आहे.
....................
वेत्येत रविवारी
नरकासुर स्पर्धा
सावंतवाडी ः वेत्ये येथील श्री कलेश्वरपूर्वी देवी युवा कला, क्रीडा मंडळ, आयोजित व सरपंच गुणाजी गावडे पुरस्कृत खुली नरकासुर स्पर्धा रविवारी (ता. १९) रात्री ८.३० वाजता कलेश्वरपूर्वी देवी मंदिरात होणार आहे. स्पर्धेसाठी प्रथम ११,१११, द्वितीय ७,७७७, तृतीय ५,५५५, तसेच उत्तेजनार्थ २,२२२ रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी गिरीश खांबल, आशिष गावकर यांच्याशी संपर्क साधावा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.