चिपळूण ः जलकुंडानं साठवलं पाणी, शेती पिकणार सोन्यावाणी
rat14p17.jpg
98475
चिपळूणः ढोक्रवलीत २५ गुंठ्यात उभारलेल्या शेततळ्यात साठलेले पाणी.
rat14p18.jpg
98476
कोकण जलकुंड योजनेचा फलक.
---------
जलकुंडानं साठवलं पाणी, शेती पिकणार सोन्यावाणी
ढोक्रवलीत २५ गुंठ्यात शेततळं; ५२ हजार लिटरचा साठा, शेतकऱ्यांसाठी वरदान योजना
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १४ः कोकणाला मुसळधार पावसाचे वरदान मिळालेले असूनही उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. यावर उपाय म्हणून शासनाच्या कोकण जलकुंड योजनेतून चिपळूण तालुक्यातील ढोक्रवली येथील शेतकरी राजेंद्र गावकर यांनी २५ गुंठ्यात शेततळे उभारले आहे. त्यात पाणी साठले असून, त्याचा उपयोग उन्हाळ्यात बागायतीला होणार आहे. या शेततळ्यामुळे कातळजमीन आणि अल्पक्षेत्रात दुबार शेती करणे शक्य होणार आहे.
कोकणात सर्वाधिक पाऊस पडत असला तरीही, ऑक्टोबरपासून पावसाचे प्रमाण कमी होते. कातळजमीन आणि छोट्या जमिनीच्या तुकड्यांमुळे शेतकऱ्यांना संरक्षित पाण्याचा लाभ मिळावा, या उद्देशाने कृषी विभागाने राबवलेली कोकण जलकुंड योजना शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. ही योजना जिल्ह्यात राबवण्यासाठी जिल्हा नियोजनमधून निधी देण्यात आला. कोकणात मोठ्या प्रमाणात आंबा-काजूच्या बागा आहेत. दरवर्षी जिल्ह्यात साडेतीन हजार मिलीमीटर सरासरी पाऊस पडूनही जानेवारीनंतर पाण्याची कमतरता भासते.
कातळजमिनीमुळे मोठी शेततळे बांधणे अशक्य होते. या परिस्थितीत ‘कोकण जलकुंड’ ही योजना कोकणवासियांसाठी आशेचा नवा झरा ठरत आहे. गावकर यांनी या योजनेचा लाभ घेत २५ गुंठ्यात ५२ हजार लिटरचा साठा केला आहे. हे पाणी भविष्यात दुबार शेतीसाठी उपयुक्त ठरणार आहे. हा अन्य शेतकऱ्यांसाठी आदर्श ठरलेला आहे.
या योजनेबद्दल गावकर म्हणाले, माझे वडील धाकटू गावकर यांच्या नावे असलेली शेती मी कसत आहे. २०२४-२५ यावर्षी जिल्हा वार्षिक योजनेतून कोकण जलकुंड योजनेंतर्गत निधी मंजूर झाला. ते कुंड उभारल्यानंतर पावसाला सुरवात झाली. आता ते तुडुंब भरलेले आहे. पूर्वी दीड-दोन किलोमीटरवरून पाण्याचे पिंप मोटरसायकलीवरून वाहून आणावे लाग होते. आता शेतातच पाणी साठवले गेले आहे. त्यामुळे काजूबागेला जीवन मिळाले आहे. उन्हाळ्यात पाण्याची कसर भरून काढता येईल.
चौकट
चिपळूण तालुक्यात ६० जलकुंड पूर्ण
जलकुंडाविषयी माहिती देताना तालुका कृषी अधिकारी शत्रुघ्न म्हेत्रे म्हणाले, जलकुंडांमुळे आता ५२ हजार लिटरपर्यंत संरक्षित पाणी उपलब्ध होत आहे. या साठ्याचा सिंचन आणि फवारणीसाठी मोठा उपयोग होत असून, शेतकऱ्यांना थेट फायदा मिळत आहे. चिपळूण तालुक्यात आतापर्यंत ६० जलकुंड पूर्ण झाली असून, सुमारे १० लाख रुपयांचा खर्च केला आहे.
कोट
शेतकऱ्यांना जलकुंड योजनेचा फायदा मिळत आहे. सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेमधून ९६ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. प्रत्येकी ५ मीटर लांब, ५ मीटर रूंद आणि २ मीटर खोल अशा या जलकुंडांत ५२ हजार लिटर पाणी साठते. २५ गुंठ्याला एक याप्रमाणे प्रतिहेक्टर चार जलकुंड देता येतात. या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी टिकून राहणार असून, त्यांच्या आयुष्यातील समृद्धीचा प्रवाह अखंड वाहत राहील.
- शिवकुमार सदाफुले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
कोट
कोकण जलकुंड या योजनेमुळे कोकणातील प्रत्येक शेतात आता पाण्याचा खजिना साठलेला आहे. निसर्गाचा आशीर्वाद आणि कृषी विभागाचा प्रयत्न यांची सांगड घालून जलकुंडात पाणी साठवले आहे.
- प्रशांत सातपुते, जिल्हा माहिती अधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.