दीपावलीच्या साहित्यांनी म्हापण बाजारपेठ सजली

दीपावलीच्या साहित्यांनी म्हापण बाजारपेठ सजली

Published on

98692

दीपावलीच्या साहित्यांनी म्हापण बाजारपेठ सजली

चैतन्याचे वातावरण; आकाशकंदील, पणत्यांच्या खरेदीकडे कल

संदीप चव्हाण ः सकाळ वृत्तसेवा
म्हापण, ता. १५ ः प्रकाशाची उधळण करणारा सण म्हणजे दिवाळी. सण जवळ आल्याने म्हापण बाजारपेठेत चैतन्य निर्माण झाले आहे. दिव्यांची महती सांगणारा हा सण साजरा करण्यासाठी प्रत्येक घर उजळून निघत आहे. आकाशकंदील, रंगीबेरंगी पणत्या, रांगोळ्या आणि घरगुती सजावटीचे साहित्य विक्रीसाठी बाजारात उपलब्ध झाले आहे.
म्हापणसह कोचरा, निवती, खवणे, श्रीरामवाडी, परुळे, पाट, केळूस, आंदुर्ले आदी गावांमधून ग्राहक खरेदीसाठी येत आहेत. बाजारपेठेत मातीचे, प्लास्टिकचे आणि चिनी मातीचे दिवे, तसेच विविध रंगांचे आणि आकाराचे आकाशकंदील विक्रीसाठी आले आहेत. सध्या बाजारात १०० ते ५०० रुपयांदरम्यानचे आकाशकंदील उपलब्ध असून त्यांच्या डिझाईन आणि रंगसंगतीमुळे ग्राहकांचे लक्ष वेधले जात आहे. तथापि, कागदांच्या वाढत्या किमतींमुळे दरात २० ते २५ टक्के वाढ झाल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
गणेशोत्सवानंतर वर्षातील सर्वांत मोठ्या सणाप्रती नागरिकांमध्ये उत्साह आहे. किराणा सामान, मिठाई, फटाके, इलेक्ट्रिकल उपकरणे, फुलांचे गुच्छ, कपडे आणि गृहोपयोगी वस्तूंच्या दुकानांमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. नोकरदार वर्गाची दिवाळीची लगबग सुरू झाली असून या आठवड्याच्या अखेरीस कपड्यांची खरेदी शिगेला पोहोचेल, असा विश्वास व्यापाऱ्यांनी व्यक्त केला. दरम्यान, धकाधकीच्या जीवनशैलीमुळे अनेक नोकरदार महिला घरी फराळ बनवू शकत नाहीत. त्यामुळे महिला बचत गट रेडीमेड फराळाची तयारी करताना दिसून येत आहे. एकूणच, अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर म्हापण बाजारपेठ उजळून निघाली आहे. रंग, प्रकाश आणि उत्साहाचा संगम साधणारा हा सण गावागावांत आनंदाची ज्योत पेटवत आहे.
--------------
कोट
ु्प्रतिवर्षीच्या तुलनेत यंदा ग्राहकांमध्ये नवचैतन्य दिसत आहे. डिझाईनच्या कंदिलांना अधिक मागणी असून ग्राहकांचा प्रतिसाद खूप चांगला मिळत आहे.
- विठ्ठल चव्हाण, व्यावसायिक, म्हापण
--------------
शेतकरी चिंतेत
दुसरीकडे, ऑक्टोबर महिन्यातील परतीच्या पावसामुळे हातात आलेल्या भातपिकाचे नुकसान होईल, या भीतीने शेतकरी वर्ग मात्र दिवाळीच्या तोंडावर हवालदिल झाल्याचे चित्र आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com