मंडणगड -जुने नेतृत्व की नव्यांना रिंगणात उतरवणार

मंडणगड -जुने नेतृत्व की नव्यांना रिंगणात उतरवणार

Published on

rat१५p१५.jpg
९८७०५
मंडणगड पंचायत समिती

जुने नेतृत्व की, नव्या चेहऱ्यांना संधी ?
मंडणगड पंचायत समिती; आरक्षणामुळे राजकीय समीकरणात बदल
सचिन माळीः सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. १५ः स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५० टक्के आरक्षण मिळाल्याने अनेक महिलांना पंचायत समिती सदस्य, सभापती व उपसभापती होण्याची संधी गेल्या काही वर्षांत मिळाली आहे. या वेळी पडलेल्या आरक्षणानुसार दोन महिलांना जिल्हा परिषद सदस्य म्हणून संधी मिळणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत जुने नेतृत्व पुन्हा रिंगणात उतरणार की, नवे महिला नेतृत्व पुढे येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पंचायत समिती गणाच्या आरक्षणामुळे अनेक इच्छुकांचे राजकीय गणित बिघडले असून, काहींना त्याचा लाभही झाला आहे.
मंडणगड तालुक्याच्या राजकारणाभोवती सध्या शिवसेना (शिंदे गट) केंद्रस्थानी आहे. हा गट स्वतःच्या बळावर निवडणुका लढवण्याची क्षमता ठेवतो; मात्र, महायुतीच्या धर्मामुळे राष्ट्रवादी गटाला सत्तेत वाटा द्यावा लागेल, अशी राजकीय अपरिहार्यता शिंदे गटासमोर आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या वीस वर्षांपासून शिवसेना व राष्ट्रवादी यांच्यातील स्पर्धा आता महायुतीच्या आघाडीमुळे थंडावण्याची शक्यता आहे. मंडणगड पंचायत समितीच्या स्थापनेपासून (१९९१-९५ या पहिल्या कालावधीचा अपवाद वगळता) शिवसेनेचे वर्चस्व कायम राहिले आहे. संख्याबळ समान असतानाही निःशब्द पाठिंब्यामुळे सेनेला सत्ता मिळाली, असे पूर्वी दिसून आले आहे. या वेळच्या आरक्षणानुसार दोन महिला सदस्य निश्चितपणे निवडून येणार आहेत. त्यामुळे या निवडणुकीत जुने नेतृत्व पुन्हा रिंगणात उतरणार की, नवे महिला नेतृत्व पुढे येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, गेल्या दहा वर्षांत संसद ते ग्रामपंचायत थेट निधी वितरण प्रणाली सुरू झाल्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या संस्थांचे आर्थिक आणि राजकीय महत्व कमी झाले आहे. केवळ नावापुरती सत्ता मिळवण्यापेक्षा विकासकामांत प्रत्यक्ष सहभाग, या भूमिकेतून आजचे युवा कार्यकर्ते सरपंचपदाकडे अधिक आकर्षित होत आहेत. ग्रामपंचायतींना अधिक निधी आणि विकासाच्या संधी मिळत असल्याने पंचायत समित्यांतील सत्तास्थाने ‘मिनी मंत्रालय’ या उपमेला साजेशी राहिलेली नाहीत.


चौकट
....तर तालुक्यात शंभर टक्के महिलाराज !
घटनेतील दुरूस्तीमुळे महिलांचा सहभाग राजकारणात मोठ्या प्रमाणात वाढला असला तरी तालुक्यात खुल्या प्रवर्गातून निवडणूक लढवून विजय मिळवण्याएवढे महिलांचे नेतृत्व अद्याप प्रगल्भ झालेले दिसत नाही. स्थानिकस्तरावर महिलांचा सहभाग प्रामुख्याने आरक्षित जागांपुरताच मर्यादित राहिला आहे. राजकीय पक्षांनी यापुढे ठाम इच्छाशक्ती दाखवली, महिलांना खुल्या प्रवर्गातून उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला तरच हे चित्र बदलू शकते, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.

दृष्टिक्षेपात...
* सत्तेचे केंद्रीकरण कमी झाल्याने पंचायत समितीचे आकर्षण घटले
* मंडणगड तालुक्यात शिवसेना शिंदेगटाचे वर्चस्व कायम
* आगामी निवडणुकीत जुने विरूद्ध नवे नेतृत्व यांच्यातील लढत रंगणार

------
चौकट
मंडणगड पंचायत समितीमधील २००२-२५ मधील आरक्षणं अशीः

* इस्लामपूर गण -
२००२ सर्वसाधारण
२००७ नामाप्र स्त्री
१०१२ सर्वसाधारण
२०१७ सर्वसाधारण स्त्री
२०२५ सर्वसाधारण स्त्री

* भिंगळोली गण -
२००२ सर्वसाधारण स्त्री
२००७ सर्वसाधारण
२०१२ नामाप्र
२०१७ सर्वसाधारण
२०२५ सर्वसाधारण

* बाणकोट गण -
२००२ नामाप्र स्त्री
२००७ सर्वसाधारण स्त्री
२०१२ सर्वसाधारण
२०१७ सर्वसाधारण
२०२५ नामाप्र खुला

* तुळशी गण -
२००२ सर्वसाधारण
२००७ सर्वसाधारण
२०१२ सर्वसाधारण स्त्री
२०१७ नामाप्र स्त्री
२०२५ सर्वसाधारण स्त्री

कोट १
पंचायत समिती आरक्षणात दोन महिलांना निश्चितच संधी मिळणार आहे. पक्षश्रेष्ठी याबाबत नक्कीच विचार करतील, पक्षासाठी एकनिष्ठेने काम करणाऱ्या ग्रामीण भागात अनेक महिला आहेत. त्यांना या निमित्ताने नेतृत्व मिळाले तर सर्वसामान्य महिलाही पुढे येऊन तालुक्याचे नेतृत्व करू शकतात, हे अधोरेखित होईल. राजकीय नेतृत्वाच्यादृष्टीने आता महिला निश्चितच खंबीर होऊन पुढे येत आहेत.
- दीप्ती घडशी, माजी सरपंच

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com