ःसकारात्मक मानसिकता विकसीत करतेय ''टेली मानस सेवा
‘टेली मानस’ने बदलली मानसिक आरोग्याकडे पाहण्याची दृष्टि
रत्नागिरी प्रादेशिक मनोरुग्णालय ; साडेतीन वर्षात ९७ हजार बाह्यरुग्णांना सेवा
राजेश शेळके : सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १६ : राज्यातील नागरिकांच्या मानसिक आरोग्याच्या संरक्षणासाठी सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत टेली मानस सेवा’ आणि ‘राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम’ यांची अंमलबजावणी प्रभावीपणे केली जात आहे. रत्नागिरी प्रादेशिक मनोरुग्णालयात या सेवांचा लाभ घेणाऱ्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून, या कार्यक्रमांना लोकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती मनोरुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. संघमित्रा फुले यांनी दिली. गेल्या साडेतीन वर्षांमध्ये रत्नागिरी प्रादेशिक मनोरुग्णालयात तब्बल ९७ हजार ६ बाह्यरुग्णांनी सेवा घेतली तर ६७५९ रुग्णांना दाखल करून उपचार करण्यात आले.
मानसिक आजारांविषयीची भीती कमी होऊन समाजात सकारात्मक मानसिकता विकसित होणे, हा याचा उद्देश आहे. यामध्ये केवळ कोकणच नव्हे तर सिंधुदुर्ग, सांगली, कोल्हापूर, पुणे, ठाणे, मुंबई या जिल्ह्यांसह परराज्यातील रुग्णांचाही समावेश आहे. मानसिक आरोग्याविषयी मोफत सल्ला जनतेला सहज उपलब्ध व्हावा, या उद्देशाने केंद्र व राज्यशासनाने ‘टेली-मानस’ ही टोल-फ्री हेल्पलाइन (क्र. १४४१६ आणि १८००-८९१४४१६) २४ तास कार्यरत ठेवली आहे. ऑक्टोबर २०२२ मध्ये सुरू झालेल्या या सुविधेमुळे मानसिक ताण, नैराश्य, चिंताविकार, कौटुंबिक समस्या, आत्मघाती विचार आणि व्यसनसंबंधित समस्या असलेल्या लाखो लोकांना समुपदेशन सेवा पुरवण्यात आली आहे. ही सेवा अत्यंत गोपनीय असते. या क्रमांकावर फोन केल्यावर नागरिक त्यांच्या आवडीची भाषा निवडू शकतात. त्यानंतर हा कॉल संबंधित राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील ‘टेली-मानस सेल’कडे पाठवला जातो. ही सेवा प्रशिक्षित समुपदेशक आणि मानसिक आरोग्यतज्ज्ञांचा समावेश असलेल्या दोनस्तरीय प्रणालीमध्ये चालवली जाते.
राज्यातील नागरिकांना मानसिक आरोग्याविषयी जागरूक करणे, मोफत सल्लामसलत उपलब्ध करून देणे आणि उपचारप्रक्रियेला गती देणे हे सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. प्रादेशिक मनोरुग्णालय, रत्नागिरीच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. संघमित्रा फुले यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम शासकीय रुग्णालय, रत्नागिरीतर्फे १० ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर या कालावधीत जागतिक मानसिक आरोग्य महिना साजरा करताना शाळा, कॉलेज, आश्रम आणि कार्यालयांमध्ये जनजागृती कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. या कार्यक्रमांना यश येत असले तरी प्रादेशिक मनोरुग्णालयांमधील रिक्त पदे तातडीने भरून आणि मंजूर निधीचा संपूर्ण विनियोग करून हा कार्यक्रम अधिक बळकट करण्याची गरज आहे.
---
चौकट...
बाह्यरुग्ण तपासणीत लक्षणीय वाढ
राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत रत्नागिरी प्रादेशिक मनोरुग्णालयात बाह्यरुग्णांच्या (ओपीडी) संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. २०२४-२५ (चालू वर्ष) मध्ये ४१ हजार ७७८ रुग्णांनी बाह्यरुग्ण सेवांचा लाभ घेतला. या तुलनेत २०२२-२३ मध्ये ही संख्या २५ हजार ३१८ होती तर २०२३-२४ मध्ये २९ हजार ९१० बाह्यरुग्ण सेवेचा लाभ घेतला होता.
चौकट...
प्राथमिक आरोग्यकेंद्रातही सेवा
मानसिक आरोग्याची वाढती गरज लक्षात घेऊन ही सेवा आता थेट प्राथमिक आरोग्यकेंद्रांच्या स्तरावर पोहोचवण्यात आली आहे. यासाठी ६७ प्राथमिक मानसिक आरोग्यकेंद्रे स्थापित करण्यात आली आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी स्मृतिभ्रंश क्लिनिक आणि मानसिक पुनर्वसन व दैनंदिन जीवन सुधारण्यासाठी ‘डे केअर सेंटर्स’ सुरू करण्यात आले आहेत.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.