ऑनलाईन खरेदीचा स्थानिक व्यापाऱ्यांना फटका

ऑनलाईन खरेदीचा स्थानिक व्यापाऱ्यांना फटका

Published on

ऑनलाईन खरेदीने मंदावला स्थानिक बाजार
चिपळुणातील उलाढाल रोडावली ; बाजारपेठेतूनच खरेदी करण्याचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १८ : दिवाळीची खरेदी कोणाकडून करायची, या विषयावरून राज्यभरात वाद सुरू असताना चिपळूण शहरातील व्यापाऱ्यांनी स्थानिक व्यापाऱ्यांकडून खरेदी करा, असे आवाहन केले आहे.
बाजारपेठेत ऑनलाईन खरेदीचा पर्याय उपलब्ध झाल्यामुळे त्याचा फटका सर्वच व्यापाऱ्यांना बसत आहे. चिपळूणमध्ये गेली अनेक वर्षे येथील सर्व व्यापारी गुण्यागोविंदाने राहतात. एकत्र सण साजरे करतात. अनेक व्यापारी बाहेरून आले, त्यांनी व्यवसाय उभा केला आणि आज ते शहरातील मोठे प्रतिष्ठित व्यापारी म्हणून गणले जाऊ लागले आहेत; परंतु नागरिकांना घरबसल्या ऑनलाईन खरेदीचा पर्याय उपलब्ध झाल्यामुळे मोठ्या व्यापाऱ्यांसह लहान विक्रेत्यांनाही त्याचा फटका बसला आहे. व्यापारी महासंघाचे पदाधिकारी आणि चिपळूणचे माजी नगरसेवक किशोर रेडीज याबाबत माहिती देताना म्हणाले, ऑनलाइन खरेदीचा पर्याय उपलब्ध झाल्यामुळे ४० टक्के बाजारपेठेतील उलाढाल कमी झाली आहे. ग्राहकांना कमी पैशांमध्ये ऑनलाईन खरेदीवर वस्तू मिळते; परंतु त्या वस्तूचा दर्जा खरंच चांगला असतो का, याचा नागरिकांनी विचार करायला हवा. अनेकवेळा सोशल मीडियावर दिसणाऱ्या वस्तू खऱ्या नसतात. आपण वस्तू मागतो एक आणि आपल्याला दुसरी वस्तू येते. कुरियर कंपनीवाले आपल्याकडून सेवा दिल्याचे पैसे घेतात. वस्तूची जबाबदारी घेत नाहीत. चिपळूण शहरामध्ये महापूर आला त्या वेळी बाजारपेठेचे मोठे नुकसान झाले. राज्यातून मदत आली; पण व्यापाऱ्यांनी एकमेकांना हात देत पुन्हा उभारी घेतली. महापूराच्या कटू आठवणीतून अजून शहर सावरलेले नाही. चिपळूणचे नागरिक आणि व्यापारी महापूरात अडकले होते तेव्हा ऑनलाईन सेवा देणाऱ्या कोणत्याही कंपनीने मदत केली नाही. त्यामुळे नागरिकांनी ऑनलाईनपेक्षा शहरातील विक्रेत्यांकडून खरेदी करावी.
---------
कोट
आमच्यादृष्टीने सर्व व्यापारी एक आहेत. नागरिकांनी कोणाकडून खरेदी करावी, हे त्यांना वेगळे सांगायला नको. वस्तूची किंमत आणि दर्जा तपासून नागरिक खरेदी करतात. स्थानिक व्यापारी सशक्त झाला तरच चिपळूण शहर आर्थिकदृष्ट्या प्रगत होईल.

--किशोर रेडीज, माजी नगरसेवक, चिपळूण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com