रेडिमेडच्या युगात मातीच्या दिव्यांचा घरोघरी प्रकाश
काही सुखद---------लोगो
rat19p23.jpg
99577
राजापूर ः मातीच्या लगद्याला आकार देताना यशवंत माटल.
रेडिमेडच्या युगातही मातीच्या दिव्यांचा घरोघरी प्रकाश
यशवंत माटलनी जपली कुंभारकामाची परंपरा; कोंडसर बुद्रुक येथे व्यवसाय
राजेंद्र बाईतः सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १९ : प्लास्टिक व रेडीमेड वस्तूंनी व्यापलेल्या आधुनिक काळात दिवाळीतील मातीच्या पणत्यांची मागणी कमी होत चालली असली, तरी त्यांचे महत्त्व अद्यापही अबाधित आहे. याच परंपरेला जपत राजापूर तालुक्यातील कोंडसर बुद्रुक येथील यशवंत माटल यांनी पारंपरिक कुंभारकामाला आधुनिकतेतही टिकवून ठेवले आहे. वयाच्या पंचाहत्तरीत असतानाही, मातीला चाकावर फिरवून कुशलतेने आकार देणारे माटल, आपल्या हस्तकौशल्यातून मातीच्या आकर्षक पणत्या तयार करत घराघरांतील दिवाळी उजळवत आहेत.
दिवाळी म्हणजे आनंद, एकता आणि नातेसंबंधांचा उत्सव. प्राचीन काळापासून अंधारावर प्रकाशाचा, अज्ञानावर ज्ञानाचा विजय दर्शवण्यासाठी घरोघरी मातीचे दिवे पेटवले जात. दोन दशकांपूर्वी घरोघरी वापरले जाणारे हे मातीचे दिवे आज प्लास्टिक आणि कृत्रिम प्रकाशयंत्रांमुळे मागे पडले. मात्र, यशवंत माटल यांनी हा पारंपरिक व्यवसाय फक्त जिवंतच ठेवला नाही, तर अधिक सजवला आहे. श्री. माटल यांनी बालपणापासूनच वडिलांकडून कुंभारकामाची बारकावे आत्मसात केले. योग्य मातीची निवड, तिचा लगदा तयार करणे, चाकाला योग्य तेव्हा वेग देणे आणि त्या वेगाचा वापर करून मातीला हळुवारपणे सुबक आकार देणे ही त्यांची खासियत आहे.
कापडाच्या सहाय्याने मातीला सरळ बनविण्याची विशेष प्रक्रिया असते. आज अनेक पर्याय असताना त्यांनी नोकरी वा दुसऱ्या व्यवसायाचा मार्ग न निवडता पारंपरिक कुंभारकामालाच आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू बनवले. आठवीपर्यंतचे शिक्षण घेतलेले माटल हे आपल्या कुटुंबाच्या मदतीने हा व्यवसाय चालवत आहेत.
चक्रावर फिरणाऱ्या मातीला ते एकाग्रतेने पणत्या, माठ, घागरी, मातीची भांडी, पूजेसाठी लागणाऱ्या वस्तू यांसारख्या उपयोगी व आकर्षक वस्तूंमध्ये रूपांतरित करतात. यासाठी लागणारी ‘कुंभारमाती’ गावातच सहज उपलब्ध होते. फणसी लाकडापासून त्यांनी स्वतः तयार केलेले दोन ते अडीच फूट व्यासाचे चक्र हे त्यांच्या हस्तकौशल्याचे केंद्र आहे. चांगल्या उत्पन्नाचा स्रोत असलेला हा व्यवसायही आता काळाच्या ओघात मागे पडतो आहे. नव्या पिढीचे याकडे असलेले दुर्लक्ष, आधुनिक जीवनशैली आणि झटपट मिळणाऱ्या रेडीमेड वस्तूंमुळे पारंपरिक कुंभारकाम लोप पावत असल्याची खंत माटल व्यक्त करतात. मात्र, त्यांचा आशावाद आणि समर्पण आजच्या काळातही प्रेरणादायी आहे.
चौकट
बाजारपेठ नव्हे, गुणवत्तेची ओळख
यशवंत माटल यांनी बनवलेल्या वस्तूंना बाजारपेठ शोधावी लागत नाही. त्यांच्या हस्तकौशल्यातून घडणाऱ्या आकर्षक मातीच्या वस्तूंना जिल्हाभरातून मागणी आहे. ग्राहक स्वतःहून त्यांच्याकडे येत आहेत. दिवाळी हंगामात ते दरवर्षी हजारहून अधिक पणत्या तयार करून विक्री करतात. याशिवाय आगाऊ मागणीप्रमाणे घाऊक प्रमाणातही अन्य वस्तू उपलब्ध करून देतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.